पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धाकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. हमासला समूळ नष्ट करण्यासाठी इस्रायलकडून गाझा पट्टीत बॉम्बहल्ले केले जात आहेत. या हल्ल्यांत आतापर्यंत हजारो पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या युद्धामुळे एकीकडे समस्त जगाची चिंता वाढलेली असताना आता इराण समर्थित येमेनच्या हुथी बंडखोरांनी मोठी कारवाई केली आहे. या हुथी बंडखोरांनी हमासला पाठिंबा म्हणून भारताकडे येणाऱ्या एका मालवाहू जहाजाचे अपहरण केले आहे. या घटनेमुळे इस्रायल, इराण, येमेन, ब्रिटन, जपान असे अनेक देश आक्रमक होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर हुथी बंडखोर कोण आहेत? त्यांनी या जहाजाचे अपहरण का केले? इस्रायलने या अपहरणानंतर काय भूमिका घेतली? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या…

हुथी बंडखोरांकडून जहाजाचे अपहरण

हुथी बंडखोरांनी इस्रायलशी संबंधित असलेल्या एका मालवाहू जहाजाला ताब्यात घेतले आहे. हे जहाज १९ ऑक्टोबर रोजी टर्कीहून भारताकडे येत होते. हुथी बंडखोरांच्या या कारवाईमुळे हमास-इस्रायल यांच्यातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. हे जहाज ताब्यात घेताना हुथी बंडखोरांनी हेलिकॉप्टरची मदत घेतली. हेलिकॉप्टरने जहाजावर उतरून बंडखोरांनी एकूण २५ कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले आहे. आम्ही इस्लामिक मूल्यांनुसार ओलीस ठेवलेल्यांशी व्यवहार करू, असे हुथी बंडखोरांनी म्हटले आहे.

या घटनेनंतर इस्रायलने हे जहाज आमच्या मालकीचे नसल्याचे सांगितले आहे. तसेच हे जहाज ब्रिटिशांच्या मालकीचे असून ते जपानकडून चालवले जाते. जहाजाचे अपहरण म्हणजे इराणचे दहशतवादी कृत्य आहे, असे इस्रायलने म्हटले आहे.

हुथी बंडखोरांनी जहाजाचे अपहरण का केले?

‘गॅलेक्सी लीडर’ असे अपहरण करण्यात आलेल्या जहाजाचे नाव आहे. हे जहाज टर्कीतून निघाले होते. ते भारतातील गुजरातमध्ये येणार होते. या जहाजावर कोणताही माल (सामान) नव्हता. जहाजातील कर्मचारी हे बल्गेरिया, रोमानिया, युक्रेन, मेक्सिको तसेच फिलिपाईन्स या वेगवेगळ्या देशांचे रहिवासी आहेत. काही दिवसांपूर्वी हुथी बंडखोरांनी हमास आणि इस्रायल युद्धासंदर्भात प्रतिक्रिया दिली होती. इस्रायलने आपल्या हिंसक कारवाया थांबवाव्यात. या कारवाया अशाच चालू राहिल्या तर तांबडा समुद्र तसेच तांबडा समुद्र आणि गल्फ ऑफ एडेन यांना जोडणाऱ्या बाब अल मॅनडेब या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या इस्रायली जहाजांना आम्ही लक्ष्य करू, असा इशारा याआधी हुथी बंडखोरांनी दिला होता. त्यानंतर या बंडखोरांनी आता गॅलेक्सी लीडर हे मालवाहू जहाज ताब्यात घेतले आहे.

“आम्ही इस्रायली जहाजांच्या शोधात”

या कारवाईनंतर हुथी बंडखोरांचे नेते अब्दुलमालिक अल-हुथी यांनी प्रतिक्रिया दिली. “तांबडा समुद्र तसेच बाब अल मॅनडेबमध्ये आम्ही इस्रायली जहाजांच्या शोधात आहोत. आम्ही या जहाजांवर सतत नजर ठेवून आहोत”, असे अल हुथी म्हणाले.

“इस्रायलला फक्त बळाची भाषा समजते”

जहाजाचे अपहरण केल्यानंतर हुथी बंडखोरांचे प्रवक्ते मोहम्मद अब्दुल-सलाम यांनी प्रतिक्रिया दिली. इस्रायलला फक्त बळाची भाषा समजते. समुद्री युद्धासंदर्भातले गांभीर्य दिसून येण्यासाठी आमचे हे पहिले पाऊल आहे. ही फक्त सुरुवात आहे, असे मोहम्मद अब्दुल सलाम म्हणाले.

जहाजाशी इस्रायल, जपानचा संबंध काय?

“हुथी बंडखोरांनी अपहरण केलेले जहाज आमच्या मालकीचे नाही. या जहाजात आमच्या देशाचा एकही कर्मचारी नाही. इराणचे हे आणखी एक दहशतवादी कृत्य आहे”, असे इस्रायली सरकारे म्हटले. तर या जहाजाच्या अपहरणामुळे जागतिक पातळीवर अनेक गंभीर परिणाम पडू शकतात, अशी प्रतिक्रिया इस्रायली सैन्याने दिली.

जहाजाचा इस्रायलशी काय संबंध?

या जहाजाचा आणि आमचा काहीही संबंध नाही, असे इस्रायलने सांगितले असले तरी मुळात हे जहाज एका इस्रायली अब्जाधीशाशी संबंधित असल्याचे म्हटले जात आहे. इस्रायली अब्जाधीश अब्राहम रामी उंगार यांच्या मालकीच्या रे कार कॅरियर्स या कंपनीच्या मालकीचे हे जहाज आहे, असे सांगितले जात आहे. उंगार यांच्याशी संबंध असलेल्या एका जहाजाचा ओमानच्या आखातात २०२१ साली स्फोट झाला होता. या स्फोटाला इराण जबाबदार असल्याचा दावा तेव्हा इस्रायलने केला होता.

जहाज, कर्मचाऱ्यांच्या सुटकेसाठी जपानचे प्रयत्न

गॅलेक्सी लीडर हे मालवाहू जहाज जपानच्या निप्पॉन यूसेन या कंपनीकडून चालवले जात होते. या जहाजाच्या अपहरणाचा जपान सरकारने निषेध नोंदवलेला आहे. हुथी बंडखोरांशी आम्ही चर्चा करत आहोत. त्यासाठी आम्ही सौदी अरेबिया, ओमान तसेच इराणची मदत घेत आहोत. जहाज तसेच जहाजातील कर्मचाऱ्यांची सुटका व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे जपान सरकारने स्पष्ट केलेले आहे.

हुथी बंडखोर कोण आहेत?

हुथी चळवळीला अधिकृतपणे अन्सार अल्लाह म्हटले जाते आणि हुथी ही एक इस्लामिक राजकीय आणि सशस्त्र चळवळ आहे, जी १९९० च्या दशकात उत्तर येमेनमधील सादा येथून उदयास आली. हुथी चळवळ ही मुख्यत्वे झैदी शिया शक्ती आहे, ज्याचे नेतृत्व मुख्यत्वे हुथी टोळी करते. येमेनच्या उत्तरेकडील भागातील शिया मुस्लिमांची ही सर्वांत मोठी आदिवासी संघटना आहे. उत्तर येमेनमध्ये सुन्नी इस्लामच्या सलाफी विचारसरणीच्या विस्ताराला हुथींचा विरोध आहे.

हुथी बंडखोरांना इराणचा पाठिंबा

हुथी बंडखोर आणि येमेन सरकार यांच्यात साधारण दशकभरापासून गृहयुद्ध सुरू आहे. येमेनची अधिकृत राजधानी सानासह उत्तर येमेनमध्ये हुथी बंडखोरांची सत्ता आहे. हुथी हे झैदी सिया आहेत. हुथी बंडखोरांना इराणचा पाठिंबा आहे, तर येमेनचे सरकार हे इराणचे प्रतिस्पर्धी सौदी अरेबिया तसेच पश्चिमेतील देशांना पाठिंबा देते.

हुथी बंडखोरांकडे हजारो सैनिक

हुथी बंडखोर हे इस्रायलचा विरोध करतात. याच कारणामुळे हे बंडखोर पॅलेस्टिनी नागरिकांना पाठिंबा देतात. हुथी बंडखोरांकडे हजारो सैनिक आहेत. तसेच त्यांच्याकडे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, शस्त्राने सज्ज असलेले ड्रोन्स आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जहाज अपहरणाचे होणार गंभीर परिणाम?

हुथी बंडखोरांची ज्या भागावर सत्ता आहे, तो भाग इस्रायलपासून फार दूर आहे. हुथी बंडखोरांनी जहाजाचे अपहरण केल्यामुळे त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. या कृतीमुळे इराण हा देशदेखील इस्रायल-हमास यांच्या युद्धात ओढला जाऊ शकतो. इस्रायलला हुथी बंडखोरांवर हल्ला करायचा असेल तर त्यांनी डागलेल्या रॉकेट्सना सौदी अरेबिया या देशावरून जावे लागेल. यामुळे कदाचित सौदी अरेबियादेखील या संघर्षात उडी घेऊ शकतो. याच कारणामुळे हुथी बंडखोरांच्या या निर्णयाचे पडसाद काय उमटणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.