सचिन दिवाण

इराक आणि कुवेतमधील १९९१ च्या आखाती युद्धानंतर सर्वच प्रमुख देशांना युद्धभूमीचे बदलते स्वरूप लक्षात आले. शस्त्रास्त्रे आणि तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी ते वापरणारा पायदळाचा सैनिक (इन्फंट्री सोल्जर) हा आजही युद्धाच्या केंद्रस्थानी आहे. त्याला अधिक सक्षम बनवण्यासाठी अनेक देशांनी ‘सोल्जर्स मॉडर्नायझेशन प्रोग्रॅम्स’ (एसएमपी) हाती घेतले. ‘एफ-इन्सास’ हा तशाच प्रकारचा सैनिकांच्या आधुनिकीकरणाचा स्वदेशी प्रकल्प आहे. ‘फ्युचर-इन्फंट्री सोल्जर अ‍ॅज अ सिस्टीम’ या शब्दसमूहाचे ‘एफ-इन्सास’ हे लघुरूप आहे. त्याची स्वदेशी ‘इन्सास’ (इंडियन स्मॉल आर्म्स सिस्टीम) या रायफलशी गल्लत करता कामा नये.

‘एफ-इन्सास’ ही आधुनिक आणि बदलत्या युद्धक्षेत्रात पायदळाच्या सैनिकांना प्रभावीपणे लढण्यासाठी सक्षम बनवणारी यंत्रणा आहे. त्यात सैनिकांचे संरक्षण (प्रोटेक्शन), तग धरण्याची क्षमता (सस्टेनेबिलिटी), आजूबाजूच्या परिस्थितीचे अधिक सजग भान आणि आकलन असणे (सिच्युएशनल अवेअरनेस) आणि संहारक क्षमता (लिथॅलिटी) या बाबी वाढवण्यावर भर दिला आहे. नेटवर्क-सेंट्रिक वॉरफेअर आणि दहशतवाद (असिमिट्रीक वॉरफेअर) यांना तितक्याच प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी ही प्रणाली सैनिकांना मदत करते. त्यासाठी ही प्रणाली विश्वसनीय, वजनाने हलकी आणि किफायतशीर असणे गरजेचे आहे. ‘एफ-इन्सास’चे चार उप-यंत्रणांमध्ये विभाजन केले आहे. त्यात वेपन सब-सिस्टीम, बॉडी आर्मर अँड इंडिविज्युअल इक्विपमेंट, टार्गेट अक्विझिशन सब-सिस्टीम आणि कॉम्प्युटर अँड कम्युनिकेशन सब-सिस्टीम यांचा समावेश आहे.

यातील वेपन सब-सिस्टीममध्ये सैनिकांना अत्याधुनिक कार्बाइन, असॉल्ट रायफल आणि लाइट मशीनगन यांनी सज्ज करण्याची योजना आहे. त्यासाठी स्वदेशी मल्टि-कॅलिबर असॉल्ट रायफलवर संशोधन सुरू आहे. त्यातून ५.५६ मिमी, ७.६२ मिमी व्यासाच्या गोळ्या आणि अंडर-बॅरल ग्रेनेड लाँचरच्या (यूबीजीएल) मदतीने हातबॉम्ब फेकण्याची सोय असेल. या बंदुकीची नळी काही सेकंदांत बदलून वेगवेगळ्या आकारांच्या गोळ्या झाडता येतील. मात्र स्वदेशी बंदुकांच्या विकासाला विलंब होत असून त्यांच्या दर्जाबाबत खात्री मिळत नसल्याने अशा बंदुका परदेशातून विकत घेण्याची तयारी सुरू आहे. यासह सैनिकांच्या संरक्षणासाठी केवलार कृत्रिम धागे किंवा तत्सम पदार्थानी बनवलेली मोडय़ूलर बुलेटप्रूफ जॅकेट्स, हलकी आणि टिकाऊ बॅलिस्टिक हेल्मेट्स, मोडय़ूलर इंडिविज्युअल लोड-कॅरिंग इक्विपमेंट (माइल) आणि सव्‍‌र्हायव्हल किट आदी पुरवण्यात येतील. ही चिलखते शत्रूच्या शस्त्रास्त्रांपासून सैनिकांचा बचाव करतील. ती हलकी, वॉटरप्रूफ असतील, मात्र त्यातून हवा चांगली खेळती राहील. टार्गेट अक्विझिशन सब-सिस्टीममध्ये नाइट व्हिजन डिव्हायसेस, वेपन साइट्स आणि हँड-हेल्ड टार्गेट अ‍ॅक्विझिशन डिव्हाइसचा समावेश असेल. कॉम्प्युटर अँड कम्युनिकेशन सब-सिस्टीम ही अन्य सर्व यंत्रणांचे नियंत्रण आणि सुसूत्रीकरण करेल. त्यात आकाराने लहान आणि युद्धभूमीवर टिकेल असा दणकट संगणक, त्याला इंटरनेट कनेक्शन, रेडिओ डेटा लिंक, ऑडिओ हेडसेट्स, थर्मल सेन्सर्स आदींची सोय असेल. यामुळे सैनिकांना कारवायांसाठी लागणारी मोजकी आणि अचूक माहिती सहज समजेल अशा स्वरूपात मिळेल. अनावश्यक माहिती आपोआप नाहीशी होईल. इतकेच नव्हे तर शेजारील वातावरणासारख्या प्रतिमा सैनिकाच्या गणवेशावर प्रोजेक्ट करून त्याला वातावरणात बेमालूमपणे मिसळवून ‘अदृश्य’ करण्याच्याही योजना आहेत. मात्र या प्रणालीवर संशोधन पुरेशा गतीने सुरू नाही आणि ती प्रत्यक्षात येण्यास अनेक वर्षे लागतील.