दुसऱ्या महायुद्धात फ्रान्समधील डंकर्क येथे मे-जून १९४० दरम्यान नाझी जर्मनीच्या फौजांनी ब्रिटिश आणि अन्य दोस्त राष्ट्रंच्या ४ लाखांच्या आसपास सैन्याची मोठी कोंडी केली होती. महत्प्रयासाने ब्रिटनने त्यातील बहुतांश सैन्य इंग्लिश खाडी पार करून ब्रिटनमध्ये परत नेले. डंकर्कहून सैन्य परत आणताना बरीच शस्त्रे मागे सोडावी लागली होती. त्यानंतर जुलै ते ऑक्टोबर १९४० दरम्यान माघार घेणाऱ्या ब्रिटिश सैन्याचा जर्मनांनी थेट ब्रिटिश भूमीपर्यंत पिच्छा पुरवला. जर्मन लुफ्तवाफचा (हवाईदल) प्रमुख हर्मन गेअरिंगच्या विमानांनी ब्रिटनला भाजून काढले. ही लढाई ‘बॅटल ऑफ ब्रिटन’ म्हणून इतिहासात गाजली. मात्र विंस्टन चर्चिलच्या नेतृत्वाखालील ब्रिटनने मान तुकवली नाही.

या पडत्या काळात ब्रिटिश लष्कराला नव्या प्रभावी शस्त्राची तातडीने गरज भासत होती. त्यावेळी अनेक देशांत सब-मशिनगन वापरावर भर दिला जात होता. ब्रिटनही अमेरिकेकडून थॉमसन सब-मशिनगन किंवा टॉमी गन आयात करत होते. पण युद्धकाळात त्या बंदुकीच्या किंमती खूप वाढल्या. एका टॉमीगनची किंमत २०० डॉलरच्या आसपास होती. ब्रिटनला अशा लाखो बंदुकांची तातडीने गरज होती. त्यासाठी अमेरिकेला रोख पैशात किंमत भागवणे गरजेचे होते. युद्धाच्या काळात ब्रिटनची अर्थव्यवस्था आधीच कोलमडली होती आणि इतका मोठा आर्थिक व्यवहार, तोही रोकड स्वरूपात, करणे अशक्य होते. या गरजेतून स्टेन गन जन्माला आली. अशा परिस्थितीत जी काही साधने उपलब्ध आहेत त्यातून लवकरात लवकर अधिकाधिक प्रमाणात उत्पादन करता येऊ शकेल असे शस्त्र बनवणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे स्टेन गन हे मूलत: अतिशय घाई-गडबडीत तयार केलेले कामचलाऊ शस्त्र होते. पण तरीही त्याने ब्रिटनला तारले.

मेजर रेजिनाल्ड शेफर्ड आणि हॅरॉल्ड टर्पिन यांनी या बंदुकीची रचना केली. शेफर्ड यांच्या नावातील एस, टर्पिन यांच्या नावातील टी आणि ब्रिटनमदील ज्या एनफिल्ड कारखान्यात ही बंदूक तयार केली त्यातील ई आणि एन ही अक्षरे घेऊन स्टेन असे नाव तयार झाले आहे.

या बंदुकीच्या मार्क १, २, ३, ५ असा आवृत्ती तयार झाल्या. मार्क ४ चे प्रत्यक्षात उत्पादन झाले नाही. त्यात ३२ गोळ्यांचे मॅगझिन बसत असे. तिचा पभावी पल्ला १०० मीटर होता आणि एका मिनिटाला ५०० ते ६०० च्या वेगाने गोळ्या झाडल्या जात. या एका बंदुकीची किंमत केवळ १० डॉलर किंवा २.३ पौंडांच्या आसपास होती. १९४० च्या दशकात युद्धाच्या उत्तरार्धात या बंदुकांच्या साधारण ४० लाख प्रती तयार झाल्या.

कमीत कमी कच्चा माल वापरून, अल्प कालावधीत तयार झालेल्या आणि बऱ्यापैकी काम करणाऱ्या या स्टेन गनने ब्रिटनला युद्धाच्या उत्तरार्धात तारले. उबलब्ध साधनांचा पुरेपूर वापर केल्याचे उदाहरण म्हणून ही बंदूक प्रसिद्ध आहे.

सचिन दिवाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

sachin.diwan@expressindia.com