पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को-द-गामा १४९८ साली दक्षिण भारतातील कालिकत बंदरात पोहोचला. त्यानंतर अनेक युरोपीय शक्तींनी भारताच्या किनाऱ्यावर येऊन व्यापारास प्रारंभ केला. इंग्लिश, डच (वलन्देज), पोर्तुगीज (फिरंगी), फ्रेंच (फरासीस) आदी शक्तींनी भारतीय किनाऱ्यावर वखारी स्थापन केल्या. पंधराव्या शतकात कालिकतचा राजा सामुद्री (झामोरीन) याने कुंजली मराक्कर या सागरी सेनानीच्या अधिपत्याखाली आरमार उभारून पोर्तुगीजांना विरोध केला. पण त्याचा फारसा प्रभाव पडला नाही. त्यानंतर साधारण दीडशे वर्षांनी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर मराठा आरमाराचा उदय झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पश्चिम किनारपट्टीवर इंग्रज, पोर्तुगीज तसेच सिद्दीच्या आरमाराचा उपद्रव वाढला होता. सिद्दी कोकण आणि महाराष्ट्रातील नागरिक व महिलांची सागरी मार्गाने आखाती देशांत तस्करी करून गुलाम व बटीक म्हणून विक्री करत असे. पोर्तुगीजांकडून स्थानिक प्रजेवर धर्मातरासाठी अन्याय होत असे. या सर्वाचा बंदोबस्त करून किनारपट्टी व सागरी व्यापार सुरक्षित करण्यासाठी शिवछत्रपतींनी आरमार स्थापन केले. शिवाजींनी १६५७ साली आदिलशाहीकडून चेऊल ते माहुलीपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. तेथे कल्याण, भिवंडी, पेण, पनवेल या बंदरांमध्ये सुरुवातीची जहाजबांधणी करवून घेतली. नुसती जहाजेच नाही तर नाविक तळ उभारणीसाठी विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी, कुलाबा यांसारखे किल्ले बांधले. सरखेल (अ‍ॅडमिरल) मायनाक भंडारी, कान्होजी आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली समर्थ आरमाराची उभारणी झाली. त्यात अनेक सागरी दुर्ग आणि सुमारे ३०० जहाजांचा समावेश होता.

शिवकालीन व्यापारी जहाजांमध्ये मचवा, शिबाड, पाडाव, तरांडी, पगार आदी नौकांचा समावेश होता. तर युद्धनौकांमध्ये गलबत, गुराब, महागिरी, पाल, शिबाड, तरांडे, तरूस आणि पगार आदी प्रकारच्या जहाजांचा समावेश होता. गलबत साधारण ७० टन क्षमतेचे, एक ते दोन डोलकाठय़ा असलेले, शिडांचे जहाज असे. ते वल्हवण्यासाठी २० नाविक असत. गलबतावर २ ते ४ पौंडांच्या ६ ते ८ तोफा असत. त्या सर्व दिशांना वळवता येत. गुराब १५० ते ३०० टनांचे, ३ डोलकाठय़ा आणि दोन मजले असलेले जहाज असे. पाल हे सर्वात मोठे युद्धासाठीचे जहाज होते. तसेच फरगाद (फ्रिगेट) प्रकारच्या युद्धनौकाही होत्या. युद्धनौकांवर ६, ९, १२, १८, २४ आणि ४२ पौंडी तोफा असत. त्यांनी पश्चिम किनारपट्टीवर चांगलाच वचक बसवला. शिवछत्रपतींच्या आरमारातील बहुतांशी नौका किनापट्टीजवळच्या प्रदेशातील कारवायांसाठीच्या वेगवान नौका होत्या.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com

मराठीतील सर्व गाथा शस्त्रांची बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Different types of weapons part
First published on: 16-06-2018 at 01:05 IST