वॉशिंग्टन येथे १९२२ साली झालेल्या नाविक करारानुसार युद्धनौकांच्या वजन आणि आकारावर मर्यादा घातल्या होत्या. पण १९३५ पर्यंत जपान, अमेरिका, जर्मनी आदी सर्वच प्रमुख देशांनी ही बंधने झुगारून पुन्हा मोठय़ा युद्धनौका बांधण्यास सुरुवात केली होती. जर्मनीच्या बिस्मार्क आणि टर्पिट्झ या सुपर ड्रेडनॉट्सनंतर मोठय़ा युद्धनौकांच्या विकासाचा हा परमोच्च बिंदू होता. तेथून त्यांच्या उतरत्या काळास प्रारंभ झाला. पाणबुडय़ा आणि विमानवाहू नौकांनी त्यांचे स्थान विचलित केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जपानने १९३७ आणि १९३८ साली अनुक्रमे यामाटो आणि मुसाशी नावाच्या मोठय़ा युद्धनौका बांधण्यास सुरुवात केली. त्यापैकी यामाटो १९४० साली तयार झाली. तिची लांबी ८४० फूट आणि वजन ६२,३१५ टन होते. यामाटो २५०० नौसैनिकांसह ताशी २७ नॉट्सच्या वेगाने प्रवास करू शकत असे. यामाटोवर ४६० मिमी (१८.१ इंच) व्यासाच्या तोफा होत्या. त्या ब्रिटिश युद्धनौकांवरील १४ इंची तोफांपेक्षा दुप्पट वजनाचा गोळा ४२ किलोमीटर अंतरावर डागू शकत. मात्र दुसऱ्या महायुद्धात यामाटो आणि मुसाशी दोन्ही युद्धनौका त्यांच्या पूर्ण क्षमता सिद्ध करण्यापूर्वीच अमेरिकी हवाई बॉम्बहल्ल्यात नष्ट झाल्या. ७ एप्रिल १९४५ रोजी यामाटोवर सहा बॉम्ब पडले आणि साधारण ९ ते १३ टॉर्पेडोंचा मारा झाला.

अमेरिकेच्या साऊथ डकोटा वर्गातील चार युद्धनौका १९४० च्या दशकाच्या सुरुवातीला तयार झाल्या. त्यापैकी अलाबामा ही १९४२ साली तयार झालेली युद्धनौका ३७,९७० टन वजनी होती. तिच्यावर १६ इंची तोफा होत्या. त्यांनी १९४२ ते १९४५ या जपानवरील हल्ल्यात चांगली कामगिरी केली.

अमेरिकेच्या आयोवा वर्गातील युद्धनौका सर्वात सुधारित आणि अखेरच्या टप्प्यापर्यंत वापरात राहिलेल्या मोठय़ा युद्धनौका होत्या. त्यांची बांधणी १९३८ साली सुरू झाली. त्यात आयोवा, न्यूजर्सी, मिसुरी आणि विस्कॉन्सिन यांचा समावेश होता. मिसुरी १९४४ साली तयार झाली. साऊथ डकोटा वर्गातील नौकापेक्षा या नौका १०,००० टन अधिक वजनदार आणि ५.५ नॉट्सनी अधिक वेगवान होत्या. त्यावर १६ इंची तोफा होत्या. त्यांनी जपानच्या पराभवात महत्त्वाची भूमिका बजावली. २ सप्टेंबर १९४५ रोजी मिसुरी युद्धनौकेच्या डेकवर जपानच्या अधिकृत शरणागतीचा कार्यक्रम पार पडला. दुसऱ्या महायुद्धानंतर मिसुरी पर्ल हार्बर येथे जतन करून ठेवण्यात आली. १९५५ साली निवृत्त झालेली ही युद्धनौका १९८६ साली पुन्हा सेवेत घेऊन १९९२ साली निवृत्त करण्यात आली.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com

मराठीतील सर्व गाथा शस्त्रांची बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Different types of weapons part
First published on: 13-07-2018 at 00:57 IST