सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणावरून दुसऱ्या पत्नीचा चाकूने सपासप ३६ वार करून निर्घृण खून केल्यानंतर पती चाकूसह पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्वागतनगर परिसरात ही घटना घडली. यास्मीन सैफन शेख (वय ४०) खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा खून केल्यानंतर पती सैफन मोहिद्दीन शेख (वय ४९, रा. किरणनगर, स्वागतनगर, सोलापूर) हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्ह्यात वापरलेल्या आणि रक्ताने माखलेल्या चाकूसह हजर होऊन स्वतःहून गुन्ह्याची फिर्याद दिली.
सैफन शेख यास तीन पत्नी असून त्यापैकी मृत यास्मीन ही दुसरी पत्नी होती. तिला सैफन याने अशोक चौकाजवळील पाथरूट चौकात एका भाड्याच्या घरात ठेवले होते. तिला मिसबाह नावाची अल्पवयीन मुलगी आहे. आरोपी सैफन याने दिलेल्या प्रथम खबरीनुसार त्याची पत्नी यास्मीन रात्री स्वागतनगराजवळील पतीच्या दुसऱ्या घरात येऊन आर्थिक कारणावरून भांडण करू लागली. जवळच्या केंगनाळकर विटभट्टीजवळ पुन्हा भांडण झाले. ७० हजार रुपये दे, देणेकऱ्यांनी लकडा लावला आहे. आजच पैसे दे म्हणून वाद घालत असताना तिने रागाच्या भरात सैफनच्या कानाखाली लगावली. तेव्हा चिडलेल्या सैफन याने डाव्या कंबरेखाली खोचून ठेवलेला चाकू बाहेर काढून तिला भोसकले. पोटावर, मानेवर, चेहऱ्यावर, दोन्ही हातांवर मिळून सपासप ३६ वार झाल्याने ती जागेवरच गतप्राण झाली.
हेही वाचा – श्रीकांत शिंदे म्हणतात, संजय राऊतांच्या उपचाराचा खर्च आम्ही करू
तथापि, मृत यास्मीनची मुलगी मिसबाह हिने दिलेल्या माहितीनुसार वडील सैफन यांनी आई यास्मीनला अक्कलकोटला मित्राच्या घरी साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी जायचे आहे म्हणून बोलावून घेतले. तिला मारहाण होत असताना तिने मिसबाह यास व्हिडिओ फोनद्वारे संपर्क साधून आपणास घरी मारहाण होत असल्याचे सांगून तत्काळ स्वागत नगरात येण्यास सांगितले. व्हिडीओ फोनवर आईला मारहाण होतानाचा आवाज ऐकू येकू येत होता. वडील आणि दोन्ही पत्नींसह चार-पाचजणांनी मिळून आईचा खून केल्याची शंका तिने व्यक्त केली.