कोल्हापूर: गेल्या चार महिन्यांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे यंदा ऐन गणेशोत्सवात फूलशेती कोमेजली आहे. राज्यात सर्वत्र फुलांच्या उत्पादनात तब्बल ३० टक्के घटले असून बाजारात फुलांच्या दरातही दुपटीने वाढ झाली आहे. बुधवारी घरोघरी, तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना होणार आहे. दहा दिवसांच्या या पाहुण्याचे पूजन मनोभावे करण्यासाठी लगबग दिसत आहे. गणेशाची पूजा, सजावट यासाठी विविधरंगी फुलांना मोठी मागणी असते. या मागणीचा विचार करूनच शेतकरी गणेशोत्सवाच्या हिशेबाने झेंडू, शेवंती, जर्बेरा, ॲस्टर, निशिगंध, गुलाब आदी फुलांची लागवड करतात. या लागवडीच्या हिशेबाने ऐन गणेशोत्सवात या फुलांचे उत्पादन सुरू होऊन फुले बाजारात येतात आणि शेतकऱ्यांना चार पैसे मिळतात.

मात्र, यंदा पाठ धरलेल्या पावसामुळे या फूलशेतीत विघ्न निर्माण झाले आहे. या वर्षी मे महिन्याच्या उत्तरार्धापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर मधला काही काळ वगळता सतत पाऊस पडत राहिला. पावसामुळे फुलांचे उत्पादन तब्बल २५ ते ३० टक्क्यांनी घटले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. परिणामी बाजारात फुलांची आवक कमी झाली असून, त्यांचे दर गतवर्षीच्या तुलनेत दीड पटीहून अधिक वाढले आहेत.

पावसाचा नेमका परिणाम काय?

या वर्षी पावसाची संततधार कायम राहिली. सलग पावसामुळे झेंडूसारखी फुले लवकर खराब झाली आहेत. शेवंती तग धरून राहत असली, तरी त्यांचा दर्जा बिघडला आहे. प्रगत शेतीमध्ये उत्पादनवाढीसाठी फुलांना पाण्यातून खत दिले जाते. अशी खते संततधार पावसामुळे वाहून गेली आहेत. रोगराईपासून बचाव करण्यासाठी औषधफवारणी करूनही त्याचा फायदा मिळलेला नाही. अशातच करपा रोगामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. या सगळ्यांच्या परिणामस्वरूप यंदा फुलांच्या उत्पादनात मोठी घट आल्याचे फूलउत्पादकांचे म्हणणे आहे.

दरांमध्ये वाढ

उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याने बाजारातील फुलांचे दर दुपटीवर गेले आहेत. गुलाबाच्या २० फुलांच्या एका जुडीचा दर १६० वरून २८० रुपये, झेंडू प्रतिकिलो १०० वरून १४० ते १६० रुपये, शेवंतीचा दर २०० वरून ३०० रुपये किलोवर पोहोचला आहे. दर वाढले असले, तरी घटलेल्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

मावळ भागात ‘पवना संस्कृती फार्मर्स प्रोड्युसर कंपनी’च्या माध्यमातून ७० एकरवर ४१२ शेतकरी गेली तीन वर्षे गुलाब फुलवत आहेत. या वर्षी सततच्या पावसाने गुलाबाचे उत्पादन ३० टक्के घटले आहे. गेल्या वर्षी आमच्याकडून दररोज एक लाख फुले बाजारात पाठवली जात होती. या वर्षी हे प्रमाण ७० हजारांपर्यंत घसरले आहे. – जयसिंग हुलावळे, अध्यक्ष, पवना संस्कृती फार्मर्स प्रोड्युसर कंपनी

शेवंती, झेंडू, बटण गुलाब या तिन्ही फुलांचे किलोला असलेले दर दुप्पट झाले असले, तरी उत्पादनामध्ये मोठी घट झाली आहे. सततच्या पावसाने फुले शेतातच खराब झाली आहेत. फुले हे नाजूक उत्पादन असल्याने आणि त्याच्या दर्जाला महत्त्व असल्याने खराब फुले शेतातच सोडून द्यावी लागली आहेत. कर्नाटकातील शेतकरीही गणेशोत्सवात त्यांच्याकडील फुलांचे उत्पादन महाराष्ट्रात विक्रीसाठी आणतात. या स्पर्धेचाही फटका बसत आहे. – सचिन सफाळे, फूलउत्पादक, कोल्हापूर

जुन्नर परिसरात विविध रंगांतील शेवंती फुलाचे उत्पादन आम्ही घेतो. गणेशोत्सवाचा विचार करत हे उत्पादन घेतलेले होते. मात्र, यंदा सततच्या पावसाने उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घट आली आहे. यंदा जे उत्पादन मिळाले, ते मुंबईच्या दादर बाजारात पाठवले आहे. त्यास वाढीव दर मिळाला असला, तरी उत्पादनातील घट पाहता नुकसान झाले आहे. अक्षय धोंडकर ,फूलउत्पादक-अभ्यासक, जुन्नर