Ganesh Chaturthi 2025 Murti Sthapana Samagri List : अखेर तो दिवस आला. उद्या गणपती बाप्पा आपल्या लाडक्या भक्तांच्या घरी, तर सार्वजनिक मंडपात विराजमान होणार. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी ‘श्री गणेश चतुर्थी’ साजरी केली जाते. या सणानिमित्त बाजारात खरेदीसाठी लगबग दिसून येते. बाप्पाच्या आगमनासाठी वेळेत डेकोरेशन पूर्ण करण्याची धावपळ, तर दुसरीकडे बाप्पाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेची तयारीही सुरूच असते. मग घरातील प्रत्येक मंडळी एकमेकांना हे आणायचं राहिलं, ते येताना आणतेस का असं कॉल करून सांगत असतात. तर जर तुमच्याही घरी गणपती बाप्पा विराजमान होणार असतील आणि तुम्हीही बाजारात सामान आणायला गेला असाल तर ही यादी फक्त तुमच्यासाठी आहे.
प्रतिष्ठापना पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पुढीलप्रमाणे…
१. गणपती बाप्पाला विराजमान केल्यावर चौरंगावर किंवा पाटावर ठेवण्यासाठी वस्त्र, तर दाराबाहेर काढण्यासाठी रांगोळी.
२. पूजेसाठी लागणारे महत्त्वाचे साहित्य म्हणजे निरांजन, उदबत्ती, समई, धूप, कापूर, वाती, आरतीचे ताट.
३. पाच फळे, सुपारी, नारळ, विड्याची पाने, सुक्या खोबऱ्याची वाटी व त्यात ठेवायला गूळ, सुट्टे पैसे.
४. पूजेच्या ठिकाणी ठेवण्यासाठी कलश, पाणी व आंब्याची पाने.
५. निवडलेल्या दुर्वांची २१-२१ ची जुडी.
६. गणपतीची मूर्ती सजवण्यासाठी व बाप्पाला आवडतात म्हणून लाल जास्वंदाची फुले, सुगंधित फुले, दुर्वा.
७. पूजेदरम्यान श्लोक म्हणण्यासाठी अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र, आरतीचे पुस्तक.
८. मूर्तीला अर्पण करण्यासाठी जानवे, कार्पासवस्त्र (कापसाचे व्रस्त्र) आणि पूजेसाठी दोन ताम्हण, तीन पोफळे.
९. अभिषेक करण्यासाठी पंचामृत, सुगंधित जल, शुद्ध पाणी, अष्टगंध, हळद, कुंकू आणि अक्षता.
१०. गणपती बाप्पाला अभिषेक करण्यासाठी दूध, दही, तूप, मध आणि साखरेपासून बनवलेले पंचामृत.
गणपती बाप्पा घरात येणार म्हटल्यावर मोदक बनवले जाणार आणि बाप्पाला भेटायला येणाऱ्या मंडळींनासुद्धा प्रसाद दिला जाणार; तर यासाठी तुम्हाला खरेदी करायची असेल तर पुढील गोष्टी आठवणीने घ्या…
१. पेपर प्लेट्स
२. द्रोण आणि पत्रावळ्या
३. पाणी किंवा थंड पेय पिण्यासाठी ग्लास
४. चमचे
५. फुटाणे, मिक्स ड्रायफ्रूट्सचे पाकीट, लाडू, चिवडा
६. नैवद्य ठेवण्यासाठी केळीचे पान (तुम्हाला नैवेद्याच्या पानाचे छोटंसं रेडिमेड ताटसुद्धा बाजारात मिळून जाईल).
७. मोदक बनवण्यासाठी रव्याचे पीठ, मोदकाचे साचे, खोबरं.
८. गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापनेची पूजा झाल्यानंतर प्रथम आरती करताना टाळ घ्यायचं असेल तर ते सुद्धा आवर्जून घ्या.
या यादीतील अनेक गोष्टी तुमच्या घरीसुद्धा उपलब्ध असतील, तर काही गोष्टी तुम्हाला बाजारातून आणाव्या लागतील. अजून काही तास बाकी आहेत, त्यामुळे मूर्ती स्थापनेआधी या सगळ्या वस्तू पूजेसाठी घरी आणून ठेवा, म्हणजे तुमचा वेळही वाचेल आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापनेची पूजा अगदी वेळेत होईल.