Ganesh Chaturthi 2026 Date: गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या! असं म्हणत मुंबई- पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक भाविकांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला. २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या अकरा दिवसात बाप्पाच्या गजरात सारी सृष्टी दुमदुमली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. बाप्पाला निरोप देताना आतापासूनच भाविकांमध्ये पुढच्या वर्षी बाप्पा कधी येणार याचे कुतुहूल आहे. आपल्या मनात बाप्पाने पुढच्या वर्षी लवकरात लवकर यावे अशी इच्छा असली तरीही २०२६ मध्ये बाप्पाचे आगमन यंदापेक्षा थोडे उशिरा होणार आहे.
२०२६ मध्ये बाप्पा कधी येणार?
हिंदू दिनदर्शिकेनुसार पुढील वर्षी म्हणजे २०२६ मध्ये बाप्पा सप्टेंबरच्या मध्यात आपल्या घरी येतील. १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन होईल तर २५ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असेल. त्यामुळे यंदाच्या तारखेनुसार मोजल्यास पुढील वर्षी बाप्पाच्या आगमनासाठी भाविकांना १८ दिवस जास्त वाट पाहावी लागणार आहे. तसेच पुढच्या वर्षी १७ सप्टेंबर रोजी गौरी आवाहन आणि १८ सप्टेंबर रोजी गौरी पूजन केले जाईल.
गणेश चतुर्थीचे महत्व
पौराणिक मान्यतेनुसार, ज्या दिवशी महादेव शंकर आणि माता पार्वती यांचे पुत्र श्री गणेश जन्माला आले, त्या दिवशी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी होती. म्हणून या दिवसाला गणेश चतुर्थी आणि विनायक चतुर्थी म्हणून ओळखले जाते. श्रीगणेशाच्या पूजेमुळे घरात सुख, समृद्धी आणि भरभराट होते. कोणत्याही शुभकार्यात विघ्न येऊ नये म्हणून गणेशाची आराधना करतात.
गणेश चतुर्थी का साजरी केली जाते?
हिंदू पौराणिक कथेवर आधारित भगवान गणेश भगवान शिव आणि देवी पार्वतीचा पुत्र असल्याचे मानले जाते. गणेश चतुर्थी हा दिवस गणपतीच्या जन्माचा उत्सव आहे. त्यामागची कथा निश्चित आपण अनेकदा ऐकली असेल. पौराणिक कथेनुसार, या दिवशी माता पार्वती स्नानासाठी जाताना आपल्या अंगावरील मळापासून एका लहानशा मुलाची मूर्ती तयार करते आणि त्यात प्राण ओतते. या लहान मुलाला देवी पार्वती आपले स्नान होईपर्यंत आपल्या कक्षाबाहेर पहारा देण्यास सांगते आणि कोणालाही आत प्रवेश न देण्याची सूचना देते. त्याप्रमाणे हा मुलगा आपल्या मातेच्या आज्ञेचे पालन करतो आणि कक्षाबाहेर पहारा देत असतो. त्याच वेळी देवी पार्वतीचे पती महादेव देवी पार्वतीला भेटण्यासाठी तिथे येतात. त्या क्षणी गणेश आणि महादेव दोघेही एकमेकांना ओळखत नसतात. गणेश आपला पुत्र आहे हे भगवान शंकर यांना माहीत नसते आणि महादेवच आपले पिता आहेत हे गणेश यांना माहीत नसते. त्यामुळे तो लहान मुलगा महादेवांना माता पार्वतीच्या कक्षात प्रवेश करण्यास मनाई करतो. महादेवदेखील ते मान्य करत नाही आणि हा लहान मुलगादेखील मागे हटत नाही. महादेवांना राग अनावर होतो आणि दोघांमधील वाद टोकाला जातो आणि शंकर आपल्या त्रिशूळाने त्या मुलाचे शिर धडापासून वेगळे करतात. तोपर्यंत माता पार्वती स्नान आटोपून बाहेर येते आणि आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून अत्यंत दुःखी व संतप्त होते. आपल्या मुलाला पुन्हा जिवंत करण्याचा हट्ट ती भगवान शंकराकडे धरते. त्यावेळी, भगवान शंकर त्याच्या देवतांना उत्तर दिशेला सर्वांत पहिल्यांदा जो प्राणी दिसेल त्याचे डोके आणण्यास सांगतात. त्यानुसार देवतांना हत्तीचे डोके सापडते. अखेर भगवान शंकर ते हत्तीचे डोके त्या लहान मुलाच्या धडाला जोडतात आणि श्रीगणेश पुन्हा जिवंत होतात, अशी ही यामागील दंतकथा प्रसिद्ध आहे.