“आमच्यावरचं ईडीचं संकट विघ्नहर्ता बाप्पा नक्की दूर करेल” असा विश्वास आपल्याला असल्याचं शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी म्हटलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या घरी आज गणपतीचे आगमन झाले. प्राणप्रतिष्ठा आणि पूजा झाल्यानंतर त्यांना ईडीबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी हे विघ्न दूर होईल असा विश्वास व्यक्त केला.

मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेश जोशी यांची काही दिवसांपूर्वी कोहिनूर मिल प्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही या प्रकरणी चौकशी करण्यात आली. २०११ मध्ये उन्मेश जोशी यांच्या कंपनीकडून ५०० कोटींची जागा घेण्यात आली. मात्र या व्यवहाराची नोंदणी २०१७ मध्ये करण्यात आली. हा व्यवहार संशयास्पद असल्याचं ईडीच्या सूत्रांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा – माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हिंदुजा रुग्णालयात दाखल, उद्धव ठाकरेंकडून प्रकृतीची विचारपूस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचमुळे ईडीने उन्मेश जोशी आणि राज ठाकरे यांची चौकशी केली. याबाबत मनोहर जोशी यांना विचारलं असता, “आमच्यावरचं ईडीचं विघ्न बाप्पा दूर करेल” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उन्मेशच्या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशावरही भाष्य केलं. “छगन भुजबळ हे एक चांगला कार्यकर्ता आहेत. भुजबळ कामाला लागले की ते चांगलं काम करतात. त्यांना शिवसेनेत पुन्हा घ्यायचं की नाही हा निर्णय पक्षप्रमुखांचा आहे. पक्षप्रमुखांचा निर्णय अंतिम असतो त्यापुढे कोणीही जात नाही” असंही जोशी यांनी स्पष्ट केलं.