How To Make Eco Friendly Ganpati With Clay : गणेशोत्सव आला की बाप्पाला घरी आणण्याचा आनंद काही वेगळाच असतो. गणेश चतुर्थीचा उत्सव हा दर वर्षी संपूर्ण देशात जल्लोषात साजरा केला जातो. यादिवशी लोक आपल्या घरी गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करतात. तर यंदा यावर्षी गणेश चतुर्थी २७ ऑगस्ट २०२५ रोजी असणार आहे. अनेकजण काही महिन्यांपूर्वीची बाप्पाची मूर्ती विकत घेतात. पण, या मुर्त्यांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजेच पीओपीच्या सुद्धा मुर्त्या असतात. अशा वेळी तुम्ही बाजारातुन मुर्ती विकत न घेता घरच्या घरी मातीच्या मदतीने, स्वतःच्या हाताने बाप्पाची मुर्ती घरीच तयार करू शकता… आज आम्ही तुम्हाला पर्यावरणपुरक गणपती बाप्पाची मुर्ती बनवण्याच्या सोप्या स्टेप्स या बातमीतून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत…
गणपती बनवण्यासाठी लागणारे साहित्य…
शुद्ध मातीचे पाणी
खोबरेल तेल किंवा तूप
टूथपिक किंवा पेन
सजावटीसाठी फुले, हळद आणि कुंकू
अशा प्रकारे तयार करा तुमचा लाडका गणपती बाप्पा…
१. गणपती बाप्पाची मुर्ती घरी तयार करण्यासाठी सर्वात आधी माती घेऊन त्यात थोडं थोडं पाणी टाका आणि छान मळून घ्या. माती अगदी मऊसर, गुळगुळीत झाल्यानंतर त्या मातीचा एक छोटा गोळा करून प्लेटमध्ये ठेवा. हाच तुमच्या मूर्तीचा पाया असणार आहे.
२. यानंतर दुसरा थोडा मोठा गोळा करून तुम्ही तयार केलेल्या मूर्तीच्या पायावर ठेवा. म्हणजे बाप्पाचे पोट तयार होईल. मग वरती थोडा लहान गोळा ठेवून डोके तयार करायचं. आता सोंड बनवण्यासाठी मातीचा लांब रोल तयार करा आणि चेहऱ्याला लावा. अशाप्रकारे मातीचे चार रोल हातासाठी आणि दोन पायासाठी तयार करुन जोडून घ्या.
३. आता गणपतीचे डोळे आणि दागिने तयार करायला घ्या. डोळे बनवण्यासाठी टूथपिक किंवा पेनची टोक वापरू शकता. दागिने न वापरता हळद, तांदूळ किंवा छोटे फुलं सुद्धा वापरू शकता. मूर्तीला उन्हात वाळल्यानंतर तिची सजावट फुलं, पानं, हळद-कुंकूने करा. अशा प्रकारे घरच्या घरी छानशी गणपती बाप्पाची मूर्ती तयार होईल.