Lalbaugcha Raja : गणेश उत्सवला २७ ऑगस्टपासून सुरुवात होते आहे. मुंबईत सर्वाधिक चर्चा होते ती लालबागचा राजा गणेशाची. या वर्षी राजाच्या उत्सवाचं ९२ वं वर्ष आहे. राजाचा दरबार ५० फूट उंच करण्यात आला आहे. तसंच विशेष बाब म्हणजे लखनऊहून आलेल्या मुस्लिम कारागीरांनी गणपतीच्या मंडपासमोरचा मखमली पडदा शिवला आहे.गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी अनेक राजकारणी आणि सेलिब्रिटी येत असतात. लालबागचा राजाचे मुख-दर्शन आणि नवसाची रांगही चर्चेचा विषय असतो.
दोन दिवसांपूर्वी राजाचा फर्स्ट लूक आला समोर
दोन दिवसांपूर्वी लालबागच्या राजा गणेश मूर्ती समोरचा समोरचा मखमखली पडदा दूर झाल्यानंतर गणपतीचे पहिले दर्शन झाले. हा मखमखली पडदा मुस्लीम कारागिरांनी शिवला आहे. लालबाग राजाच्या मूर्तीच्या ५० फूट उंच मंडपासमोरील मखमली पडदा घडवण्याचे काम उत्तर प्रदेशमधील मुस्लिम कारागिरांनी केले आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सुधीर साळवी यांनी लोकसत्ता ऑनलाइनला दिली.
५० फूट उंच आणि रुंद मखमली पडदा तयार करायला किती दिवस लागले?
५० फूट उंच आणि रुंद पडदा तयार करताना त्याच्या निऱ्या बसवलेला घेरही तब्बल आठ फुटाचा आहे. लखनऊहून आलेले खान चाचा चार दिवसांहून अधिक काळ या पडद्यासाठी मशीनवर झटत होते. लालबागचा राजा समोरील भव्य पडदा हा हा हिंदू-मुस्लीम सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवणारा आणि श्रद्धेला धर्म नसतो, हा संदेश देणारा आहे. लालबागच्या राजाचा यंदाचा दरबार तिरुपती बालाजीचा सुवर्णराज मुकुटात बसवण्यात आला आहे. त्यासाठी खास ‘सुवर्ण गजानन महल’ साकारण्यात आला आहे. लालबागच्या राजाची वात्सल्य मूर्ती सुवर्ण अलंकारांनी सजवण्यात आली आहे. यंदा प्रथमच लालबागच्या राजाच्या दरबाराची उंची ही तब्बल ५० फूट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २० हजारांचा फौजफाटा
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत २० हजार पोलिसांचा फौजफाटा सज्ज झाला आहे. गणेशोत्सव काळात संवेदनशील ठिकाणांवर सीसीटीव्ही, ड्रोनद्वारे पोलिसांचा वॉच असणार आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी भाविकांच्या गर्दीत साध्या गणवेशातील पोलीस लक्ष ठेवून असणार आहेत. मुंबईत लालबाग, परळ, गिरगाव, खेतवाडी, अंधेरी, चिंचपोकळी, विलेपार्ले, डोंगरी, उमरखाडीसह विविध ठिकाणी बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. यासाठी पोलिसांकडून गणेशोत्सव मंडळासोबत बैठका घेत मार्गदर्शन करण्यात आले आहे. संवेदनशील ठिकाणी मिरवणूकदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी साध्या गणवेशातील पोलिसांची नजर असणार आहे.