Ganpati Decoration Ideas For Home : यंदा २७ ऑगस्ट २०२५ रोजी घरोघरी बाप्पा विराजमान होतील, त्यामुळे सर्वत्र बाप्पाच्या आगमनासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. मंडळात, घरात बाप्पाचे आगमन होणार म्हटल्यावर त्यांच्या स्वागतासाठी खास सजावट तर झालीच पाहिजे. पण, नोकरी, अभ्यास सांभाळून तयारी करायची तरी कशी असा प्रश्न सगळ्यांसमोरच उभा असतो. तर आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आज आम्ही तुमच्यासाठी काही सजावटीच्या कल्पना घेऊन आलो आहोत; ज्या कदाचित तुम्ही एका दिवसातसुद्धा करू शकता. तुम्हाला अजूनही सजावटीसाठी काहीच सुचत नसेल आणि पर्यावरणाचे संरक्षण करावयाचे असेल तर तुम्ही पुढील काही पर्यायांचा विचार करू शकता.
१. द्रोणचे डेकोरेशन
पानांचे द्रोण, पत्रावळींचा वापर करून पारंपरिक आणि कलात्मक सजावट करता येते. हे पर्यावरणपूरक असल्यामुळे प्लास्टिकचा वापर टाळता येतो आणि पर्यावरणाचे रक्षण करता येते. तुम्ही जिथे बाप्पाची मूर्ती बसवणार आहात, त्या भिंतीवर एखादे प्लेन कापड लावा. पत्रावळ्या, द्रोण कापडाला धाग्यांनी शिवून घ्या आणि भिंतीला लावून घ्या. अशाप्रकारे तुमचे डेकोरेशन तयार.

२. फुलांच्या माळा
तुमच्याकडे वेळ नसेल आणि अगदी साधं सोपं डेकोरेशन दीड दिवसाच्या बाप्पासाठी करायचं असेल तर तुम्ही एक प्लेन कापड किंवा अगदी नक्षीकाम, काठापदराची गडद रंगाची साडी भिंतीला लावू शकता आणि गणपतीच्या चारही बाजूनं फुलांच्या माळा सोडू शकता.

३. जास्वंदाचे फूल आणि पान
पांढऱ्या रंगाचा एक मोठा कार्ड पेपर घ्या, त्यावर जास्वंदाचे चित्र काढा, त्याला लाल रंग द्या. तर हिरव्या रंगाचा क्राफ्ट पेपर घेऊन त्यावर पानांचे चित्र काढून कापून घ्या; जास्वंदाचे फूल व हिरव्या रंगाचे पान तयार. वॉलशीटचा वापर करा आणि टाचण्यांच्या सहाय्याने, गणपतीच्या अगदी मागच्या बाजूला मधोमध जास्वंदाचे फूल चिटकवून घ्या. अशाप्रकारे तुमचे डेकोरेशन तयार.

४. फ्रिजच्या पुठ्ठयापासून बनवा डेकोरेशन
थर्माकोल वापरायचा नसेल तर तुम्ही फ्रिजच्या पुठ्ठ्यापासून फोटोत दाखवल्याप्रमाणे राजेशाही मखर बनवू शकता. यासाठी पुठ्ठा तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कापून घेऊ शकता. फोटोत छोट्या छोट्या खिडक्या बनवून घेतल्या आहेत. प्रत्येक खिडक्यांमध्ये सीरियल लाईट्सचा एक बल्ब येईल अशी रचना करून घेतली आहे. बाजूला सोनसळी डिझाइन असलेले स्तंभ आहेत, ज्यामुळे सजावट अजून राजेशाही दिसते आहे. तसेच या सगळ्याला छोटे आरसे व चमकदार काचांनी सजावट केली आहे, त्यामुळे फ्रिजच्या पुठ्ठ्यापासून बनवलेलं हे डेकोरेशन अगदी देवळासारखे दिसेल.

५. टोकदार मनोरे
भिंतीला रंगीबेरंगी कपड्यांचे पडदे लावून घ्या आणि फोटोसारखे टोकदार मनोरे बनवण्यासाठी वेगवेगळ्या आकाराचे पुठ्ठे घ्या. पुठ्ठे तुम्ही गोदामामधून घेऊ शकता. त्यानंतर वेगवेगळ्या आकाराच्या या मनोऱ्यांना दोन रंगाचे कागद लावा. फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही केशरी आणि चंदेरी कागद लावू शकता. त्यावर हिरव्या व गुलाबी सीरियल लाईट्स लावून चमक आणा. सजावटीदरम्यान तुम्ही लाइटिंग व फोकसचा वापरसुद्धा करू शकता; ज्यामुळे डेकोरेशन आणखीन उठून दिसेल.

६. आणखीन कल्पना हव्या असतील तर तुम्ही कापसापासून अशा सुंदर सजावट करू शकता. एका मोठ्या पुठ्ठ्यावर आकाशासारखे चित्र काढा आणि गणपतीच्या अगदी मागे ठेवा आणि गणपतीच्या वर कापूस लावून फोटोत दाखवल्याप्रमाणे सजावट करा.

७. यंदा तुमच्या घरच्या गणपती बाप्पाचे २५ वे वर्ष असेल तर तुम्ही खाली दाखवल्याप्रमाणे सजावट करू शकता. कागदावर “वर्ष २५ वे” आणि “गणपती बाप्पा मोरया” लिहून कात्रीने प्रत्येक अक्षर आणि अंक कापून घ्या. एका धाग्यात ‘गणपती बाप्पा मोरया’ ही सगळी अक्षरे लावून तोरणासारखी टेबलावर लावून घ्या. त्यानंतर “वर्ष आणि २५ वे” असे डावी आणि उजवीकडे मखराच्या दोन्ही बाजूला लावून घ्या.

सजावटी दरम्यान तुम्ही लाइटिंग व फोकसचा वापर सुद्धा करू शकता ; ज्यामुळे डेकोरेशन आणखीन उठून दिसेल.