एकत्र येणे, आपली कला, विचार मांडण्यासाठी व्यासपीठ मिळवून देणे यांसारखे सार्वजनिक गणेशोत्सवामागचे हेतू सध्या पुण्यातील सोसायटय़ांच्या गणेशोत्सवामध्ये पाहायला मिळत आहेत. पुण्यातील चौकाचौकांमध्ये असणाऱ्या गणेशोत्सव मंडळांइतकाच रहिवासी सोसायटय़ांमध्येही गणेशोत्सव दिमाखात आणि उत्साहात साजरा होत आहे. सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये कमी झालेले सांस्कृतिक कार्यक्रम आता सोसायटय़ांच्या गणेशोत्सवामध्ये पाहायला मिळत आहेत.
पुण्यातील सोसायटय़ांमध्येही गणेशोत्सव उत्साहाने साजरा होत आहे. एरवी आपले काम, नोकरी, यांमुळे शेजाऱ्यालाही न भेटणारी कुटुंबे दहा दिवस एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करत आहेत. दहा दिवस सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा असा भरगच्च कार्यक्रम सोसायटय़ांमध्ये आहे. सजावट आणि मिरवणुकांमध्येही सोसायटय़ा मागे नाहीत. अनेक सोसायटय़ांनीही एखादा विषय घेऊन देखावे उभारले आहेत. तयार देखावे विकत आणण्यापेक्षाही सोसायटीतील सदस्यांनीच एकत्र येऊन देखावे करणे पसंत केले आहे. रस्त्यावर मिरवणुका काढण्याऐवजी आपल्या सोसायटीमध्येच पण एखाद्या मोठय़ा मंडळाला तोडीस तोड अशा मिरवणुकाही सोसायटय़ांमध्ये काढल्या जात आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे सोसायटय़ांचा कल आहे. चौकातल्या गणेशोत्सवामध्ये सहभागी न होणाऱ्या पांढरपेशी वर्गाची आपल्या सोसायटीच्या गणेशोत्सवाशी खूप जवळीक दिसत आहे.
कोथरूड येथील अजंठा अव्हेन्यू सोसायटीमध्ये दिवेघाटातून जाणाऱ्या वारीचा देखावा उभारण्यात आला आहे. सोसायटीमध्ये राहणारे जवळपास पाचशे लोक एकत्र येऊन या सोसायटीचा गणेशोत्सव साजरा करतात. सोसायटीमध्येच विसर्जनाची मिरवणूक काढली जाते. बाहेरच्या पथकांबरोबरच सोसायटीचे स्वत:चेही वाद्यपथक आहे. यावर्षी सरोद फ्यूजन, ऑर्केस्ट्रा, नाटय़संगीताचा कार्यक्रम, सोसायटीतील सदस्यांची विविध गुणदर्शन स्पर्धा, सदस्यांनी एकत्र येऊन बसवलेल्या नाटकांचे प्रयोग असे कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती अजंठा अव्हेन्यूचे सांस्कृतिक सरचिटणीस अतुल बापट यांनी सांगितले. कोथरूड येथील गुरूगणेश सोसायटीमध्येही सोसायटीचे अध्यक्ष पंडित यादवराज फड यांच्या नेतृत्वाखाली अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, फन फेअर, पाककृती स्पर्धा असे अनेक उपक्रम होणार आहेत. उत्सवाच्या माध्यमातून नवे कलाकार आणि कार्यकर्ते घडवण्याचे काम गुरूगणेश नगर करत आहे. सोसायटीतील गणेशाचे भूगाव येथे विसर्जन केले जाते आणि त्यासाठी सोसायटीतील सर्व कुटूंबीय दरवर्षी एकत्र भूगावला जातात. विसर्जनानंतर भूगावच्या तळ्याकाठी पिठलं, भाकरी, ठेचा असा श्रमपरिहारही होतो.
पाषाण येथील ओजस सोसायटीमध्ये राहणाऱ्या विविध वयोगटांचा विचार करून त्यांच्यासाठी उपक्रमांचे आयोजन केले जाते. गणेशोत्सवाचे दहाही दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी सोसायटीमध्ये विषय ठरवून त्या अनुषंगाने देखावा उभारण्यात येतो. सोसायटीतील मुले मोठय़ांच्या मार्गदर्शनाखाली ही सजावट करतात. यावर्षी या सोसायटीने ‘अग्नी’ या विषयावर देखावा केला आहे, अशी माहिती या सोसायटीचे रविकिरण जाधव यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 11th Sep 2013 रोजी प्रकाशित
सोसायटय़ांचा गणेशोत्सवही दिमाखात!
एकत्र येणे, आपली कला, विचार मांडण्यासाठी व्यासपीठ मिळवून देणे यांसारखे सार्वजनिक गणेशोत्सवामागचे हेतू सध्या पुण्यातील सोसायटय़ांच्या गणेशोत्सवामध्ये पाहायला मिळत आहेत.

First published on: 11-09-2013 at 02:45 IST
मराठीतील सर्व गणेश उत्सव २०१३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Societies ganesh festival in full colour