लालबागचा राजा गणेश मूर्तीचं विसर्जन कित्येक तास उलटूनही झालेलं नाही. मुंबईकरांचा लाडका गणपती आणि नवसाला पावणाारा बाप्पा अशी लालबागच्या राजाची ओळख आहे. ६ सप्टेंबरला सकाळी १० वाजता लालबागच्या राजाची मिरवणूक सुरु झाली. लालबाग ते गिरगाव हे अंतर १० किमीचं आहे. गिरगाव चौपाटीवर राजाची मिरवणूक येण्यासाठी २२ तास लागले. दरम्यान आता १२ ता तास उलटूनही राजाचं विसर्जन झालेलं नाही. राजाला तराफ्यावर आरुढ करणं हे मोठं आव्हान होतं. आता काही वेळापूर्वीच लालबागचा राजा तराफ्यावर विराजमान झाला. दरम्यान कोळी बांधवाने लालबागचा राजा गणपतीचं विसर्जन का लांबलं त्याचं कारण कोळी बांधवाने सांगितलं आहे.
हिरालाल वाडकर यांनी सांगितलेलं कारण चर्चेत

लालबाग परळ परिसरात असलेला लालबागचा दरवर्षी गणेश चतुर्थीच्या वेळी जगभरातील भाविकांना आकर्षित करते. येथे भाविक केवळ दर्शनासाठीच नव्हे तर दूरवरूनही आपल्या इच्छा पूर्ण करण्याच्या आशेने येतात. लालबागच्या राजाचे विसर्जन निर्धारित वेळेत न झाल्याने उलटसुलट प्रश्न उपस्थित होत आहेत. यावर आता कोळी बांधव आणि गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल वाडकर यांनी आपली बाजू मांडून स्पष्टीकरण दिले आहे.

गुजरातचा तराफा आणला पण..

गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल वाडकर यांनी यासंदर्भात व्हिडीओच्या माध्यमातून माहिती दिली आहे. अनेक वर्ष झाली आम्ही लालबागच्या राजाचे विसर्जन करत आलेलो आहोत. काही कारणांमुळे लालबागच्या राजाचे विसर्जन झालेलं नाही. ओहोटी आणि भरतीचा अंदाज लालबाग मंडळाला आला नाही. आता आम्ही विसर्जन करत नाही कारण मंडळाने आता गुजरातच्या तराफामार्फत विसर्जन करतात, असे नाखवा हिरालाल वाडकर म्हणाले. लाखो रुपये खर्चून अत्याधुनिक स्वयंचलित तराफा तयार केला, पण भरती-आहोटीचं ज्ञान नसल्यामुळे बाप्पा तराफ्यावर बसूच शकले नाहीत. मुंबईतील इतर गणेश मूर्तींचं विसर्जन आजही कोळी समाजाने यशस्वीपणे पार पाडलं, कारण समुद्र आमचा आहे, आणि श्रद्धा आमच्या रक्तात असल्याची प्रतिक्रिया कोळी बांधवांनी दिली.

पहिला गणपती कोळी समाजानेच बसवला आहे

‘१९३४ मध्ये नवस फळल्यावर कोळी समाजानेच पहिला गणपती बसवला, आणि आज त्याच समाजाला विसर्जनाच्या वेळी बाजूला केलं जातं? ही केवळ विस्मृती नाही. ही अपमानाची गोष्ट आहे. निसर्गानेच जणू आयोजकांना चोख उत्तर दिलं.भर समुद्रात राजा वाट पाहत होता. आता तरी मंडळाने शहाणपणा दाखवावा आणि दरवर्षीप्रमाणे कोळी समाजाला विश्वासात घेऊन राजाचं विसर्जन विधिवत आणि सन्मानाने पार पाडावं. कोळी समाज म्हणजे विसर्जनाची परंपरा, श्रद्धेचा पाया आणि समुद्राचा खरा राजा’, असल्याची प्रतिक्रियाही कोळी समाजाकडून देण्यात आली. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

लालबाग राजा मंडळाचे सुधीर साळवी काय म्हणाले?

“लालबागचा राजा गणपतीची मिरवणूक सुमारे २३ तास चालली. सकाळी ८.३० ला आम्ही पोहचलो होतो. अरबी समद्राची भौगोलिक परिस्थिती लवकर आली कारण गेल्या तीन दिवसांपासून तुफान पाऊस पडतो आहे. आमचा विसर्जन सोहळा हा पूर्णपणे भरती आणि ओहोटीवर अवलंबून असतो. त्यामुळे आम्ही प्रयत्न केला विसर्जनाचा. पण लालबागचा राजा हे कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान आहे. त्यामुळे तराफ्यावरुन नेऊनच आम्ही विसर्जन करतो. आम्ही त्याच पद्धतीने विसर्जनाचा निर्णय घेतला. विसर्जनाला जो उशीर झाला त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. मुंबई पोलीस आणि मुंबई महापालिका प्रशासनाचे मी आभार मानतो. भरती लवकर आली आणि आम्हाला १५ मिनिटं उशीर झाला. सगळ्या माध्यमांनी भावनिक आणि श्रद्धेच्या क्षणात तुम्ही सगळे उभे राहिलात. मी सगळ्यांचे आभार मानतो.” असं सुधीर साळवी म्हणाले. “आता भरती थोडी उशिरा आहे. १०.३० च्या दरम्यान भरती आहे त्यावेळी लालबागचा राजा हा विसर्जनासाठी मार्गस्थ होईल. भरती सुरु असताना विसर्जन करणं आव्हानात्मक होतं. त्यामुळे आम्ही तराफ्याशिवाय विसर्जन करणं शक्य नव्हतं. रात्री साडेदहाच्या दरम्यान विसर्जन होईल.” असं सुधीर साळवी यांनी सांगितलं.