तयार हापूस आंब्यांचा तुटवडा; मागणीमुळे दरही चढे

गुढीपाडव्याला अनेकांनी आमरसाचा बेत आखला असेल, पण सध्या बाजारात तयार हापूसचा तुटवडा आहे. मागणीच्या तुलनेत तयार हापूस विक्रीसाठी उपलब्ध नसल्याने तयार हापूसच्या चार ते सहा डझनाच्या पेटीच्या दरात दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे.

Shukra Gochar in Mesh
२४ तासांनी ‘या’ ६ राशींच्या नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी? शुक्रदेवाच्या कृपेमुळे व्यापारात होऊ शकतो मोठा फायदा
Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Prostitution by pretending of Lotus Spa in Nagpur
नागपुरात ‘लोटस स्पा’च्या आड देहव्यापार…
forecast to rain along with wind in most parts of the state
गुढीपाडव्याला हलक्या सरी?

गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी हापूस आंब्याच्या विक्रीत मोठी वाढ होते. गुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळ बाजारात रविवारी (२६ मार्च) चार ते सहा हजार पेटय़ा एवढी आंब्याची आवक झाली. कोकणातून मुंबई आणि अहमदाबाद येथे मोठय़ा प्रमाणावर आंबा विक्रीसाठी पाठवला जातो. मुंबई आणि अहमदाबाद येथील बाजार आवार रविवारी बंद असल्याने पुण्यात मोठय़ा प्रमाणावर आंब्याची आवक होते. आवक चांगली झाली असली तरी त्यात कच्च्या फळांचे प्रमाण जास्त आहे. या आंब्यांना मागणी कमी आहे. त्यामुळे कच्च्या आंब्याचे दर पेटीमागे दोनशे रुपयांनी उतरले आहेत. तयार आंब्यांच्या दरात मात्र वाढ झाली आहे.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने तयार हापूसला मागणी चांगली आहे, मात्र तयार हापूसची गेल्या दोन दिवसांत मोठय़ा प्रमाणावर खरेदी झाल्याने तयार हापूसचा तुटवडा जाणवत आहे, अशी माहिती फळ बाजारातील प्रमुख विक्रेते अरिवद मोरे आणि करण जाधव यांनी दिली. ते म्हणाले, की एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात आंब्याचा हंगाम सुरू होईल. यंदा पोषक हवामानामुळे आंब्याचे उत्पादन चांगले होण्याची शक्यता आहे. हंगाम सुरू झाल्यानंतर आवक दीडपटीने वाढेल. त्यानंतर दर सामान्यांच्या आवाक्यात येतील. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याच्या दरात काही प्रमाणात घट होईल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

मागणी वाढली की गैरप्रकार

आंबा पक्व व्हायला वेळ लागतो. कच्च्या हापूसला फारशी मागणी नसते. ग्राहकांकडून तयार हापूसला मागणी जास्त असते. त्यामुळे काही आंबा विक्रेते फळे पिकवण्यासाठी रासायनिक पदार्थाचा वापर करतात. त्यामुळे आंबा लवकर तयार होतो. गेल्या काही वर्षांत अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे काही प्रमाणात गैरप्रकारांना आळा बसला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आंब्याचे घाऊक बाजारातील दर

रत्नागिरी हापूस आंबा (कच्चा, चार ते सहा डझन)- १४०० ते १८००

रत्नागिरी हापूस आंबा (तयार, सहा ते दहा डझन)- २००० ते ३५००

रत्नागिरी हापूस (तयार, चार ते सहा डझन)- २५०० ते ३०००

रत्नागिरी हापूस (तयार, सहा ते दहा डझन)- ३००० ते ५०००

कर्नाटक हापूस तीन ते पाच डझन- ८०० ते १२००

पायरी तीन ते पाच डझन- ६०० ते ८००

लालबाग (एक किलो)- ३० ते ४५

बदाम (एक किलो)-३० ते ४५

तोतापुरी (एक किलो)-२० ते २५