औरंगाबादमधील यशस्वी उद्योजक सुधांशू आणि सुजाता, एकमेकांच्या सोबतीने ‘तेजोनिधी उद्योग’ यशस्वीपणे पुढे नेत आहेत. एकामागोमाग चार कंपन्या उभारण्याबरोबरच ‘विश्वनिकेतन इंजिनीअिरग कॉलेज’ची स्थापना करणारं हे जोडपं म्हणतं, ‘आम्ही दोघं मिळून परिपूर्ण आहोत. ज्या गुणांची एकात कमतरता आहे तो दुसऱ्याकडे भरभरून आहे म्हणूनच उद्योगाचा एवढा मोठा डोलारा उभारू शकलो.’

‘‘प्रामाणिकपणे १०० टक्के टॅक्स भरूनही ५/६ वर्षांपूर्वी आम्हाला इन्कम टॅक्स खात्याकडून नोटीस आली. अनेक परीनं प्रयत्न करूनही ससेमिरा संपत नव्हता. प्रत्यक्षात समन्स आल्यावर आमची बाजू पारदर्शक असूनही जसं ट्रेनने प्रवास करताना टी.सी. समोर आल्यावर तिकीट असूनही पाय लटपटतात त्याप्रमाणे मीही घाबरलो. परंतु सुजाता, माझी पत्नी ताठ कण्याची. म्हणाली, ‘कर नाही त्याला डर कशाला? मी जाऊन बसेन त्यांच्यासमोर दिवसभर’ आणि खरंच त्यांच्या सरबत्तीला ती पुरून उरली. पुढे एक पैसाही न देता हे प्रकरण मिटलं..’’ औरंगाबादमधील यशस्वी उद्योजक सुधांशू शेवडे पत्नीचा खंबीरपणा व्यवसायात कसा पूरक ठरला, याची  एक आठवण सांगत होते. या मराठमोळ्या उद्योजक जोडप्याची ‘तेजोनिधी उद्योग’ ही भारतातील पहिली अशी कंपनी आहे की, जी धातुलेपनाचा थर मोजणाऱ्या मशिन्सची अचूकता तपासणारे मास्टर्स (प्लेटिंग थिकनेस कॅलिब्रेशन मास्टर्स) बनवते. अभिमानाची गोष्ट म्हणजे पारदर्शी व्यवहारांच्या बळावर वाढणाऱ्या ‘तेजोनिधी’च्या मास्टर्सची अचूकता जर्मन व अमेरिकन कंपन्यांपेक्षा अधिक आहे.
संशोधक वृत्तीच्या या संशोधकाची कौटुंबिक पाश्र्वभूमी नोकरशाहीची. वडील सुभाष शेवडे ‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये उच्च पदावर तर आई (शुभदा शेवडे) गृहिणी. मात्र सुधांशूची बौद्धिक क्षमता ओळखल्याने त्याने सरधोपट मार्गाने न जाता कोणता ना कोणता व्यवसाय करावा असा वडिलांचा आग्रह. त्यांच्याच प्रेरणेने सुधांशूंनी पुणे इंजिनीअिरग कॉलेजमधून बी.ई. मेकॅनिकल ही पदवी घेतल्यानंतर कोणत्या क्षेत्रात पाऊल टाकता येईल याचा जाणीवपूर्वक शोध सुरू केला. अनेकांची भेट घेतली. थोडा फार पाया असावा म्हणून दोन लघुउद्योजकांकडे वर्षभर मोबदला न घेता उत्पादनापासून बिलं बनवण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतला आणि विचारांती औद्योगिक उपकरणांवर धातूचा लेप (इलेक्ट्रोप्लेटिंग) देणारं युनिट सुरू करण्याचं ठरवलं. त्यासाठी औरंगाबादजवळील वाळूज येथील एम.आय.डी.सी. परिसरात जागा घेतली आणि १९८५ मध्ये ‘तेजोनिधी उद्योग’ या नावाने झिंक व निकेल या धातूंच्या प्लेटिंगला सुरुवात झाली. हे धाडसी पाऊल उचलण्यासाठी मोठा भाऊ लोकेश व काका बाबूजी यांनी दिलेली साथ मोलाची ठरली.

१९८५ ते ९२ हा ‘तेजोनिधी’च्या संघर्षांचा काळ. वाळूज येथील पहिल्या ३ लघुउद्योगांपैकी हा एक. कोणत्याही सुविधा नाहीत. रस्ते चिखलाचे. ट्रंककॉल करायचा तर औरंगाबादच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तासन् तास नंबर लावून बसावं लागे. स्कू, नट्स अशा छोटय़ा गोष्टींसाठीही शहर गाठावं लागे. काळोख पडल्यावर रस्त्यांवर लुटारूंचं राज्य असे. याच परिस्थितीत सुधांशूचे धातुलेपनाचे विविध प्रयोग सुरू होते. असं तळ्यात-मळ्यात सुरू असतानाच सुजाताची आश्वासक साथ मिळाली. कॅप्टन रंगनाथ देगावकर आणि कालिंदी देगावकर यांची ही मॅकेनिकल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा घेतलेली कन्या तेव्हा औरंगाबादमधील एका फार्मा कंपनीच्या इंजिनीअिरग विभागात काम करत होती. एका भाडय़ाच्या घरात दरमहा मिक्सर, फ्रिज, टी.व्ही. अशा एकेक वस्तू घेत त्यांचा सर्वसामान्यांसारखा संसार सुरू झाला. हळूहळू दिवस बदलत गेले. ‘तेजोनिधी’चं बस्तान बसू लागलं तसं सुजाताने नोकरी सोडून घरच्या उद्योगात लक्ष घालण्याचा निर्णय घेतला. हक्काने दोन हात मदतीला आल्यावर सुधांशूनी एक पाऊल पुढे टाकलं; सिल्व्हर प्लेटिंगला सुरुवात केली.

सुधांशू म्हणाले, ‘‘आम्ही दोघं मिळून परिपूर्ण आहोत. (टुगेदर वी आर कम्प्लीट). ज्या गुणांची एकात कमतरता आहे तो दुसऱ्याकडे भरभरून आहे. उदाहरणार्थ, नव्या नव्या संधी समोर येत गेल्या आणि मी धाडसाने निर्णय घेत गेलो. ते निर्णय अमलात आणण्याची जबाबदार सुजाताने घेतली. कोणतीही नवी मोठी ऑर्डर आली की उपलब्ध जागेत ती कशी होणार याचं मला टेन्शन येई; परंतु सुजाता सहज सुचवणार.. ही ही भिंत पाडून टाकू.. आतली रचना या या प्रकारे बदलू वगैरे वगैरे. नुसतं सुचवणार नाही तर ठरवल्याप्रमाणे सर्व परिवर्तन पार पाडायची जबाबदार तिचीच. कोणताही बाका प्रसंग समोर उभा राहिला तरी ती डगमगत नाही. अवघड परिस्थितीतही वेगवेगळे मार्ग तिला सुचत राहतात..’
१९९९ मध्ये ‘तेजोनिधी’ने उत्पादन क्षेत्रात झेप घेतली आणि लक्ष्मण प्रभुदेसाई यांच्या साथीने मिनिएचर सर्किट ब्रेकर एम.सी.बी. हे फ्यूजच्या ऐवजी वापरायचं साधन बनवायला सुरुवात केली. हे उत्पादन बनवणं तब्बल १४ र्वष सुरू होतं. २००२ मध्ये सिल्व्हर प्लेटिंगसाठी पुण्याच्या एका कंपनीची मोठी ऑर्डर मिळाली, परंतु उत्पादक जवळपास असावा असा त्यांचा आग्रह होता. शेवडे पती-पत्नीने हे आव्हान स्वीकारलं आणि तळेगावजवळील चाकण परिसरात नवं युनिट सुरू झालं. या ठिकाणी तर सुरुवातीला लाईट व पाण्याचीही सोय नव्हती. पण  अडचणीतून मार्ग काढण्याची हिंमत दोघांच्या अंगी बाणली होती. पाण्यासाठी टँकर व डिझेल जनरेटरवर वीजनिर्मिती करत कामाला सुरुवात झाली. आता तर इथला सगळा माल थेट अमेरिकेत निर्यात होतो.
इतरांना जे जमत नाही ते करून दाखवायचं आणि प्रत्येक पावलावर सर्वोत्तमचा आग्रह या मनोनिग्रहामुळे सुधांशूमधील संशोधक सतत कार्यरत राहिला. परिणामी जानेवारी २०१५ पासून ‘तेजोनिधी’ उद्योगाची कॅलिब्रोमेजर इक्विपमेंट्स प्रा. लि. ही चौथी कंपनी औरंगाबादमध्ये सुरू झाली. इथे अशी तपासणी मशीन बनतात की ज्यायोगे केसाच्या जाडीच्या एक हजाराव्या भागाचीही लांबी, रुंदी, जाडी अचूकपणे कळू शकते. सुधांशू म्हणाले की, ‘‘काही उद्योगांची ती गरज असते. अशा प्रकारे शोधलेल्या माहितीचं भांडार (डाटा) कॉम्प्युटरवर दिसण्याचीही सोय आहे.

‘तेजोनिधी’ची अचूकता मापन लॅब ही (एन.ए.बी.एल)(नॅशनल अ‍ॅक्रिडिटेशन फॉर टेस्टिंग अ‍ॅण्ड कॅलिब्रेशन ऑफ लॅबोरेटरीज) या कॅलिब्रेशन क्षेत्रातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या संस्थेने प्रमाणित केलीय. एवढेच नव्हे तर या प्रकारातील ही भारतातील पहिली प्रयोगशाळा आहे. एकूणच ‘तेजोनिधी’ उद्योगाने परदेशी बाजारपेठेत भारताची कॉलर ताठ केलीय एवढं खरं. हा गड सर करण्यासाठी जिवाची बाजी लावणाऱ्या आपल्या मावळ्यांविषयी (कर्मचारी) दोघांच्याही मनात कृतज्ञता आहे. म्हणूनच ‘तेजोनिधी’ची संपूर्ण टिम म्हणजे एक कुटुंबच बनलंय.

व्यवसायवृद्धी होत असताना येणारी लक्ष्मी सन्मार्गाच्या वाटेनेच यायला हवी यावर सुधांशू व सुजाता दोघांचाही कटाक्ष. यात कसलीही तडजोड नाही. कारखान्यातून बाहेर पडणारं रसायनमिश्रित पाणी संपूर्ण प्रक्रिया करूनच बाहेर सोडलं जातं. अशा निर्मळ व स्वच्छ व्यवहारामुळे शेवडे दाम्पत्याची प्रतिमा केवळ इंडस्ट्रीतच नव्हे तर घरीदारीही उंचावलीय. सुधांशू म्हणाले, ‘‘काहीही झालं तरी आपले आईवडील नीतीच्या मार्गानेच जातील हा विश्वास आमच्या मुलींच्या मनात निर्माण होणं तेवढंच महत्त्वाचं होतं..’’ याच मार्गावरून पुढे जाण्यासाठी त्यांच्या दोन्ही मुली पूरक शिक्षण घेत आहेत. मोठी सावनी मेकॅनिकल इंजिनीअर असून सध्या अमेरिकेत उच्च शिक्षण घेतेय, तर धाकटी श्रिया एक पाऊल पुढे टाकत आपला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअिरगचा अभ्यास सांभाळून गरीब मुलांना इंग्रजी व गणित (विनामूल्य) शिकवतेय.
खालापूरजवळील विश्वनिकेतन इंजिनीअिरग कॉलेज हे सुधांशू व सुजाता यांचं ३ वर्षांपूर्वी आकाराला आलेलं दुसरं स्वप्न. नुसतं पुस्तकी इंजिनीअर्स न घडता उद्योजक (आंत्रप्रनर्स) निर्माण व्हावेत या हेतूने प्रकल्पाधिष्ठित शिक्षण (प्रोजेक्ट बेस लर्निग) ही अभिनव कल्पना घेऊन स्थापन झालेल्या या संस्थेतील सर्व विश्वस्त उद्योग व शिक्षण क्षेत्रातील आहेत. समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या इच्छेने हे सर्व एकत्र आले आणि त्यांनी पदरमोड करून २०१२ मध्ये खालापूरला १३ एकर जागा घेतली. त्यावर आधुनिक तंत्रज्ञानासह उभारलेल्या महाविद्यालयात गेल्या ३ वर्षांपासून इंजिनीअिरगच्या सर्व शाखांचं शिक्षण दिलं जात आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे जागतिक दर्जाचं शिक्षण देणाऱ्या या विद्यापीठात प्रवेश देताना ‘फी’खेरीज एक रुपयाही घेतला जात नाही की संचालकांसाठी राखीव कोटा नाही. फक्त प्रयोगशीलता व नवनिर्मितीची आस याच निकषांवर विद्यार्थ्यांला पारखून घेण्यात येतं. पहिल्या वर्षांपासूनच टर्म संपल्यानंतरच्या प्रत्येक सुट्टीमध्ये युरोपमधील वेगवेगळ्या दर्जेदार विद्यापीठांत ५० टक्के स्कॉलरशिपवर प्रोजेक्ट करायची संधी हे विश्वनिकेतनचे असाधारण वैशिष्टय़. या संस्थेचं आर्किटेक्चर कॉलेजही लवकरच सुरू होत आहे.

आज पन्नाशीला स्पर्श केल्यावरही सुधांशू-सुजाता सतत काहीना काही शिकत स्वत:ला घडवत असतात. मुळात या दोघांना पाहताना ते अर्धशतकाच्या उंबरठय़ावर आहेत हे खरंच वाटत नाही. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’, ‘जिम’, ‘लॅण्डमार्क फोरम’ या अस्त्रांच्या मदतीने दोघांनीही स्वत:च्या तनामनाला तरुण, तंदुरुस्त ठेवलंय. त्याबरोबर वाचनाची, शास्त्रीय संगीताची, भटकण्याची आवड असल्याने दोघंही रसरशीत जीवन जगताहेत. दरवर्षी आपल्या उत्पन्नातील ठरावीक भाग एखाद्या सेवाभावी संस्थेला देत असल्याने मानसिक समाधानाचा ठेवाही त्यांच्यापाशी आहे. औरंगाबादमधील ‘क्लाऊड वाईन’ या उच्चभ्रू वस्तीतील त्यांचा डय़ुप्लेक्स बंगला अभिरुचीपूर्ण वस्तूंनी सजलेला दिसतो. या वस्तूंच्या निवडीतही दोघांची आवड शंभर टक्के जुळणारी. या समृद्ध, समाधानी, संजीवक जोडीकडे पाहताना मनात आलं.. या दोघांची कागदावरची पत्रिका जुळली की नाही ते माहीत नाही, पण काळजावरची तंतोतंत जुळली एवढं मात्र नक्की!
sudhanshushevade@yahoo.co.in
sujatashevade@yahoo.co.in
http://www.vishwaniketan.edu.in