आधुनिक जगामधील स्त्रियांच्या आरोग्याचा विचार करता पीसीओएस हा एक त्यांचा मोठा शत्रू बनला आहे, त्यातही वय वर्षे १२ ते ४५ या प्रजननक्षम वयामधील स्त्रियांचा. काही संशोधकांच्या मते हा आजार पूर्वीसुद्धा अस्तित्वात होता, मात्र त्याचे प्रमाण नगण्य होते. २१व्या शतकाच्या अंतिम दशकांमध्ये आहारविहारामध्ये अर्थात एकंदरच खाण्यापिण्याच्या व राहाण्यासाहाण्याच्या सवयींमध्ये जो बदल होत गेला, पाश्चात्त्य जीवनशैलीचे जे अंधानुकरण होत गेले, सुपाच्य कर्बोदकांचे सेवन जसे वाढत गेले, व्यायाम-परिश्रम कमी होत गेला, स्त्रीसुलभ वैशिष्ट्यांकडे-संस्कारांकडे दुर्लक्ष होत गेले तसतसे या आजाराचे प्रमाण वाढत गेले. ते इतके की आज समाजामधील ५ ते १०% स्त्रियांना (त्यातही तरुण मुलींना) हा आजार ग्रस्त करत आहे.

या अंदाजानुसार मुंबईच्या सव्वादोन करोड लोकसंख्येमध्ये एक करोड स्त्रिया आहेत, असे गृहीत धरले तर साधारण ५ ते १० लाख स्त्रिया या रोगाने त्रस्त आहेत. प्रत्यक्षात चिकित्सा व्यवसाय करताना मात्र समाजामध्ये याचे प्रमाण दहा मुलींमध्ये एकीला असे नसून पाच मुलीमध्ये एकीला असे असावे, अशी शंका यावी, इतपत हा आजार समाजात बळावलेला आहे असे दिसते.पीसीओएस या अक्षरांचा पूर्ण अर्थ आहे, पॉलिसिस्टीक ओव्हरिअन सिन्ड्रोम( पीसीओएस). या आजारामध्ये स्त्री-शरीरामधील संप्रेरकांचे( हार्मोन्सचे)स्त्रवण व कार्य विकृत होऊन पुरुष-संप्रेरकांचे प्रमाण वाढते. पीसीओएसमुळे मासिक पाळीच्या संदर्भामध्ये संभवणारा त्रास म्हणजे सलग तीन महिने वा त्याहूनही अधिक महिने मासिक पाळी न येणे. याचबरोबर जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा फार जास्त रक्तस्त्राव होणे वा मोठ्या कष्टाने, वेदनेसह स्त्राव होणे, अनेक दिवस स्त्राव सुरु राहणे अशा तक्रारीसुद्धा दिसतात. या त्रासामुळे व खाली दिलेल्या इतर लक्षणांमुळे ती स्त्री निराशेने ग्रस्त होणे स्वाभाविकच आहे, जे पीसीओडीचे एक लक्षण आहे.

Muslims India reservation
भारतातील धर्मावर आधारित आरक्षणाचा संक्षिप्त इतिहास; मुस्लिमांचा ओबीसीमध्ये समावेश कसा झाला?
World Asthma Day 2024 marathi news, asthma latest marathi news
पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अस्थमाचे प्रमाण जास्त, जागतिक अस्थमा दिन विशेष
Stree Vishwa Virtual trend of trad wife
स्त्री ‘वि’श्व : ट्रॅड वाइफ’चा आभासी ट्रेंड?
Loksatta chaturanga Discovery of Women Vote Bank
महिला व्होट बँकेचा शोध!

मासिक पाळीच्या तक्रारींशिवाय चेहर्‍यावर तारुण्यपिटीका येणे, ज्या स्वाभाविक तारुण्यपिटीकांपेक्षा अधिक गंभीर असतात व सर्वसाधारण उपचाराने बर्‍या होत नाहीत. वजन वाढणे हे तर यामध्ये महत्त्वाचे लक्षण असते, किंबहुना वाढलेले वजन हेच आजाराचे मूळ कारण असते. कारण या आजाराच्या उपचारासाठी येणार्‍या मुलींमध्ये सहसा सडसडीत शरीराची मुलगी अभावानेच दिसते. याशिवाय चेहर्‍यावर केस येणे, नेमके सांगायचे तर पुरुषांप्रमाणेच दाढी वा मिशांच्या जागी केस येणे हे लक्षण सुद्धा दिसते. हे लक्षण मागील पिढ्यांमधील एखाद्या स्त्रीमध्ये सुद्धा दिसत असे, असे जुन्या लोकांकडून ऐकायला मिळते, ज्यावरुन हा आजार पुर्वीसुद्धा असावा, असे दिसते. त्याचे प्रमाण आजच्या इतके गंभीर नव्हते इतकंच. चेहर्‍यावरील केस वाढताना डोक्यावरचे केस मात्र कमी होत जातात, हे या आजारामधील दुर्दैवी लक्षण म्हटले पाहिजे. एकंदर पाहता स्त्री सौंदर्य समजले जाणारे डोक्यावरचे केस कमी आणि चेहर्‍यावरील पुरुषी समजले जाणारे केस मात्र वाढणे, असा स्त्री-शरीराला पुरुषी रूप देणारा हा आजार आहे. स्त्री शरीराला पुरुषी का बनावेसे वाटत असेल हो?

आधुनिक जगामधील स्त्रियांनी धडाडीने पुढे जावे, स्त्रियांची प्रगती व्हावी ही तर काळाची गरज आहे. या जगाचे रहाटगाडे स्त्रियांच्या हातात दिले तर त्या ते अधिक सक्षमतेने चालवू शकतील, या मताचा मी आहे. पण हे करत असताना आपल्या संस्कृतीला विसरण्याची आवश्यकता नाही. परंपरेला मोडून टाकण्याची गरज नाही. काळाच्या कसोटीवर खर्‍या ठरलेल्या आपल्या स्त्री-सुलभ संस्कारांना धक्का लावण्याची गरज नाही. जीवनातील ध्येये व लौकीक प्रगती साध्य करत असताना आपले स्त्रीत्व सुद्धा शाबूत राहील याची काळजी घ्यायला नको का?’ पीसीओएस’ सारखा आजार हा स्त्री-सुलभ संस्कारांना विसरल्यामुळे, त्यांच्याकडे पाठ फिरवल्यामुळे होतोय का? याचा विचार व्हायला हवा. हा तर्क आहे, शास्त्रीय सत्य नाही. मात्र या विषयावर समाजामध्ये विचार मंथन व्हायला पाहिजे.