एखाद्याची दाढ काढायची असो किंवा अवयव प्रत्यारोपणासारखी गुंतागुतींची व जटील शस्त्रक्रिया असो, त्यासाठी भूल देणे गरजेचे असते. शस्त्रक्रियेदरम्यान वेदना जाणवू न देणे एवढेच भूल देण्याचे कारण नसते, तर शस्त्रक्रियेदरम्यान रुग्ण व सर्जन दोघांनाही कम्फर्ट मिळवून देणे व शस्त्रक्रियेदरम्यान शरीरक्रियांवर योग्य नियंत्रण ठेवताना शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला पूर्ववत करणे हे महत्त्वाचे कामही भूलतज्ज्ञ करत असतात. भूल देताना जास्त प्रमाणात औषध दिले गेल्याने मुलींचा मृत्यू झाल्याचा आरोप कांदिवलीमधील घटनेत करण्यात आला होता. या पाश्र्वभूमीवर भूल देणे म्हणजे नेमके काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न.अनेस्थेशिया म्हणजेच भूल देणे ही वैद्यकक्षेत्रातील विशेष शाखा आहे. रुग्णाच्या शारीरिक स्थितीचा नीट अभ्यास करून शस्त्रक्रिया योग्य प्रकारे करण्यासाठी, एवढेच नव्हे तर रुग्ण व सर्जनलाही सोयीस्कर वाटण्यासाठी भूलतज्ज्ञ रुग्णासाठी सर्वात योग्य ठरणारा पर्याय स्वीकारतो. शस्त्रक्रियेपूर्वी, दरम्यान आणि नंतरही भूलतज्ज्ञ रुग्णासोबत असल्याने त्यांना ‘रिऑपरेटीव्ह फिजीशियन’ म्हटले जाते. भूलतज्ज्ञाची भूमिका ही केवळ अतिदक्षता विभागापुरती मर्यादित राहत नाही, तर वेदनाशामक, रुग्णाला पूर्वस्थितीत आणण्यासाठी आणि अर्थातच शस्त्रक्रियेदरम्यान अत्यंत महत्त्वाची ठरते. शस्त्रक्रिया ही लहानसा छेद देऊन केलेली असू शकते किंवा अवयव प्रत्यारोपण, हृदयशस्त्रक्रियेएवढी जटील असू शकते. मात्र शस्त्रक्रिया लहान-मोठी असली तरी त्यासाठी द्यावी लागणारी भूल ही कमी-अधिक नसते. प्रत्येक वेळी ती देताना पूर्ण अभ्यास करावाच लागतो. सध्याच्या स्पेशलायझेशनच्या युगात सर्जरीप्रमाणेच भूलतज्ज्ञांमध्येही विशेषज्ञ असतात.
शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाच्या शारीरिक क्षमतेचा पूर्ण अभ्यास केला जातो. रुग्ण घेत असलेल्या औषधांसोबत भूल देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची रिअक्शन होऊ शकते. त्यानुसार रुग्ण घेत असलेल्या औषधांना सुरू ठेवण्याचा, बदलण्याचा किंवा काही काळ बंद करण्याचा निर्णय घेतला जातो. यासोबतच रुग्णाला काही खाण्यास न देण्याचा (उपाशी ठेवण्याचा) काळही ठरवला जातो.
भूल ही साधारणत: दोन प्रकारे दिली जाते. स्थानीय किंवा लोकल अनेस्थेशिया आणि संपूर्ण शरीरासाठीचा जनरल अनेस्थेशिया. शस्त्रक्रिया व रुग्णाची मानसिक स्थिती यांचा विचार करून कोणत्या प्रकारची भूल द्यावी, त्याचा निर्णय घेतला जातो. स्थानीय भूल ही केवळ विशिष्ट भागापुरती मर्यादित असते. उदाहरण म्हणजे मणक्यांमध्ये दिलेली भूल, एपिड्युरल भूल, चेतापेशींमध्ये दिलेली भूल. शरीराच्या खालच्या भागात शस्त्रक्रिया असेल तर मणक्यामध्ये इंजेक्शनमधून भूल देणारे औषध टोचले जाते. एक बारीक नळी किंवा उत्सर्जक नलिका पाठीमध्ये लावली जाते, जेणेकरून शस्त्रक्रियेनंतरही काही दिवस वेदनाशामक औषधे या नळीतून दिली जाऊ शकतात. अशा शस्त्रक्रियेवेळी रुग्णाला बेशुद्ध केले जात नाही आणि केवळ वेदनाशामक औषधे दिली जातात. मात्र अनेकदा रुग्ण अशा प्रकारे शस्त्रक्रियेदरम्यान शुद्धीत राहण्यास मानसिकदृष्टय़ा तयार नसतो. त्यामुळे रुग्णाने होकार दिल्याशिवाय अशा प्रकारे स्थानीय भूल दिली जात नाही, त्याऐवजी संपूर्ण म्हणजे जनरल अनेस्थेशियाला प्राधान्य दिले जाते.
जनरल अनेस्थेशिया दरम्यान रुग्णाला बेशुद्ध केले जाते आणि वेदनाशामक औषधे दिली जातात. शस्त्रक्रियेदरम्यान श्वासही कृत्रिम यंत्रणेमार्फत सुरू ठेवला जातो. शस्त्रक्रियेनंतर औषधांचे प्रमाण हूळूहळू कमी केले जाते व रुग्णाला शुद्धीत आणण्यासाठी इतरही औषधे दिली जातात. यासाठी रुग्णाची शारीरिक स्थिती व शस्त्रक्रियेचे स्वरुप लक्षात घेऊन औषधांचे प्रमाण ठरवले जाते.
शरीरावरील लहानशा भागातही शस्त्रक्रिया असली तरी त्यादरम्यान हृदयाचे ठोके, रक्तदाब, शरीराचे तापमान, रक्तशर्करा, मूत्राचे प्रमाण आदी अत्यंत महत्त्वाच्या शरीरक्रिया सुरू राहणे आवश्यक असते. त्यांचेही व्यवस्थापन भूलतज्ज्ञामार्फत केले जाते. शस्त्रक्रिया केल्यावर पुन्हा एकदा रुग्णाला शस्त्रक्रियेपूर्वीच्या अवस्थेत आणले जाते. मधुमेह, उच्च रक्तदाब, अशक्तपणा, हृदयविकार, मूत्रिपड विकार, यकृत विकार अशा प्रत्येक रुग्णाशी संबधीत वेगवेगळे आजार असू शकतात. त्यामुळे अगदी क्वचित वेळा रुग्णांमधील आजारांमुळे शरीरक्रिया मंदावून भूल उतरण्यास जास्त वेळ लागतो. मात्र तेव्हा भूल देण्याचा डोस अधिक झालेला नसतो. काही वेळा शस्त्रक्रियेदरम्यान रक्तस्राव अधिक झाल्याने रुग्णाच्या शरीरक्रिया पूर्ववत होण्यासाठी वेळ लागतो, तेव्हा अतिदक्षता विभागात कृत्रिम पद्धतीने शरीरक्रियांचे नियंत्रण ठेवले जाते. अत्याधुनिक तंत्रामुळे केवळ भूल देण्याच्या प्रक्रियेतून गुंतागूंत होण्याची शक्यता अतिशय दुर्मिळ असते. शस्त्रक्रियेचा प्रकार आणि रुग्णाची शारीरिक स्थिती यावर धोका अवलंबून असतो. अर्थात कधीकधी गुंतागूत निर्माण होऊ शकते. मात्र योग्य पूर्वतयारी, सावधानता आणि समयसूचक व्यवस्थापन यामुळे हे टाळता येऊ शकते. रक्त, रक्तातील विविध घटक (प्लाझ्मा, प्लेटलेट्स, लाल रक्तपेशी) तसेच सलाइनद्वारेही शारीरिक स्थिती नियंत्रित केली जाते. नवीन तंत्रज्ञान, पद्धती, नियंत्रक साधने, औषधे आणि वैद्यकीय कौशल्ये यामुळे कोणत्याही वयाच्या, शारीरिक क्षमतेच्या व आजाराच्या रुग्णाला सुरक्षितपणे भूल देता येते.
भूल देणे हे विमान उडवण्याप्रमाणे असते. विमानाचे उड्डाण आणि जमिनीवर येणे हे दोन्ही टप्पे अतिशय महत्त्वाचे असतात. त्याप्रमाणे भूल देणे व भूल उतरवणे या क्रियावेळी अतिशय दक्ष राहावे लागते. या दरम्यानच्या काळात भूल कायम ठेवत व त्याचसोबत रक्तदाब, हृदयाचे ठोके, रक्तशर्करा, तापमान, मूत्राचे प्रमाण या शरीरक्रियांवर लक्ष द्यावे लागते. वैद्यकीय कौशल्य आणि ‘मल्टीपॅरा मीटर नियंत्रका’च्या माध्यमातून हे साधता येते.
अनेस्थेशियामधील ‘ए’ हा अवेअर, अन्टिसिपेट व अक्ट याचे प्रतिनिधित्व करतो. शरीरक्रियेसंबंधीची जागरुकता, काय होऊ शकेल याचा अंदाज आणि त्यावर तातडीने उपाय करणे हेच भूल देण्याच्या प्रक्रियेत अभिप्रेत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Mar 2014 रोजी प्रकाशित
भूल देताना..
एखाद्याची दाढ काढायची असो किंवा अवयव प्रत्यारोपणासारखी गुंतागुतींची व जटील शस्त्रक्रिया असो, त्यासाठी भूल देणे गरजेचे असते.

First published on: 18-03-2014 at 02:45 IST
मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anesthesia risks precautions and recommendations