सामान्य माणसाला ‘ट्रायजेमिनल न्यूरॉल्जिया’ या अवघड नावाच्या तितक्याच अवघड आजाराबद्दल माहिती असण्याचे काहीही कारण नसते! पण २०११ साली अभिनेता सलमान खान याच्यावर याच आजारासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली, आणि त्या निमित्ताने बऱ्याच जणांनी या आजाराचे नाव ऐकले. ट्रायजेमिनल न्यूरॉल्जिया असह्य़ वेदनांमुळे त्याचे दुसरे नाव चक्क  ‘सुसाईड डिसीज्’ असेच ठेवण्यात आले आहे! पण त्यावर उपाय काय, आणि तो करतात कसा, हे जाणून घेऊया या लेखात-  
‘ट्रायजेमिनल न्यूरॉल्जिया’ म्हणजे चेहऱ्यावर किंवा हिरडीमध्ये येणारी असह्य़ वेदना! ही वेदना वेगवेगळ्या प्रकारे येऊ शकते. कधीतरी अचानकच ती सुरू होते. विजेचा धक्का बसावा तशी असह्य़, टाचण्या टोचल्याप्रमाणे किंवा चेहऱ्याच्या एका भागात, डोळ्यांत तिखटाची पूड टाकल्याप्रमाणे अशी अनेक विशेषणे रुग्ण याचे वर्णन करताना सांगतात. बहुतेक वेळा चेहऱ्याच्या एका बाजूला गालावर, कपाळावर, हनुवटीवर, कानाच्या पुढे किंवा हिरडीवर एखाद्या विशिष्ट भागाला स्पर्श झाल्या झाल्या ही वेदना सुरू होते. या भागांना ‘ट्रिगर पॉइंट’ म्हणतात. गाडीतून जाताना गालाला हवेची झुळूक लागल्यास, तोंड धुताना त्या भागाला स्पर्श झाल्यास, अन्न चावताना अशा विविध निमित्तांमुळे ही कळ सुरू होते.
या कळेची (वेदनेची) तीव्रता इतकी विलक्षण असते की रुग्ण त्यावेळी बोलू शकत नाही. तोंड उघडणेसुद्धा अशा वेळी अशक्य होते. काही लोक तर ही वेदना सुरू होईल या भीतीने दिवसेंदिवस त्या बाजूचे तोंडच धूत नाहीत. या दयनीय अवस्थेत भर पडते ती औषधांमुळे! ‘कार्बामॅझेपिन’ हे औषध ही वेदना कमी करण्यासाठी सुचविले जाते. त्याने वेदनेची तीव्रता कमी होते, पण तात्पुरतीच! शिवाय आजार वाढेल तसा औषधांचा परिणामही कमी-कमी होत जातो आणि नंतर या गोळ्यांचा उपयोगच होत नाही. या गोळ्यांच्या अतिरिक्त मात्रेमुळे चक्कर येणे, ग्लानी येणे असे त्रास होऊ शकतात. यकृतावर परिणामही होऊ शकतो. थोडक्यात, औषधे नसांना आणि मेंदूला बधीर करून हा त्रास दाबतात, तो बरा करीत नाहीत.
मग या रुग्णांसाठी त्रास कायमचा नाहीसा करणारा उपाय कोणता? तर ‘एमव्हीडी’ म्हणजे ‘मायक्रोव्हॅस्क्युलर डीकॉम्प्रेशन’ ही शस्त्रक्रिया. ट्रायजेमिनल न्यूरॉल्जियाची वेदना होणाऱ्या रुग्णांच्या चेहऱ्याच्या नसेवर ती जेथे मेंदूत प्रवेश करते तेथे रक्तवाहिनीचा दाब आलेला असतो. अशा रक्तवाहिनीच्या अव्याहत स्पंदनामुळे ही नस हळवी बनते आणि ट्रायजेमिनल न्यूरॉल्जियाची असह्य़ वेदना सुरू होते.
न्यूरोमायक्रोस्कोपच्या साहाय्याने करण्यात येणाऱ्या एमव्हीडी शस्त्रक्रियेत ही रक्तवाहिनी नसेपासून दूर केली जाते आणि ती तशीच दूर राहावी म्हणून त्या दोहोंच्यामध्ये ‘टेफ्लॉन’ या पदार्थाचा स्पंज घालून ठेवला जातो. हा स्पंज कधीही विरघळत नाही. सहसा आपली जागाही सोडत नाही. ‘ट्रायजेमिनल न्यूरॉल्जिया एमव्हीडी शस्त्रक्रियेने बरा होतो हे सहा-सात वर्षांपूर्वी कळले असते, तर आयुष्यातली बहुमूल्य वर्षे वाया गेली नसती’, अशीच या आजाराच्या बहुसंख्य रुग्णांची प्रतिक्रिया असते.
‘पीटर जेनेटा’ या इंग्लिश सर्जनने या शस्त्रक्रियेला खरी झळाळी दिली. त्याने मागच्या शतकाच्या शेवटी या शस्त्रक्रियेवर अनेक शोधनिबंध लिहिले. तेव्हापासून आजपर्यंत ट्रायजेमिनल न्यूरॉल्जियाच्या रुग्णांना वेदनामुक्त करण्यासाठी हे शोधनिबंध पथदर्शी ठरत आहेत.
डॉ. जयदेव पंचवाघ
न्यूरोसर्जन