थंडी आली की वाताचे दुखणे सहन करण्याच्या पलीकडे जाते. वात किंवा सांधेदुखी पूर्ण बरी करणारे उपाय सध्या तरी नाहीत. मात्र थोडा आराम मिळावा म्हणून प्राथमिक उपाय करता येतील.
रात्री सुटलेले गार वारे, पहाटेची गुलाबी थंडी, कधी तरी मध्येच पडणारा पाऊस.. या धुंद, रोमॅण्टिक वातावरणाचा धसका कोणी घेतला असेल तर तो साठीच्या अलीकडे-पलीकडे असलेल्या आजी-आजोबांनी. विशेषकरून वाताचा त्रास असलेल्या काकी, मावशी, आजींनी. वाताचा त्रास मग तो संधिवात असो की आम्लवात, वर्षभर सोबतीला राहतो, मात्र हिवाळ्यात त्याची तीव्रता वाढते. रोजचे दुखणे सहन करायची सवय लागलेल्यांनाही हे दिवस भीतिदायक स्वप्नासारखे वाटतात आणि हे स्वप्न कधी एकदा संपते त्याची वाट पाहण्यासारखे त्रासदायक काही नाही.
वाताचा त्रास जाणवायला लागला की सुरुवातीला गरम पाण्याचा शेक, मलम, वेदनानाशक स्प्रे यांचा मारा सुरू होतो. काही वेळा वेदना थांबतात, मग पुन्हा सुरू होतात. आधीपेक्षा अधिक तीव्रतेने. मग पेनकिलर घेतली जाते. डॉक्टरकडे जाण्याची वेळ आल्यावरही अ‍ॅलोपथी करावे की आयुर्वेदिक असा प्रश्न पडतो. पहिल्या डॉक्टरांच्या औषधाने काही काळ बरे वाटते, मग पुन्हा त्रास सुरू होतो. मग दुसरा डॉक्टर शोधण्यास सुरुवात होते. औषध बदलले की थोडा आराम पडल्यासारखे वाटते पण काही दिवसांसाठीच. मग शेजारी, नातेवाईक यांच्या सल्ल्याने अनेक डॉक्टर, विविध उपाय सुरू होतात. वाताचा त्रास असलेल्यांचे अनुभव ऐकावे लागतात. पण या सगळ्यातून फारसा फरक पडत नाही. मग कधी तरी आत्मशोध लागतो आणि वातासोबत जगणे हे वास्तव असल्याचे पटते. वर्षभर वाताचा कमी-अधिक प्रमाणात त्रास सहन करणे अंगवळणी पडलेल्यांनाही थंडीत दाही दिशा धावण्याची वेळ येते.
हाडांची झालेली झीज भरून काढण्यासाठी तसेच किमान होणारा त्रास अधिक वाढू न देण्यासाठी वैद्यकीय तसेच जेनेटिक्सच्या माध्यमातून जगभरात संशोधन सुरू आहे. आयुर्वेदामध्ये उपचार असल्याचे सांगितले जाते. मात्र ते वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध झालेले नाहीत. काही औषध कंपन्या वातावर गुणकारी इलाज निघाल्याचा दावा करतात, पण त्यांची सिद्धता काही वर्षांनीच समजू शकते. आजमितीला वातावर कोणतेही खात्रीलायक औषध नाही, असे अस्थिव्यंगतज्ज्ञ डॉ. प्रदीप नेमाडे म्हणाले. त्यामुळेच सांधेदुखी किंवा हाडे ठिसूळ होणे यावर सर्वसमावेशक पद्धतीने उपचार करावे लागतात. प्राथमिक पातळीवर आजार असल्यास गरम शेक देणे, लेप लावणे, मलम लावणे या उपायांचा सल्ला दिला जातो. खाली बसू नये, इंग्रजी पद्धतीचे टॉयलेट वापरणे, बसताना पाय दुमडू नये, जिने फार चढ-उतार करू नये, असे सांगितले जाते. त्यानंतर वेदनाशामक गोळ्या, इंजेक्शन दिली जातात. त्रास अगदीच असह्य़ झाल्यास कृत्रिम सांधे बसवण्याचा पर्याय सुचवला जातो. हा सर्व काळ अत्यंत वेदनादायक व शरीरासोबतच मनावर परिणाम करणारा असतो, त्यामुळे रुग्णांना समजावून घेत सर्वसमावेशक पद्धती अवलंबवावी लागते, असेही नेमाडे यांनी स्पष्ट केले.
वातासारख्या दीर्घकालीन आजारात अ‍ॅलोपथीपेक्षा आयुर्वेदाचा गुण अधिक असल्याचा समज आहे. थंडीमध्ये वातदोष वाढतो. योग्य आहार आणि उपाय यामुळे तो आटोक्यात राहू शकतो. आयुर्वेदात वातावर गुणकारी औषधे आहेत, असे वैद्य राजीव कानिटकर यांनी सांगितले. वातदोषात मुख्यत्वे दोन प्रकार येतात- संधिवात व आम्लवात. या दोन्हीसाठी गरम शेक हा प्रभावी उपाय आहे. सध्या थंडी असल्याने सकाळी हाडे आखडलेली असतात. अशा वेळी अंथरुणातून उठण्यापूर्वीच वीट, वाळू यांचा गरम शेक द्यावा. उठल्यावर लगेचच कडकडीत पाण्याने आंघोळ केली की हाडे सुटतात. कामासाठी सतत पाण्यात हात घालावा लागत असेल तर गरम पाणी वापरावे, असा सल्ला वैद्य कानिटकर यांनी दिला. संधिवातात तेलाचे मालिश करण्यासारखा गुणकारी उपाय नाही. मात्र आम्लवात असणाऱ्यांनी तेल लावू नये. सांध्यांना सूज येणे, अपचन, बद्धकोष्ठ, ताप येणे ही आम्लवाताची लक्षणे आहेत. तेलमालिश केल्यास आम्लवाताचा त्रास अधिक वाढतो. दोन्ही वातासाठी सुंठ गुणकारी आहे. सुंठ, तूप आणि गुळाची गोळी खावी, दुधात सुंठ पावडर घालावी, सुंठ व एरंडेलचा लेप करून लावावा. दही, चिंच, टोमॅटो, लोणचे, सॉस असे आंबट पदार्थ तसेच केळी, द्राक्ष, संत्र, अननस, पेरू ही फळे टाळावीत. चणा, वाटाणा, छोले, राजमा असे वातुळ पदार्थ कमी केले की वात आटोक्यात राहील, असा आरोग्यमंत्र त्यांनी सांगितला.
वाताचा त्रास झाल्यावर जो जे सांगेल, ते ते केले जाते. मात्र काही वेळा ‘अतिपरिचयात अवज्ञा’ होऊन नेहमीचे साधे उपायही नजरेआड केले जातात. मात्र त्रास असह्य़ झाल्यावर काही वेळा हे प्राथमिक उपाय लाभदायी ठरतात. या थंडीत वाताचा त्रास वाढल्यास या उपायांचाही उपयोग करावा, कदाचित त्याने वाताच्या वेदनांवर फुंकर बसेल.
हे करून पाहा
* वाळू, वीट यांचा गरम शेक द्या.
* सकाळी अंथरुणात असतानाच शेक घ्यावा.
* कडकडीत पाण्याने आंघोळ करावी.
* सुंठेचे पदार्थ आहारात घ्यावेत तसेच लेप वापरावा.
* हाडांवर ताण येईल अशा कृती टाळाव्यात. (जसे जिने चढणे-उतरणे, खाली बसणे.)