कर्करोग म्हणजे मृत्यूला कवटाळणे ही भीती समाजमनात खोलवर दडून बसली आहे. मात्र हा रोग नेहमी जीवघेणा असतोच असे नाही. समाजातील असेही काही जण आहेत, ज्यांनी धीर खचू न देता कर्करोगाशी दोन हात केले. क्रिकेटपटू युवराज सिंग, अभिनेत्री मनिषा कोईराला, जागतिक दर्जाचा सायकलपटू लान्स आम्र्सस्ट्राँग, प्रसिद्ध मॉडेल लीसा रे ही त्यापैकीच काही उदाहरणे! कर्करोगावर मात करणारी ही मंडळी सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी आहेत. जागतिक कर्करोग दिनी या सिलिब्रेटींच्या लढय़ाविषयी..
‘‘मला कॅन्सर झालाय हे कळणे माझ्यासाठी खूप मोठा धक्कादायक होतं. पण आयुष्यात अशी खूपशी ‘सरप्रायझेस’ येत असतात. आपल्याला त्या सगळ्यांचा स्वीकार करावाच लागतो..श्रद्धेने आणि अगदी शांतपणे! यापुढे काय होईल..मला सांगता नाही येणार, पण आजपर्यंत मी खूप छान जीवन जगले आहे. यानंतरही सगळ्या गोष्टी चांगल्या होतील..पण मला सगळ्या मित्रमैत्रिणींना एक गोष्ट सांगायचीय..प्लीज दु:ख वगैरे करत बसू नका. काहीही झाले तरी मी ते स्वीकारीन. जीवन कुठल्याही स्वरूपात समोर येऊद्या, आपण सगळ्याचे सेलिब्रेशन करू!’’
अभिनेत्री मनिषा कोईराला हिला ओव्हरीजचा कर्करोग असल्याचे निदान झाल्यानंतर शस्त्रक्रियेपूर्वी तिने आपल्या फेसबुक मित्रांसाठी लिहिलेला हा संदेश. शस्त्रक्रियेपूर्वी आणि शस्त्रक्रिनंतरही ती सोशल मीडियावरून आपल्याला शुभेच्छा पाठवणाऱ्यांच्या सतत संपर्कात होती. शस्त्रक्रियेनंतर तिने अपलोड केलेली स्वत:च्या कुटुंबाबरोबरची आनंदी छायाचित्रेही अनेकांना प्रेरणा देऊन गेली होती. आता ती कर्करोगापासून मुक्त झाली आहे. पूर्ववत कामसुद्धा करू लागली आहे.
धीर खचू न देता कर्करोगाशी दोन हात करणाऱ्यांच्या आणि सतत प्रेरणादायी ठरणाऱ्यांच्या यादीत तरूणाईचा लाडका क्रिकेटपटू युवराज सिंग याचं नाव तर प्राधान्याने घ्यायलाच हवे. कर्करोगाशी आपण कसा लढा दिला आणि क्रिकेटच्या ओढीने आपल्याला कसे तारले, याविषयी तो आपल्या मुलाखतींमध्ये भरभरून बोलतो. त्याच्याच शब्दांत- ‘जर ‘युवी’ला जमू शकते; तर कुणालाही जमेल!’
कर्करोगाच्या रुग्णांना आपले अनुभव सांगण्यासाठी तो वेगवेगळ्या परिषदांमध्ये नेहमी सहभागी होतो. सुरुवातीच्या काळात अशाच एका परिषदेत त्यानक म्हटले होते, ‘‘ ‘मला कर्करोग आहे,’ ही जाणीव खूप निराश करणारी होती. स्वत:ला सांभाळायला मला बराच वेळही लागला. कर्करोगाशी झुंजणारा कोणताही रुग्ण तुम्हाला हेच सांगेल. ती नैराश्याची एक ‘फेज’ असते. पण त्यापासून दूर पळणे तर शक्य नव्हतेच. जगण्यासाठी तुम्हाला लढा द्यावाच लागतो.’’ त्याच्या ‘युवराज सिंग फाऊंडेशन’चा ‘यू वी कॅन’ या उपक्रमाद्वारे कर्करोगाचे लवकर निदान होण्याविषयी जनजागृती करण्याचे प्रयत्नही जोरात सुरू आहेत. त्याचं पुस्तक ‘द टेस्ट ऑफ माय लाईफ’ तर कर्करोगग्रस्तांबरोबरच इतरांनाही जिद्द शिकवणारं ठरलं.
एका मुलाखतीत त्यानं सांगितलं होतं, ‘‘सुरुवातीला कॅन्सरविषयी बोलताना मला फारसे ‘कम्फर्टेबल’ वाटत नसे. कॅन्सर झाल्याचं कळल्यावर ‘पण मलाच का?,’ याशिवाय दुसरी भावनाच मनात येत नाही. पण नंतर विचार करताना ‘कॅन्सर कुणालाही होऊ शकतो’ हे हळूहळू पटू लागते. या सगळ्या प्रक्रियेनंतर मी कॅन्सरविषयी बोलायचे ठरवले, आणि खरेच, तुम्ही जितके जास्त त्याविषयी बोलता, तितकी ‘कम्फर्ट’ची जाणीव वाढत जाते.’’
प्रसिद्ध मॉडेल लीसा रे हिनेदेखील ‘मल्टिपल मायलोमा’ या रक्ताच्या कर्करोगाशी खूप हिमतीने लढा दिला आहे. आपल्या या लढय़ाचे अनुभव तिने तिच्या ‘द यलो डायरीज’ या ब्लॉगवर वेळोवेळी ‘शेअर’ केले आहेत. कर्करोगाच्या निदानानंतर तिने लिहिले होते, ‘‘आपल्या आरोग्याच्या बाबतीत नक्की काय बिघाड आहे हे कळल्यावरसुद्धा बरे वाटते! मला सततच्या थकव्याचा थकवा आला होता, आता लवकर काहीतरी करणे फार महत्वाचे होते.’’ बरी होऊन परतल्यानंतर तिनं एका मुलाखतीत म्हटले होते, ‘‘माझं बोलणे तुम्हाला विचित्र वाटेल, पण हा आजार म्हणजे आतापर्यंतची मला मिळालेली सगळ्यात मोठ्ठी भेट आहे. या कॅन्सरने मला आयुष्याकडे वेगळ्या पद्धतीने बघायला शिकवले. त्याने माझे जगणे पार बदलूनच टाकले. कॅन्सर म्हणजे मृत्यू नसतो हे मला पुन:पुन्हा सांगावसे वाटते. आपल्याला कॅन्सर असेल तर आपल्याला त्याचा स्वीकार करावाच लागतो आणि माझ्यावर विश्वास ठेवा, ते खरेच तितके अवघड नसते!’’
लीसा, युवराज, मनिषा हे सगळे आजही पूर्वीच्याच उत्साहाने कार्यरत आहेत. कर्करोगाविषयी बोलत आहेत, आपल्या बोलण्यातून सतत प्रेरणाही देत आहेत. फक्त हे तिघेच नव्हेत, अशी अनेक मंडळी आपल्यात आहेत. आपला कर्करोग स्वीकारून, सावरून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेकजण त्यातून पूर्णपणे बरेही झाले आहेत. आता गरज आहे, ‘कर्करोग म्हणजे मृत्यू’ हे समीकरण पूर्णपणे विसरण्याची! – शब्दांकन : संपदा सोवनी
मला कर्करोग आहे, ही जाणीव खूप निराश करणारी होती. पण ती नैराश्याची एक ‘फेज’ असते. पण त्यापासून दूर पळणे तर शक्य नव्हतेच. जगण्यासाठी तुम्हाला लढा द्यावाच लागतो.
युवराज सिंग, क्रिकेटपटू
माझे बोलणे तुम्हाला विचित्र वाटेल, पण हा आजार म्हणजे आतापर्यंतची मला मिळालेली सगळ्यात मोठ्ठी भेट आहे. या कॅन्सरने मला आयुष्याकडे वेगळ्या पद्धतीने बघायला शिकवले.
लीसा रे, मॉडेल
मला कॅन्सर झालाय हे कळणे माझ्यासाठी खूप मोठा धक्कादायक होते. पण आयुष्यात अशी खूपशी ‘सरप्रायझेस’ येत असतात. आपल्याला त्या सगळ्यांचा स्वीकार करावाच लागतो.
मनिषा कोईराला, अभिनेत्री
संग्रहित लेख, दिनांक 4th Feb 2014 रोजी प्रकाशित
‘ते’ जिंकले!
कर्करोग म्हणजे मृत्यूला कवटाळणे ही भीती समाजमनात खोलवर दडून बसली आहे. मात्र हा रोग नेहमी जीवघेणा असतोच असे नाही.
First published on: 04-02-2014 at 06:38 IST
मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World cancer day