इंडियन प्रिमिअर लीगचे(आयपीएल) माजी आयुक्त ललित मोदी यांनी बुधवारी आयपीएलमधील सामना निश्चिती प्रकरणासंबंधी गौप्यस्फोट केला.
मुद्गल समितीच्या अहवालात फिक्सिंगसंबंधी नमूद करण्यात आलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करण्याचा पवित्रा सर्वोच्च न्यायालयाने घेतला असता तर यामध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघातील चार खेळाडूंची नावे समोर असती, असा दावा ललित मोदी यांनी केला आहे.
आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या मुद्गल समितीने सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केलेल्या अहवालात काही बड्या खेळाडूंची नावे आहेत. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून न्यायालयाने अद्याप नावे जाहीर केलेली नाहीत. मात्र, ललित मोदींनी यावेळी चेन्नई सुपरकिंग्जच्या संघातील चार खेळाडूंचा फिक्सिंगमध्ये समावेश असल्याचे सांगत यामध्ये भारतासोबतच परदेशी खेळाडू देखील सहभागी असल्याचे ट्विट केले आहे. ललित मोदींच्या या ट्विटमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.