* आजचा पुण्याचा सामना निश्चित असल्याचे उघड
* बीसीसीआयची फिक्सिंग रोखण्याची धाव तोकडीच
* औरंगाबादमध्ये रणजीपटूसह तिघांना अटक
* सट्टेबाजांचा ऑनलाइन धंदा तेजीत
आयपीएल ही फिक्सिंगचीच लीग असल्याचे रविवारच्या पुणे वॉरियर्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यातील कथित सामना निश्चितीच्या प्रकाराने उघड झाले आहे. राजस्थान रॉयल्सच्या तीन खेळाडूंना ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणात अटक केल्यावरही रविवारच्या सामना निश्चितीच्या प्रकरणाने क्रिकेट विश्वाला जोरदार हादरा बसला. स्पॉट-फिक्सिंगचे प्रकरण समोर आले असले, तरी सट्टेबाजांचा ऑनलाइनचा धंदा तेजीत असल्याचेच दिसत आहे. सामना सुरू होण्यापूर्वीच निकाल निश्चित असल्याचे समोर आल्याने आयपीएल सट्टेबाजच चालवतात की काय, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान रविवारी कार्यकारिणीच्या बैठकीनंतर बीसीसीआयची प्रकरणातील हतबलता सर्वापुढे आली असून त्यांची फिक्सिंग रोखण्याची धाव तोकडीच असल्याचे प्रकर्षांने जाणवले. बीसीसीआयने आलेल्या आपत्तीचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला खरा, पण सामना निश्चितीच्या प्रकरणानंतर हे व्यवस्थापन कुचकामी असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान दिल्ली पोलिसांनी औरंगाबादमध्ये छापा टाकत नागपूरचा रणजीपटू मनीश गुड्डेवारसह तिघांना अटक केली, तर दिल्ली पोलिसांनी विविध शहरांतील हॉटेल्समधून खेळाडूंच्या संवादाचे चित्रीकरण मागवले आहे.