घरच्या मैदानात सुरुवातीपासूनच दमदार कामगिरी करत एकामागून एक विजय मिळवणारा कोलकाता नाइट रायडर्सचा संघ ईडन गार्डन्सवरील अखेरचा साखळी सामनाही गोड करण्यासाठी सज्ज झाला आहे. शनिवारी स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबबरोबर त्यांचा सामना होणार असून हा सामना जिंकत त्यांना विजयाची हॅट्ट्रिक साजरी करता येईल. त्याचबरोबर सध्याच्या घडीला कोलकाता तिसऱ्या स्थानावर असून या विजयासह दुसऱ्या स्थानावर जात बाद फेरीचे स्वप्न शाबूत ठेवण्याची त्यांना संधी असेल.
 कोलकाताने ईडन गार्डन्सवर पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. आतापर्यंत त्यांनी या मैदानात सहा सामन्यांपैकी पाच सामने जिंकले आहेत, फक्त रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धचा सामना त्यांना जिंकता आला नव्हता. फलंदाजीमध्ये आतापर्यंत कर्णधार गौतम गंभीर, रॉबिन उथप्पा आणि मनीष पांडे चांगली फलंदाजी करत आहेत.
गेल्या सामन्यात युसूफ पठाणने २४ चेंडूंमध्ये ४२ धावांची खेळी साकारत आपल्याला सूर गवसल्याचे दाखवून दिले आहे. गोलंदाजीमध्ये सुनील नरिनसारखा अव्वल गोलंदाज आता त्यांच्या ताफ्यामध्ये दाखल झाला आहे. त्याच्या अनुपस्थितीमध्ये ब्रॅड हॉगने भेदक गोलंदाजीचा नमुना पेश केला आहे.
पंजाबला गेल्या सामन्यात बंगळुरूकडून मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. ख्रिस गेलची झंझावाती ११७ धावांची खेळी आणि मिचेल स्टार्कच्या भेदक माऱ्यापुढे पंजाबच्या संघाची दाणादाण उडाली होती. त्यामुळे दोन्ही संघांचा विचार केल्यास पंजाबचे पारडे नक्कीच कोलकातापेक्षा वरचढ नसेल.
सामन्याची वेळ :
सायंकाळी  ४.०० वा.पासून
थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स आणि सोनी मॅक्स