पावसामुळे सामन्याला  दिरंगाईने सुरुवात झाली तरी आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेत टेन-१० सामन्याची रंगत बंगळुरूवासीयांनी शनिवारी अनुभवली. अखेरच्या षटकात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला विजयासाठी १३ धावांची आवश्यकता होती. परंतु पंजाबचा गुणी फलंदाज मनदीप सिंगने दडपण झुगारत तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर दोन षटकार खेचत दोन चेंडू आणि ७ विकेट्स राखून बंगळुरूच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मनदीपने फक्त १८ चेंडू ४ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ४५ धावांची खेळी साकारत दीपस्तंभाप्रमाणे भूमिका साकारली.
पावसामुळे षटकांची संख्या कमी झाल्यानंतर कोलकाता नाइट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १११ धावसंख्या उभारली. आंद्रे रसेलने १७ चेंडूंत ४५ धावा करून आपले मोलाचे योगदान दिले.
त्यानंतर बंगळुरूच्या डावात ख्रिस गेल (२१), विराट कोहली (३४) यांनी दमदार प्रारंभ करून दिला. पण गेल, कोहली आणि ए बी डी’व्हिलियर्स बाद झाल्यानंतर मनदीपने दिमाखात फलंदाजी केली. रसेलच्या अखेरच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर पॉइंटला तर चौथ्या चेंडूवर डीप फाइन लेगच्या डोक्यावरून षटकार ठोकत त्याने बंगळुरूच्या विजयाचा अध्याय लिहिला. या विजयासह बंगळुरूच्या खात्यावर ९ गुण जमा असून, आयपीएल गुणतालिकेत हा संघ तिसऱ्या स्थानावर आहे.

संक्षिप्त धावफलक
कोलकाता नाइट रायडर्स : १० षटकांत ४ बाद १११ (रॉबिन उथप्पा २३, आंद्रे रसेल ४५; मिचेल स्टार्क १/१५) पराभूत वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : ९.४ षटकांत ३ बाद ११५ (ख्रिस गेल २१, विराट कोहली ३४, मनदीप सिंग नाबाद ४५; आंद्रे रसेल १/२२)
सामनावीर : मनदीप सिंग