आयपीएलमध्ये सध्या सर्वात फॉर्ममध्ये असणाऱ्या खेळाडूंची नावे घ्यायची झाल्यास चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे नाव घ्यावेच लागले. नुकताच झालेल्या दिल्ली विरुद्धच्या सामन्यातही धोनी आणि वॉटसनच्या जोडीने संघाला चांगली धावसंख्या उभारण्यास मोलाचा हातभार लावल्यानेच चेन्नईला विजय मिळवता आला. या सामन्यानंतर बोलताना ऑस्ट्रेलियन संघातील अष्टपैलू खेळाडू असणाऱ्या आणि चेन्नईचा सलामीचा फलंदाज वॉटसन याने धोनीच्या शांत स्वभावाचे गोड कौतूक केले. धोनी इतका शांत कसा राहू शकतो हा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रश्नाचे उत्तर वॉटसनने दिले आहे.

पुण्यामध्ये धोनीबरोबर मैदानात दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई करुन सामन्यात विजय मिळल्यानंतर आयपीएलच्या औपचारिक वेबसाईटसाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये वॉटसनने धोनीच्या शांततेमागील गुपित उघड केले. मैदानातील धोनीचा शांत स्वभाव पाहून मला आश्चर्य वाटले. अशा शांत चित्ताच्या व्यक्तीबरोबर मैदानात खेळणे अविस्मरणीय अनूभव होता. धोनीचा हा शांतपणा कुठून आला याबद्दल बोलायचे झाले तर धोनीला झोप खूप प्रिय आहे असे मला वाटते जेवणाच्या वेळी किंवा नाश्त्याच्या वेळी धोनी आम्हाला अनेकदा दिसतच नाही कारण त्याला झोप खूप प्रिय आहे. तो भरपूर झोपतो अशी माहिती वॉटसनने दिली. धोनीला चेन्नईसाठी खेळायला खूप आवडते हे त्याच्या प्रत्येक कृतीतून दिसून येते. आणि त्यामुळेच त्याचे हे संघासाठीचे प्रेम अनेक खेळाडूंना प्रेरणा देते असेही वॉटसन म्हणाला.

वाचा: चेन्नईच्या धडाक्यासमोर कोलकाताची वाट बिकट

दिल्ली विरुद्धच्या सामन्यात धोनीने २२ चेंडूत नाबाद ५१ धावा केल्या तर सलामीला आलेल्या वॉटसनने ४० चेंडूत ७८ धावांचे योगदान दिले. या दोघांच्या खेळीमुळे चेन्नई पुण्याच्या मैदानातील सर्वोच्च म्हणजे २११ ही धावसंख्या उभारली. सात उत्तुंग षटकारांचा समावेश असलेली भन्नाट खेळी करणाऱ्या वॉटसनला या समान्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. धोनी यंदाच्या आयपीएल मोसमात चांगलाच फॉर्मात असून आठ सामन्यांमध्ये त्याने तीन अर्धशतकांच्या जोरावर १६९.२३ च्या सरासरीने २८६ धावा केल्या आहेत.

आज चेन्नई विरुद्ध कोलकाता हा समाना रंगणार आहे. चेन्नईचा संघ त्यांचे हे विजयी अभियान कायम राखण्याच्या इराद्यानेच गुरुवारी ईडन गार्डन्स मैदानात उतरणार असल्याने कोलकाता नाइट रायडर्स संघाला घरच्या मैदानावर विजय मिळवणे, हे मोठे आव्हान ठरणार आहे.