मोक्याच्या क्षणी राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी केलेल्या संथ खेळामुळे, अकराव्या हंगामातील आयपीएलमधला त्यांचा प्रवास संपुष्टात आलेला आहे. इडन गार्डन्सच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात, कोलकाता नाईट रायडर्सने २५ धावांनी विजय मिळवला. या विजयासह अंतिम फेरी गाठण्यासाठी कोलकाता एक पाऊल दूर आहे. शुक्रवारी कोलकात्याचा सामना सनराईजर्स हैदराबादशी रंगणार आहे, या सामन्यात विजयी झालेला संघ अंतिम फेरीत चेन्नईविरुद्ध लढणार आहे.

कोलकात्याने दिलेलं १७० धावांचं आव्हान घेऊन राजस्थानचे फलंदाज मैदानात उतरले. राहुल त्रिपाठी आणि कर्णधार अजिंक्य रहाणेने आपल्या संघाला चांगली सुरुवात करुन दिली. राहुल त्रिपाठी माघारी परतल्यानंतर अजिंक्य रहाणेने संजू सॅमसनच्या साथीने संघाचा डाव सावरला. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही झाली, मात्र या दरम्यान अजिंक्य रहाणेने केलेल्या संथ खेळामुळे राजस्थानची धावसंख्या अपेक्षेप्रमाणे वाढू शकली नाही.

दरम्यानच्या काळात कोलकात्याच्या गोलंदाजांनी सामन्यावर आपली पकड मजबूत करत राजस्थानच्या फलंदाजांना बॅकफूटला ढकललं. अजिंक्य रहाणे माघारी परतल्यानंतर एकही फलंदाज प्रसिध कृष्णा, कुलदीप यादव, पियुष चावला यासारख्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. एकाही गोलंदाजाने राजस्थानच्या फलंदाजांना मोठा फटका खेळण्याची संधीच दिली नाही, ज्यामुळे अखेरच्या षटकात सामना जिंकण्यासाठी अशक्यप्राय आव्हान निर्माण झालं. अखेर कोलकात्याने सामन्यात २५ धावांनी विजय मिळवत स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम राखलं आहे.  कोलकात्याकडून पियुष चावलाने सर्वाधीक २ बळी घेतले, त्याला प्रसिध कृष्णा आणि कुलदीप यादवने १ बळी घेत चांगली साथ दिली.

त्याआधी कर्णधार दिनेश कार्तिक, शुभमन गिल आणि अँड्रे रसेल यांनी मधल्या फळीत केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर कोलकात्याने घरच्या मैदानावर खेळताना १६९ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या राजस्थानच्या गोलंदाजांनी कोलकात्याची पहिली फळी झटपट माघारी धाडली. त्यामुळे घरच्या मैदानावर खेळणारा कोलकात्याचा संघ काहीकाळासाठी अडचणीत दिसला. मात्र कर्णधार दिनेश कार्तिक आणि शुभमन गिल यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला शंभरीचा टप्पा गाठून दिला. दिनेश कार्तिकने अर्धशतकी खेळी करत राजस्थानच्या गोलंदाजांवर हल्लाबोल चढवला. दिनेश कार्तिक माघारी परतल्यानंतर अँड्रू रसेलने संघाची कमान सांभाळत पुन्हा फटकेबाजीला सुरुवात केली. या जोरावर कोलकात्याने २० षटकांमध्ये १६९ धावांपर्यंत मजल मारली. राजस्थानकडून कृष्णप्पा गौथम, जोफ्रा आर्चर आणि बेन लाफिंन प्रत्येकी २ बळी घेतले.

  • कोलकाता सामन्यात २५ धावांनी विजयी
  • स्टुअर्ट बिन्नी एकही धाव न घेता माघारी, राजस्थानचे ४ गडी बाद
  • १८ व्या षटकात प्रसिध कृष्णाचा टिच्चून मारा, अवघ्या ३ धावा देत घेतला १ बळी
  • संजू सॅमनस पियुष चावलाच्या गोलंदाजीवर माघारी, राजस्थानचे ३ गडी माघारी
  • कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर रहाणे माघारी, राजस्थानचा दुसरा गडी माघारी
  • दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी
  • अजिंक्य रहाणे-संजू सॅमसन जोडीने संघाचा डाव सावरला
  • राहुल त्रिपाठी माघारी, राजस्थानला पहिला धक्का
  • अखेर पियुष चावलाने राजस्थानची जमलेली जोडी फोडली
  • राहुल त्रिपाठी-अजिंक्य रहाणे जोडीकडून मैदानात चौफेर फटकेबाजी
  • राजस्थानच्या सलामीवीरांची आक्रमक सुरुवात
  • २० षटकांमध्ये कोलकात्याची १६९ धावांपर्यंत मजल, राजस्थानला विजयासाठी १७० धावांचं आव्हान
  • कोलकात्याचा सेरल्स माघारी, ७ गडी बाद
  • कोलकात्याला सहावा धक्का, अर्धशतकी खेळी करुन कार्तिक माघारी
  • कर्णधार दिनेश कार्तिकचं अर्धशतक
  • दिनेश कार्तिक – अँड्रू रसेल जोडीने पुन्हा एकदा संघाचा डाव सावरला
  • कोलकात्याचा निम्मा संघ माघारी
  • अखेर कोलकात्याची जमलेली जोडी फुटली, शुभमन गिल माघारी
  • कोलकात्याने ओलांडला १०० धावांचा टप्पा
  • दोन्ही फलंदाजांकडून राजस्थानच्या गोलंदाजीवर हल्लाबोल
  • दिनेश कार्तिक-शुभमन गिल जोडीने संघाचा डाव सावरला
  • श्रेयस गोपालच्या गोलंदाजीवर ख्रिस लिन माघारी, कोलकात्याचा चौथा गडी बाद
  • कार्तिक – लिन जोडीकडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • कोलकात्याला तिसरा धक्का; नितेश राणा ३ धावांवर बाद
  • रॉबिन उथप्पा माघारी; कोलकात्याला दुसरा धक्का
  • दुसऱ्याच चेंडूवर नरीन यष्टीचीत, कोलकात्याचा पहिला गडी माघारी
  • कृष्णप्पा गौथमच्या पहिल्याच चेंडूवर सुनील नरीनचा खणखणीत चौकार
  • राजस्थानने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय