राजस्थान रॉयल्सने आपल्या संघातील दुखापतग्रस्त फिरकी गोलंदाज झहीर खानऐवजी न्यूझीलंडच्या इश सोधीला संघात जागा दिली आहे. अफगाणिस्तानच्या तरुण फिरकीपटू झहीर खान दुखापतीमुळे उरलेला हंगाम खेळू शकणार नाहीये. त्यामुळे राजस्थान प्रशासनाने न्यूझीलंडच्या इश सोधीला आपली पसंती दर्शवली आहे.

अकराव्या हंगामात आयपीएलच्या लिलावात इश सोधीवर बोली लावण्यात आलेली नव्हती. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर इश सोधीकडे गोलंदाजीचा मोठा अनुभव आहे. याचसोबत शेवटच्या फळीत इश सोधी चांगल्या धावा काढतो, या कारणांसाठी राजस्थान प्रशासनाने इश सोधीला संघात समाविष्ट करुन घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढच्या काही दिवसांमध्येच इश सोधी राजस्थान रॉयल्स संघात दाखल होणार आहे. त्यामुळे डर्सी शॉर्ट, बेन स्टोक्स, जोस बटलर, जोफ्रा आर्चर यांसारख्या खेळाडूंसोबत इश सोधीला संघात जागा मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आपल्या पहिल्या सामन्यात राजस्थानला पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यामुळे उर्वरित सामन्यांमध्ये राजस्थान कशी कामगिरी करतंय याकडे सर्व क्रीडा रसिकांचं लक्ष असणार आहे.