एबी डिव्हिलिअर्सने ऐनवेळी केलेल्या दमदार खेळीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने किंग्ज इलेव्हन पंजाबचा पराभव करत आयपीएलच्या या हंगामातील आपल्या विजयाचं खातं उघडलं आहे. आर अश्विनने डी क्किंटन डी कॉक आणि सर्फराजची सलग दोन चेंडूवर विकेट घेत आरसीबीला धक्का दिला होता. याआधी विराट कोहली आऊट झाल्याने आरसीबीला मोठा धक्का बसला होता. मात्र एबी डिव्हिलिअर्सने संयमी खेळी करत शेवटच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी करत संघाला विजयाजवळ नेलं. १० धावांची गरज असताना एबी डिव्हिलिअर्स झेलबाद झाला. त्याने ४० चेंडूत ५७ धावा केल्या. मात्र आऊट होण्याआधी त्याने आपली कामगिरी पार पाडली होती. आरसीबीने चार गडी आणि तीन चेंडू राखत पंजाबचा पराभव केला.

आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. आयपीएलच्या सलामीच्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभव स्वीकारल्यानंतर आजच्या सामन्यात विजय मिळवण्याचा आरसीबीचा प्रयत्न होता. हा सामना घरच्या मैदानावर होत असल्याने आरसीबीला नक्कीच मोठा पाठिंबा होता.

किंग्ज इलेव्हन पंजाबने प्रथम फलंदाजी करत विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु समोर विजयासाठी १५६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. सलामीवर लोकेश राहुलने सर्वाधिक ४७ धावा केल्या. करुण नायर २९ आणि कर्णधार अश्विनने ३३ धावा केल्या. या तिघांचा अपवाद वगळता पंजाबचे अन्य फलंदाज अपयशी ठरले. आरसीबीकडून उमेश यादव सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने चार षटकात २३ धावा देत ३ विकेट घेतल्या.

वोक्स, कुलवंत, वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. लोकेश राहुलने सुरुवातीच्या षटकांमध्ये फटकेबाजी करुन पंजाबला दमदार सुरुवात करुन दिली होती. पण त्यानंतर उमेश यादवने मयांक अग्रवाल, युवराज सिंग आणि अॅरॉन फिंच यांना स्वतात बाद करुन पंजाबच्या डावाला खिंडार पाडले.