पंजाबविरूद्धच्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण राजस्थानचा पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय पूर्णपणे फसला. मयंक अग्रवालचं धमाकेदार शतक आणि लोकेश राहुलचं अर्धशतक यांच्या बळावर पंजाबने २० षटकात २ बाद २२३ धावा ठोकल्या आणि राजस्थानला विजयासाठी डोंगराएवढं आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या फलंदाजांनीही तुफान प्रत्युत्तर दिलं.

२२४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने नवव्या षटकात शंभरी गाठली. कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि संजू सॅमसन यांनी पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई केली. सामन्यात निकोलस पूरनने ८ चेंडूत २५ धावा कुटल्या. त्यात ३ षटकार आणि १ चौकाराचा समावेश होता. त्यानंतर पंजाबच्या गोलंदाजीच्या वेळीदेखील तो चर्चेत राहिला. संजू सॅमसनने लगावलेला उत्तुंग फटका षटकार जाणार असं साऱ्यांनाच वाटत असताना पूरनने झेप घेत चेंडू सीमारेषेबाहेरून अडवला.

पाहा व्हिडीओ-

दरम्यान, पंजाबकडून मयंक अग्रवाल आणि राहुल यांनी शतकी सलामी दिली. मयंक अग्रवालने आपल्या IPL कारकिर्दीतील पहिलंवहिलं शतक ठोकलं. त्याने सामन्यात ५० चेंडूत १०६ धावांची खेळी केली. त्यात १० चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. राहुलने ५४ चेंडूत ६९ धावा करत त्याला चांगली साथ दिली. त्यानंतर पूरनने ८ चेंडूत २५ धावांची खेळी करत पंजाबला २२३ धावांपर्यंत मजल मारून दिली.