आयपीएलचा हंगाम आणि वाद हे समीकरण गेल्या काही वर्षांपासून कायम राहिलं आहे. तेराव्या हंगामातील दुसऱ्याच सामन्यात पंच नितीन मेनन यांनी दिलेल्या वादग्रस्त निर्णयामुळे पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे. ख्रिस जॉर्डनने काढलेली एक धाव पंच मेनन यांनी शॉर्ट रन म्हणून घोषित केली आणि पंजाबला दोनऐवजी केवळ एकच धाव दिली. परंतू टिव्ही रिप्लेमध्ये जॉर्डनने ती धाव व्यवस्थित पूर्ण केल्याचं दिसत होतं.

वादग्रस्त निर्णयाचा पंजाबला फटका??

पंच नितीन मेनन यांचा शॉर्ट रनचा निर्णय शेवटच्या क्षणांत महत्वपूर्ण ठरला. १० चेंडूत २१ धावांची गरज असताना मेनन यांनी जॉर्डनची एक धाव शॉर्ट रन म्हणून घोषित केली . ज्यामुळे पंजाबच्या खात्यात केवळ एकच धाव जमा झाली. अखेरच्या षटकांत विजायासाठी १३ धावांची गरज असताना मयांक अग्रवालने स्टॉयनिसच्या गोलंदाजीवर पहिल्या ३ चेंडूत ३ चौकार ठोकत सामना बरोबरीत आणला. मात्र विजयासाठी १ धाव आवश्यक असताना पंजाबचे दोन फलंदाज माघारी परतले. यामुळे सामना सुपरओव्हरमध्ये खेळवण्यात आला ज्यात दिल्लीने बाजी मारली. त्यामुळे मेनन यांनी तो वादग्रस्त निर्णय दिला नसता तर पंजाबचा संघ अखेरच्या षटकांत ३ चेंडू बाकी ठेवत जिंकला असता.

तिसऱ्या पंचांनी मध्यस्थी केली नाही, कारण…

तिसरे पंच म्हणून काम पाहणाऱ्या पॉल रॅफेल यांनी याप्रकरणी मध्यस्थी केली नाही. कारण मैदानावरील पंचांचा निर्णय बदलण्याचा अधिकार हा तिसऱ्या पंचांकडे नसतो. आयपीएलच्या नियमांनुसार तिसरे पंच हे फक्त नो-बॉल, रन आऊट आणि स्टम्पिंग यामध्येच आपला निर्णय देऊ शकतात. याव्यतिरीक्त मैदानावरील पंचांच्या निर्णयाविरोधातही खेळाडू DRS च्या मार्फत तिसऱ्या पंचांकडे दाद मागू शकतात. त्यामुळे तिसऱ्या पंचांना मैदानावरील पंचांचा निर्णय बदलण्याची परवानगी असते. शॉर्ट रन च्या बाबतीत मैदानावरील पंचांचा निर्णय हा अंतिम मानला जातो.