IPL 2020ची सुरूवात १९ सप्टेंबरपासून होणार आहे. सर्व संघाचे खेळाडू मैदानात उतरून सराव करताना दिसत आहेत. प्रत्येक संघाचे सराव सत्र आता अंतिम टप्प्यात असून सारेच स्पर्धेसाठी उत्सुक आहेत. जवळपास ५ महिन्यांनंतर खेळाडूंना मैदानात उतरायची संधी मिळणार आहे. त्यामुळे सारेच संघ आपलं सर्वस्व पणाला लावून विजेतेपद पटकावण्यासाठी प्रयत्न करतील, यात वाद नाही. पण याचदरम्यान कोलकाता संघाचा कर्णधार दिनेश कार्तिक आणि अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसल या दोघांमध्ये वाद असल्याची चर्चा आहे.

गेल्या वर्षी रसलने एका पत्रकार परिषदेत संघातील काही निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे दिनेश कार्तिक आणि रसल यांच्यात वाद निर्माण झाल्याची चर्चा होती. कोलकाताकडून २०१५-१६मध्ये खेळलेला ऑस्ट्रेलियन फिरकीपटू ब्रॅड हॉग यानेही गेल्या महिन्यातील आपल्या व्हिडीओमध्ये रसल-कार्तिक वादामुळे संघाचा तोटा होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर संघाचा मेंटॉर डेव्हिड हसी याने त्यावर स्पष्टीकरण दिले.

“रसल आणि कार्तिकमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही. उलट ते दोघे खूप चांगले मित्र आहेत. त्यांच्या मैत्रीचा संघालाही फायदाच होतो. कार्तिक हा स्पष्टवक्ता आहे. तो त्यांच्या संघातील प्रत्येक खेळाडूला सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रेरित करतो. कर्णधारासाठी हा एक चांगला गुण आहे. कार्तिकचं क्रिकेटवर खूप प्रेम आहे. संघात कोणताही बेबनाव नाही. सामना जिंकणं हेच साऱ्यांचे ध्येय आहे”, असे हसीने सांगितले.