इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) दरवर्षी आठ संघ सहभागी होतात. मात्र यापैकी एक संघ बाद फेरीत म्हणजेच प्लेऑफमध्ये पोहचणार हे निश्चित समजलं जायचं. आयपीएलमध्ये प्लेऑफ खेळण्यासाठी सात संघ स्पर्धा करतात तर चेन्नई सुपरकिंग्स सहज प्लेऑफमध्ये पोहचतो असं अनेक क्रिकेट चहाते म्हणतात. मात्र आयपीएल २०२० मध्ये हे चित्र पाटल्याचे दिसत आहे. यंदाचे आयपीएल चेन्नईसाठी फारसे चांगले ठरलेले नाही. त्यामध्ये अगदी धोनीची कामगिरी असो, खेळाडूंनी माघार घेणे असोत किंवा फलंदाजीत सातत्य नसणे असो सर्व काही चेन्नईच्या विरोधातच दिसले. त्यामुळेच २००८ पासून म्हणजेच आयपीएल सुरु झाल्यापासून अबाधित ठेवलेल्या विक्रमात आता खंड पडणार आहे. रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सच्या संघावर आठ गडी राखवून विजय मिळवल्याने चेन्नईचा संघ अधिकृतरित्या आयपीएलच्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. बादफेरीआधी चेन्नईचा संघ बाहेर पडण्याची ही आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासातील पहिलीच वेळ आहे.

चेन्नईने आतापर्यंत आयपीएलमधील चार सामने जिंकले असून त्यांचे एकूण आठ गुण आहेत. चेन्नईच्या संघाचे दोन सामने शिल्लक राहिले असून हे दोन्ही सामने जिंकले तरी त्याचे एकूण गुण १२ होतील. चेन्नईने दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला तरी सध्या गुणतालिका पाहिल्यास दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु त्यांच्यापेक्षा पुढेच असणार. सध्या दिल्ली आणि आरसीबीचे प्रत्येकी १४ गुण आहेत. तर उरलेल्या कोलकाता, हैदराबाद, पंजाब आणि राजस्थानसारख्या संघांचे भवितव्य त्यांच्या पुढील सामन्यांवर अवलंबून असणार आहे. हे संघ एकमेकांविरोधात खेळतात पराभूत झाल्यास त्यानुसार क्रमवारी ठरणार आहे. विशेष म्हणजे काहीही झालं तरी या संघाचे गुण हे चेन्नईच्या समान किंवा त्यांच्यापेक्षा अधिकच राहतील. त्यामुळेच चेन्नईने सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवला तरी ते स्पर्धेबाहेर जाणार हे नक्की झालं आहे.

चेन्नईचा आतापर्यंतचा प्रवास

२००८ साली आयपीएलची सुरुवात झालेली त्यावेळी चेन्नईच्या संघाने अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती. अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नईचा पराभव केला होता. २००९ साली चेन्नईचा संघ उपांत्य फेरीपर्यंत मजल मारु शकला. २०१० मध्ये चेन्नईने पहिल्यांदा आयपीएलच्या चषकावर आपले नाव कोरले. २०११ मध्ये सलग दुसऱ्या वर्षी चेन्नईने ही स्पर्धा जिंकली. २०१२ मध्ये चेन्नई उपविजेता संघ ठरला. २०१३ मध्येही चेन्नईला अंतिम सामन्यापर्यंत पोहचण्यात अपयश आलं. २०१४ मध्ये चेन्नईचा संघ एलिमिनेटर फेरीत बाहेर गेला. २०१५ मध्ये चेन्नई पुन्हा एकदा उपविजेता ठरला. २०१६ आणि २०१७ मध्ये चेन्नईच्या संघावर बंदी घालण्यात आल्याने संघ स्पर्धेत सहभागी झाला नव्हता. २०१८ मध्ये दोन वर्षानंतर मैदानावर आलेल्या चेन्नईच्या संघाने तिसऱ्यांदा चषकावर नाव कोरलं. २०१९ मध्ये चेन्नई आणि मुंबईदरम्यान झालेल्या अंतिम सामन्यात मुंबईने बाजी मारली. तर यंदा ग्रुप स्टेजमध्येच चेन्नईचे आव्हान संपुष्टात आलं आहे.

आज विजय आवश्यक

आज होणाऱ्या पंजाब विरुद्ध कोलकाता सामन्यामध्ये दोन्ही संघांना बादफेरीत जाण्यासाठी विजय आवश्यक आहे. पंजाबचे ११ सामन्यांतून पाच विजय आणि सहा पराभवांसह १० गुण आहेत. याउलट कोलकात्याचे ११ सामन्यांतून सहा विजय आणि पाच पराभव यांच्यासह १२ गुण आहेत. कोलकाता चौथ्या आणि पंजाब पाचव्या स्थानी आहे. जर कोलकाताविरुद्धच्या लढतीत विजय मिळवता आला तर पंजाबला चौथे स्थान मिळवता येईल. याउलट कोलकाता जिंकला तर चौथे स्थान त्यांना राखता येईल. बाद फेरीसाठीची चुरस तीव्र होत असताना कोणत्याही संघाला पराभव परवडणारा नाही. मुंबई, दिल्ली आणि आरसीबी बादफेरीत पोहचल्याने मानले जात असून शेवटच्या चौथ्या स्थानासाठी चार संघांमध्ये चुरस आहे.