स्टिव्ह स्मिथ, जोस बटवर, संजू सॅमसन यासारख्या फॉर्मात असलेल्या फलंदाजांवर अंकुश लावत विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. २० षटकांत राजस्थानचा संघ १५४ धावांपर्यंतच मजल मारु शकला. नाणेफेक जिंकतून स्मिथने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतू RCB च्या गोलंदाजांनी राजस्थानच्या फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवत पहिल्या डावात आपलं वर्चस्व कायम राखलं.

सामन्यात १९ व्या षटकादरम्यान एक गमतीशीर प्रसंग घडलेला पहायला मिळाला. श्रीलंकेचा इसुरु उदाना गोलंदाजी करत असताना पाचव्या चेंडूवर जोफ्रा आर्चरने यॉर्कर चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला ज्यात तो फसला. यादरम्यान नॉन स्ट्राईक एंडवर उभा असलेला राहुल तेवतिया धाव घेण्यासाठी आर्चरपर्यंत पोहचला होता. यावेळी इसुरु उदाना वेळेत बॉल उचलण्यात अपयशी ठरला. ज्यावेळी त्याने बॉल हातात घेऊन कोहलीकडे चुकीचा थ्रो-दिला…ज्यामुळे मैदानाच चांगलंच गमतीशीर वातावरण तयार झालं होतं. पाहा हा व्हिडीओ…

राजस्थानच्या संघाची सुरुवातच खराब झाली. कर्णधार स्टिव्ह स्मिथ इसुरु उदानाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. यानंतर संजू सॅमसन आणि जोस बटलर यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतू नवदीप सैनीने सापळा रचत बटलरला स्लिपमध्ये उभ्या असलेल्या पडीकलकडे झेल द्यायला भाग पाडलं. बटलरने २२ धावा केल्या. यानंतर भरवशाचा संजू सॅमसनही ४ धावा काढत चहलच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर रॉबिन उथप्पा आणि महिमाल लोमरोर यांनी संघाचा डाव सावरला. मैदानावर स्थिरावू पाहत असलेल्या रॉबिन उथप्पाला चहलने बाद करत राजस्थानला आणखी एक धक्का दिला.

यानंतर अंकीत राजपूतच्या जागी संघात स्थान मिळालेल्या महिपाल लोमरोरने फटकेबाजी करत राजस्थानला आश्वासक धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला. परंतू अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात तो देखील माघारी परतला. महिपालने ३९ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकारांसह ४७ धावा केल्या. यानंतर जोफ्रा आर्चर आणि राहुल तेवतिया यांनी अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. परंतू फॉर्मात असलेल्या RCB च्या गोलंदाजांनी इथेही राजस्थानला फारशी संधी दिली नाही. बंगळुरुकडून युजवेंद्र चहलने ३, इसुरु उदानाने २ तर नवदीप सैनीने १ बळी घेतला.