Dream11 IPL 2020 DC vs KKR: अतिशय रोमांचक अशा सामन्यात शनिवारी दिल्लीने कोलकाता संघावर विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्स संघाने शारजाच्या मैदानावर श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ यांच्या अर्धशतकांच्या बळावर कोलकाताला २२९ धावांचे विशाल लक्ष्य दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना इयॉन मॉर्गन आणि राहुल त्रिपाठी यांनी शेवटच्या काही षटकांमध्ये ३० चेंडूत ७८ धावांची भागीदारी करत सामन्यात रंगत आणली. पण अखेर त्यांना १८ धावांनी पराभवाला सामोरं जावं लागलं.

२२९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सुनील नारायण ३ धावांवर बाद झाला. शुबमन गिलला चांगली सुरूवात मिळाली पण तो २२ चेंडूत २८ धावा करून बाद झाला. आंद्रे रसेल (१३), दिनेश कार्तिक (६) आणि पॅट कमिन्स (५) झटपट बाद झाले. नितीश राणाने फटकेबाजी करत ३५ चेंडूत ५८ धावा केल्या. तो बाद झाल्यावर दिल्ली सामना एकतर्फी जिंकणार असं वाटत होतं. पण इयॉन मॉर्गन आणि राहुल त्रिपाठी या दोघांनी मोक्याच्या क्षणी अप्रतिम फटकेबाजी केली. या दोघांनी ३० चेंडूत ७८ धावा कुटल्या. त्यामुळे सामन्यात रंगत आली. पण १८ चेंडूत ५ षटकारांसह ४४ धावा करणारा मॉर्गन बाद झाला. त्यानंतर अखेरच्या षटकात राहुल त्रिपाठीदेखील १६ चेंडूत ३६ धावा करून त्रिफळाचीत झाला. त्यामुळे अखेर कोलकाताला १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याआधी, कर्णधार दिनेश कार्तिकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तो निर्णय प्रचंड फसला. सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या दोघांनी अर्धशतकी सलामी दिली. धवन २६(१६) धावांवर बाद झाला. पृथ्वी शॉने आपले अर्धशतक पूर्ण केले, पण मोठा फटका खेळताना तो ६६(४१) धावांवर बाद झाला. त्याने ४ चौकार आणि ४ षटकार लगावले. ऋषभ पंतनेही तुफान फटकेबाजी केली. तो ५ चौकार आणि एका षटकारासह ३८(१७) धावांवर बाद झाला. कर्णधार श्रेयस अय्यरने मात्र धडाकेबाज खेळी केली. त्याने फक्त ३८ चेंडूत नाबाद ८८ धावा ठोकल्या. त्याने ७ चौकार आणि ६ षटकार लगावले. या फटकेबाजी जोरावर दिल्लीने २० षटकात ४ बाद २२८ धावा केल्या. रसेलने सर्वाधिक २ बळी टिपले.