राजस्थान रॉयल्सने शारजाच्या मैदानात षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करत आयपीएलच्या इतिहासातली सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. पंजाबने विजयासाठी दिलेलं २२४ धावांचं आव्हान राजस्थानने ४ गडी राखून पूर्ण केलं. अष्टपैलू राहुल तेवतिया राजस्थानच्या विजयाचा हिरो ठरला. शेल्डन कोट्रेलने टाकलेल्या १८ व्या षटकात तेवतियाने ५ षटकार खेचत सामन्याचं चित्र पूर्णपणे पालटलं. एका क्षणाला पंजाब सामन्यात बाजी मारेल असं वाटत असतानाच तेवतियाने फटकेबाजी करत सामना राजस्थानच्या बाजूने झुकवला. आयपीएल मालिकेमधील ५६ पैकी ९ व्या सामन्यातील राजस्थानच्या या अनपेक्षित विजयामुळे गुणतालिकेमध्ये त्यांना दुसरे स्थान कायम राखण्यात यश मिळालं आहे. तर या पराभवामुळे पंजाबला फासरा फटका बसला नसला तरी मालिकेतील दुसरा पराभव त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे.

पहिल्या नऊ सामन्यांनंतर गुणतालिकेमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स प्रत्येकी दोन विजयांसहीत चार गुणांसोबत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत. नेट रनरेटच्या हिशोबाने दिल्ली कॅपिटल्स राजस्थान रॉयल्सपेक्षा सरस असल्याने दोघांकडेही चार गुण असले तरी दिल्ली अव्वल स्थानी आहे. पंजाब, मुंबई, कोलकात्ता, चेन्नई, बंगळुरु हे पाचही संघांनी प्रत्येकी एका विजयासहीत दोन गुण मिळवले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर पंजाब, चौथ्या क्रमांकावर मुंबई, पाचव्या क्रमांकावर कोलकाता, सहाव्या क्रमांकावर चेन्नई आणि सातव्या क्रमांकावर बंगळुरुचा संघ आहे. मालिकेतील आपले पहिले दोन्ही सामने गमावल्याने हैदराबादला अजून गुणतालिकेमध्ये भोपळाही फोडता न आल्याने ते तळाशी आहेत.


आयपीएलच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.