राजस्थानविरूद्धच्या सामन्यात चेन्नईच्या फलंदाजांनी अत्यंत सुमार कामगिरी केली. राजस्थानच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे CSKला २० षटकांत ६ बाद १२५ धावांपर्यंतच मजल मारता आली. रविंद्र जाडेजाने सर्वाधिक नाबाद ३५ धावा केल्या. श्रेयस गोपाल, राहुल तेवातिया, कार्तिक त्यागी आणि जोफ्रा आर्चर यांनी प्रत्येकी १-१ बळी टिपला. गेले कित्येक सामने सातत्याने अपयशी ठरणारा केदार जाधव या सामन्यातही टीकेचं लक्ष्य ठरला. शेवटची २ षटकं शिल्लक असताना मैदानात आलेल्या केदारला ७ चेंडूत अवघ्या ४ धावाच करता आल्या. तसेच यंदाच्या हंगामात केदारने ८ सामन्यात केवळ ६२ धावा केल्या. त्यामुळे केदारबद्दल नेटकऱ्यांमध्ये प्रचंड संताप दिसून आला. त्याच्याबद्दल भन्नाट मीम्स व्हायरल झालेले दिसले.

दरम्यान, नाणेफेक जिंकून चेन्नईने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांच्या डावाची सुरूवात खराब झाली. सलामीवीर फाफ डु प्लेसिस १० धावांवर बाद झाला. शेन वॉटसनही ८ धावा काढून माघारी परतला. सॅम करनला चांगली सुरूवात मिळाली पण १ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २२ धावा केल्यावर तो झेलबाद झाला. चांगल्या लयीत असलेला रायडू (१३ स्वस्तात बाद झाला. त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रविंद्र जाडेजा यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला शंभरी पार करून दिली. १८व्या षटकात धोनी २८ धावांवर धावचीत झाला. अखेरीस रविंद्र जाडेजा (३५*) आणि केदार जाधव (४*) या दोघांनी संघाला २० षटकांत ५ बाद १२५ धावांपर्यंत मजल मारून दिली. श्रेयस गोपालने १४ धावांत १ बळी, राहुल तेवातियाने १८ धावांत १ बळी तर जोफ्रा आर्चरने २० धावांत १ बळी टिपत भेदक मारा केला.