चेन्नईविरूद्धच्या सामन्यात राजस्थानच्या संघाने नावाप्रमाणेच रॉयल विजय मिळवत आपले स्पर्धेतील आव्हाना जिवंत ठेवले. चेन्नईच्या फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करत अत्यंत सुमार कामगिरी केली होती. राजस्थानच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे CSKला २० षटकांत ६ बाद १२५ धावांपर्यंतच मजल मारता आली होती. १२६ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या डावाची सुरूवात खराब झाली होती, पण जोस बटलर आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ या दोघांनी आपला अनुभव पणाला लावत संयमी खेळ करून सामना जिंकला. बटलरने नाबाद अर्धशतक ठोकले. या विजयासह राजस्थानने ८ गुणांसह आठव्या स्थानावरून थेट पाचव्या स्थानी झेप घेतली.

राजस्थान विरूद्धच्या सामन्यात नाणेफेकीसाठी आलेल्या कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थानविरूद्धचा हा सामना महेंद्रसिंग धोनीचा IPL स्पर्धेतील २००वा सामना होता. IPL स्पर्धेत २०० सामने खेळणारा धोनी पहिला खेळाडू ठरला. पण धोनीची एक खास परंपरा खंडीत झाली. मैलाचा दगड समजल्या जाणाऱ्या सामन्यांमध्ये धोनीने कधीही पराभवाचे तोंड पाहिले नव्हते, पण आजच्या सामन्यात त्याचा संघ पराभूत झाला. पहिल्या, ५०व्या, १००व्या आणि १५०व्या सामन्यात संघाचे नेतृत्व करताना CSK विजयी झाला होता, पण २००व्या सामन्यात मात्र ती परंपरा खंडीत झाली.

असा रंगला सामना

१२६ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या डावाची सुरूवात अतिशय खराब झाली. बेन स्टोक्स १९ धावांवर बाद झाला. पाठोपाठ रॉबिन उथप्पा (४) आणि संजू सॅमसन (०) दोघेही झटपट बाद झाले. या दोघांचाही झेल कर्णधार-यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने पकडला. पण त्यानंतर जोस बटलर आणि स्टीव्ह स्मिथ या दोन अनुभवी खेळाडूंना अजिबात चुका केल्या नाहीत. खेळपट्टीचा अंदाज घेत सावध खेळ करून त्यांनी ७८ चेंडूत नाबाद ९८ धावांची भागीदारी केली. बटलरने ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ७० धावा केल्या. कर्णधार स्मिथने २ चौकारांच्या मदतीने नाबाद २४ धावा करत त्याला उत्तम साथ दिली. चेन्नईकडून दीपक चहरने २ तर जोश हेजलवूडने १ बळी टिपला.

नाणेफेक जिंकून चेन्नईने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांच्या डावाची सुरूवात खराब झाली. सलामीवीर फाफ डु प्लेसिस १० धावांवर बाद झाला. शेन वॉटसनही ८ धावा काढून माघारी परतला. सॅम करनला चांगली सुरूवात मिळाली पण १ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २२ धावा केल्यावर तो झेलबाद झाला. चांगल्या लयीत असलेला रायडू (१३ स्वस्तात बाद झाला. त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रविंद्र जाडेजा यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला शंभरी पार करून दिली. १८व्या षटकात धोनी २८ धावांवर धावचीत झाला. अखेरीस रविंद्र जाडेजा (३५*) आणि केदार जाधव (४*) या दोघांनी संघाला २० षटकांत ५ बाद १२५ धावांपर्यंत मजल मारून दिली. श्रेयस गोपालने १४ धावांत १ बळी, राहुल तेवातियाने १८ धावांत १ बळी तर जोफ्रा आर्चरने २० धावांत १ बळी टिपत भेदक मारा केला.