चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने महत्वाच्या क्षणी बाजी पलटवत विजय मिळवला. शेन वॉटसन आणि अंबाती रायुडू जोडी मैदानात असताना एका क्षणाला चेन्नई सामना सहज जिंकेल असं वाटत असताना…चेन्नईच्या फलंदाजांनी हाराकिरी केली. त्याआधी कोलकाता नाईट रायडर्सकडून पुण्याच्या राहुल त्रिपाठीने बहारदार खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

कोलकात्याचे इतर फलंदाज अपयशी ठरत असतानाही राहुल त्रिपाठीने एक बाजू लावून धरत संघाला १६७ धावांपर्यंत मजल मारुन दिली. त्रिपाठीने ५१ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने ८१ धावा केल्या. या खेळीसाठी राहुल त्रिपाठीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. सामनावीराचा पुरस्कार स्वीकारत असताना…KKR चा सहमालक शाहरुख खाननेही राहुल त्रिपाठीच्या खेळीचं कौतुक करत…स्टेडीयममधून राहुल, नाम तो सुना होगा हा आपला प्रसिद्ध डायलॉग बोलून दाखवला. पाहा हा व्हिडीओ…

दरम्यान, १६८ धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाने आश्वासक सुरुवात केली. फाफ डु-प्लेसिस आणि शेन वॉटसनने सुरुवातीच्या षटकांमध्ये काही चांगले फटके खेळले. शिवम मवीने डु-प्लेसिसला माघारी धाडत चेन्नईला पहिला धक्का दिला. यानंतर मैदानात आलेल्या अंबाती रायुडूने शेन वॉटसनला चांगली साथ दिली. दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी करत चेन्नईचा डाव सावरला. ही जोडी चेन्नईला विजयपथावर घेऊन जाणार असं वाटत असतानाच कमलेश नागरकोटीने रायुडूला माघारी धाडलं. दुसरीकडे शेन वॉटसनने आपलं अर्धशतक पूर्ण केलं, मात्र यानंतर लगेचच तो नारायणच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन माघारी परतला.

मोक्याच्या क्षणी कोलकाताच्या गोलंदाजांनी विकेट घेतल्यामुळे चेन्नईचा संघ काहीसा बॅकफूटवर गेला. दिनेश कार्तिकने सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांचा सुरेख वापर करत चेन्नईच्या फलंदाजांवर दबाव आणला. महेंद्रसिंह धोनीने हा दबाव झुगारत फटकेबाजीचा प्रयत्न केला. पण यात त्याला अपयश आलं. वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना तो ११ धावा काढून माघारी परतला. त्याच्या सोबत असलेला सॅम करनही आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करताना माघारी परतला. यानंतर चेन्नईचे फलंदाज सामन्यात पुनरागमन करु शकले नाहीत. कोलकात्याकडून शिवम मवी, वरुण चक्रवर्ती, नागरकोटी, नारायण आणि रसेल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.