गेल्या काही दिवसांपासून सर्व भारतीय क्रिकेटप्रेमी ज्याची वाट पाहत होते ते आयपीएलचं वेळापत्रक बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी जाहीर केलं. १९ सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार असून रोहित शर्माची मुंबई इंडियन्स आणि महेंद्रसिंह धोनीची चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. मुंबईच्या संघात यंदा रोहित आणि क्विंटन डी-कॉक सोबतच ऑस्ट्रेलियाच्या ख्रिस लिनला संधी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत सलामीला नेमकी कोणाला संधी द्यायची हा प्रश्न मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटसमोर असणार आहे. परंतू भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याच्या मते मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्माने सलामीला येणं गरजेचं आहे. रोहितला सलामीला संधी मिळाल्यास यंदाच्या हंगामात तो ५०० धावाही काढू शकतो.

“यंदाच्या हंगामातही रोहित शर्मा हाच मुंबई इंडियन्ससाठी महत्वाचा खेळाडू ठरणार आहे. मला खात्री आहे रोहितने मुंबई इंडियन्ससाठी सलामीला येण्याचा निर्णय घेतला तर तो चांगली कामगिरी करेल. यंदाच्या हंगामात तो ५०० धावाही काढू शकतो, त्याने असं करुन दाखवलं तर संघासाठी ते नक्कीच फायदेशीर ठरेल. गेल्या हंगामात मुंबई इंडियन्सने विजेतेपद पटकावलं त्यावेळी संघातील ५ खेळाडूंनी ४०० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. यंदाही मुंबईला अशाच प्रकारची कामगिरी करावी लागणार आहे.” आकाश चोप्रा आपल्या यू-ट्युब चॅनलवर बोलत होता.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या हंगामात आयपीएलचं पाचवं विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करेल. रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने याआधी ४ वेळा विजेतेपद पटकावलं आहे. २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ या चार हंगामात मुंबईने विजेतेपद मिळवलंय. अशी कामगिरी करणारा मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील एकमेव संघ आहे. त्यामुळे या हंगामात रोहित आणि त्याचे खेळाडू पुन्हा एकदा अशीच कामगिरी करुन दाखवतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – Video : ‘हिटमॅन’चा तडाखा, सरावादरम्यान मारलेला षटकार थेट मैदानाबाहेर