अतिशय रोमांचक अशा सामन्यात शनिवारी दिल्लीने कोलकाता संघावर विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्स संघाने शारजाच्या मैदानावर श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ यांच्या अर्धशतकांच्या बळावर कोलकाताला २२९ धावांचे विशाल लक्ष्य दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना इयॉन मॉर्गन आणि राहुल त्रिपाठी यांनी शेवटच्या काही षटकांमध्ये ३० चेंडूत ७८ धावांची भागीदारी करत सामन्यात रंगत आणली. पण अखेर त्यांना १८ धावांनी पराभवाला सामोरं जावं लागलं.

या सामन्यात कोलकात्याचा कर्णधार दिनेश कार्तिकच्या रणनितीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं. फटकेबाजीचा चांगला अनुभव असलेल्या राहुल त्रिपाठीला मधल्या फळीत पाठवणं, फॉर्मात नसलेल्या सुनील नारायणला सलामीला फलंदाजीसाठी पाठवणं यामुळे कार्तिक टीकेचा धनी बनला आहे. भारतीय संघाचा गोलंदाज एस.श्रीसंतने ट्विट करत मॉर्गनने कोलकात्याचं नेतृत्व करावं असं म्हटलं आहे. विश्वचषक विजेत्या संघाला KKR चं नेतृत्व करण्याची संधी मिळायला हवी. मला आशा आहे की KKR यात लक्ष घालेल, असं म्हणत श्रीसंतने कार्तिकला टोला लगावला आहे.

रोहित, धोनी, विराटप्रमाणे पुढे येऊन संघाचं नेतृत्व करणाऱ्या कर्णधाराची कोलकात्याला गरज असल्याचं श्रीसंत म्हणाला. २२९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सुनील नारायण ३ धावांवर बाद झाला. शुबमन गिलला चांगली सुरूवात मिळाली पण तो २२ चेंडूत २८ धावा करून बाद झाला. आंद्रे रसेल (१३), दिनेश कार्तिक (६) आणि पॅट कमिन्स (५) झटपट बाद झाले. नितीश राणाने फटकेबाजी करत ३५ चेंडूत ५८ धावा केल्या. तो बाद झाल्यावर दिल्ली सामना एकतर्फी जिंकणार असं वाटत होतं. पण इयॉन मॉर्गन आणि राहुल त्रिपाठी या दोघांनी मोक्याच्या क्षणी अप्रतिम फटकेबाजी केली. या दोघांनी ३० चेंडूत ७८ धावा कुटल्या. त्यामुळे सामन्यात रंगत आली. पण १८ चेंडूत ५ षटकारांसह ४४ धावा करणारा मॉर्गन बाद झाला. त्यानंतर अखेरच्या षटकात राहुल त्रिपाठीदेखील १६ चेंडूत ३६ धावा करून त्रिफळाचीत झाला. त्यामुळे अखेर कोलकाताला १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.