आयपीएलच्या तेराव्या हंगामाला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होते आहे. अबु धाबीत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी कॉमेंट्री पॅनलची घोषणा केली. ज्यात भारताचे माजी खेळाडू आणि प्रख्यात समालोचक संजय मांजरेकर यांना स्थान नाकारण्यात आलं. गेल्या काही महिन्यांत समालोचन करताना भारतीय खेळाडूंवर केलेली टीका यामुळे बीसीसीायमधील काही अधिकारी मांजरेकर यांच्यावर नाराज होते. काही दिवसांपूर्वी मांजरेकर यांनी पत्र लिहून बीसीसीआयला आयपीएलमध्ये समालोचन करण्याची संधी द्यावी अशी मागणी केली होती, मात्र ही संधीही त्यांना नाकारण्यात आली. अखेरीस याप्रकरणाव मांजरेकर यांनी आपलं मौन सोडलं आहे.

“त्याप्रकरणावर काहीही न बोललेलंच बरं आहे. कॉमेंट्री करत नसलो तरीही मी ESPNCricinfo साठी कार्यक्रम करतोय. एका वृत्तवाहिनीसाठी एक्सपर्ट गेस्ट म्हणून माझी चर्चा सुरु आहे. याव्यतिरीक्त फँटसी लिगमध्ये इन-हाऊस एक्सपर्ट, एफ-एम चॅनल आणि कॉलम असा माझा कार्यक्रम असणार आहे. आपल्या भारतीयांना टीका सहन होत नाही. दुसरी समस्या म्हणजे अनेकदा इंग्रजी भाषेतल्या एका शब्दाचा किंवा वाक्याचा चुकीचा अर्थ लावला जातो. त्यामुळे अनेकदा मी कॉमेंट्री करत असताना वापरलेल्या शब्दांचा चुकीच्या पद्धतीने अर्थ घेतला जातो.” Moneycontrol संकेतस्थळाशी बोलत असताना मांजरेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

याव्यतिरीक्त IPL सामन्यांचं प्रक्षेपण करण्याचे हक्क असलेल्या Star Sports वाहिनीने यंदाच्या हंगामासाठी अँकर्स आणि प्रेझेंटर्सची यादी जाहीर केली आहे. ज्यात मयांती लँगरला स्थान देण्यात आलेलं नाही. काही दिवसांपूर्वीच मयांतीने आपल्या बाळाला जन्म दिल्यामुळे तिने यंदा आयपीएलमधून माघार घेण्याचं ठरवलंय. याव्यतिरीक्त Star Sports ने यंदा सुरेन सुंदरम, किरा नारायणन, सोहेल चांढोक, नशप्रीत कौर, संजना गणेशन, जतीन सप्रू, तान्या पुरोहित, अनंत त्यागी, धीरज जुनेजा आणि नेरोली मेडोव्ज यांना संधी दिली आहे.