भारतामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. करोनाचा पटका आता आयपीएललाही बसला असून संपूर्ण स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय़ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने घेतला आहे. भारतामध्ये रोज साडेतीन लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत असतानाच दुसरीकडे बायो बबलच्या सुरक्षेमध्ये आयपीएलच्या सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र बायो-बबलचा हा फुगा सोमवारी फुटला आणि सोमवारी कोलकाता संघातील दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर कोलकाता विरुद्ध बंगळुरु सामना पुढे ढकलण्यात आला. यानंतर सोमवारी दुपारी चेन्नईच्या संघातील तिघांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. मंगळवारी हैदराबादचा वृद्धिमान साहा यालाही करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आणि मुंबईविरुद्ध हैदराबाद सामना स्थगित करण्यासंदर्भातील चर्चा सुरु झाली. मात्र त्यापूर्वीच बीसीसीआयने संपूर्ण स्पर्धा पुढे ढकलत असल्याचं जाहीर केलं. मागील दोन दिवसां काय काय घडामोडी घडल्यात जाणून घेऊयात…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१) सोमवारी कोलकाता संघातील वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरीयर या दोन खेळाडूंना करोनाची लागण झाली. ‘कोलकाता संघातील दोन खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बंगळुरुचे खेळाडू त्यांच्याविरोधात मैदानात उतरण्यास तयार नाहीत वरुण आणि संदीपची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे केकेआर आणि आरसीबी सामना पुढे ढकलण्यात आली आहे’, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं. येथे वाचा सविस्तर वृत्त

२)  कोलकाता संघातील दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या (सीएसके) संघातही करोनाने ‘एन्ट्री’ घेतल्याची माहिती सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास समोर आली. चेन्नईच्या तीन सदस्यांना करोनाची लागण झाल्याचं सांगण्यात आलं.  सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि बसचा क्लीनर यांना करोनाची लागण झाल्याची माहिती इएसपीएन क्रिकएन्फोने दिली. येथे वाचा सविस्तर वृत्त 

३) दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) पाच ग्राउंड कर्मचारी कोरोना संक्रमित असल्याची माहिती सोमवारी दुपारी पाचच्या सुमारास समोर आली. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर ८ मेपर्यंत आयपीएल सामन्यांचे आयोजन करण्याची योजना होती. राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबादसह चार संघ या सामन्यांसाठी दिल्लीत आहेत. येथे वाचा सविस्तर वृत्त

४) बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार केकेआर आणि आरसीबीप्रमाणे अन्य सामने पुढे ढकलले जाणार नसल्याचा दावा केला होता. बीसीसीआयने केकेआर आणि आरसीबी यांच्यातील हा सामना केव्हा आणि कोठे आयोजित होईल याबद्दल अधिकृत निवेदन दिलेले नाही. या दोन्ही संघांमधील सामना अहमदाबाद येथे खेळण्याचे संकेत देण्यात आले होते. येथे वाचा सविस्तर वृत्त

५) आयपीएलमधील काही खेळाडू आणि कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर दिल्लीतील आयपीएल सामने थांबवावे, यासाठी सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली. वकील करण एस. ठुकराल यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये, शहरातील रुग्णालयांमध्ये बेड, ऑक्सिजन, अत्यावश्यक औषधे नसताना आणि लोक आपल्या प्रियजनांचा अंत्यसंस्कार करताना दिल्लीत आयपीएल सामने खेळणे “अनुचित” आहे का?, असा प्रश्न उपस्थित केला होता. येथे वाचा सविस्तर वृत्त

६) मंगळवारी सकाली  बीसीसीआय आयपीएलचे उर्वरित सर्व सामने मुंबईत शिफ्ट करण्याचा विचार करत असल्याचे वृत्तसमोर आलं. मुंबईतील वानखेडे, डी वाय पाटील आणि ब्रेबॉर्न या तीन मैदानांमध्ये हे सामने खेळवले जाऊ शकतात. वानखेडेत आतापर्यंत आयपीएलचे दहा सामने पार पडले आहेत. इतर दोन मैदानं फक्त सरावासाठी वापरली गेली होती. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुंबईत सर्व सामने खेळवण्याचा विचार होता. येथे वाचा सविस्तर वृत्त

७) चेन्नई आणि राजस्थान सामनाही करोनामुळे पुढे ढकलण्याचा निर्णय मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास जाहीर करण्यात आला. ‘बालाजीच्या संपर्कात सर्वच खेळाडू आले होते. त्यामुळे त्या सर्वांना आयसोलेट व्हावं लागणार आहे. त्यांची दर दिवशी चाचणी केली जाणार आहे’, असं बीसीसीआच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. आयपीएलच्या १४ व्या पर्वातील चेन्नई विरुद्ध राजस्थान हा ३२ वा सामना होता. मात्र आता हा सामना पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात आलं. येथे वाचा सविस्तर वृत्त

८) बायो-बबलमध्येही करोनाने घुसखोरी केल्याने आयपीएलच्या पुढील सामान्यांवर सोमवारपासूनच प्रश्नचिन्ह उभं राहिलं. मात्र हा बायो-बबल प्रकार काय असतो, त्याचे नियम काय असतात?, त्यात करोनाचे विषाणू नसतात का? यासंदर्भातील सविस्तर माहिती जाणून घ्या येथे क्लिक करुन

९) आयपीएल स्पर्धा करोनाच्या सावटाखाली होत असल्याने खेळाडू बायो बबलमध्ये खेळत आहेत. तसेच कडक नियमावली लागू करण्यात आली. अशात खेळाडूंना करोनाची लागण होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. अखेर मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास बीसीसीआयने आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेणारी बातमी समोर आली. येथे वाचा सविस्तर वृत्त

१०) स्पर्धेपूर्वी दिल्लीचा अक्षर पटेल, कोलकाताचा नितीश राणा आणि बंगळुरुचा देवदत्त पडिक्कल याला करोनाची लागण झाली होती. त्यांनी करोनावर यशस्वीरित्या मात केल्यानंतर संघात पुनरागमन केलं आहे. त्याचबरोबर वानखेडे मैदानातील १० कर्मचारी आणि बीसीसीआयने स्पर्धेसाठी नेमणूक केलेल्या ६ सदस्यांनाही करोनाची लागण झाली होती. येथे वाचा सविस्तर वृत्त

मराठीतील सर्व आयपीएल २०२१ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl suspended for this season with immediate effect everything you want to know scsg
First published on: 04-05-2021 at 13:57 IST