05 August 2020

News Flash

अभियांत्रिकीच्या ५० हजार जागा रिक्त

अन्य अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याकडे कल वाढला

अन्य अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याकडे कल वाढला

राज्यातील अभियांत्रिकी शिक्षणाचा घसरलेला दर्जा तसेच काही विशिष्ट शाखांमध्ये नोकऱ्यांची संधी कमी झाल्याने अभियांत्रिकी शिक्षणाकडे वळण्याचे प्रमाण यंदाही कमीच आहे.

यंदा अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रवेशासाठीच्या चौथ्या फेरीअखेर तब्बल ५०,०९९ जागा रिक्त राहिल्या असून, व्यवस्थापन कोटय़ातील रिकाम्या राहणाऱ्या जागांचा विचार करता हे प्रमाण ६० हजारापर्यंत जाऊ शकते, असे तंत्रशिक्षण संचालनालयातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

गेल्या काही वर्षांपासून एकीकडे अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील रिक्त जागांचे प्रमाण सातत्याने वाढत चालले आहे तर दुसरीकडे अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जाही खालावत चालल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभियांत्रिकी शिक्षणाऐवजी अन्य अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याचा कल वाढला आहे.

गेल्या वर्षी राज्यातील सुमारे साडेतीनशे अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्रवेशक्षमता सुमारे एक लाख ७० हजार एवढी होती. तथापि गेल्या वर्षी ‘अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदे’ने ज्या महाविद्यालयांमध्ये नियम व निकषांचे पालन केले जात नाही अशा महाविद्यालयांची प्रवेशक्षमता कमी केली तसेच काही ठिकाणी प्रथम वर्ष प्रवेशबंदी घातली.

याशिवाय ग्रामीण भागातील अनेक महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकीच्या काही अभ्यासक्रमांना विद्यार्थीच मिळत नसल्याने अशा महाविद्यालयांनी संबंधित अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी यंदा अभियांत्रिकीची सर्व अभ्यासक्रमांसाठी मिळून एक लाख ४३ हजार ६०१ प्रवेशक्षमता असून यात कॅपमध्ये एक लाख १४ हजार ८८१ प्रवेश तर महाविद्यालय स्तरावर २८,७२० प्रवेशक्षमता आहे. यातील ५०,०९९ जागा रिकाम्या राहिल्या असून हे प्रमाण ४३ टक्के आहे.

काही महाविद्यालयांतील ८० टक्के जागा रिकाम्या

याशिवाय ज्या विद्यार्थ्यांना कॅपमधून प्रवेश दिला आहे तथापि त्यांनी प्रवेश घेतलेला नाही अशांची निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही. महाविद्यालय स्तरावरील रिक्त जागांचे प्रमाण लक्षात घेता सुमारे साठ हजार जागा रिकाम्या राहण्याची शक्यता असल्याचे ‘डीटीई’मधील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

इलेट्रॉनिक, इलेट्रॉनिक अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन, सिव्हिल आणि इन्स्ट्रमेंटल इंजिनीयरिंगच्या जागा रिकाम्या राहण्याचे प्रमाण अधिक असून या अभ्यासक्रमातील जवळपास साठ टक्के जागा रिकाम्या आहेत. यात काही मंत्र्यांच्या व आमदारांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांतील जवळपास ८० टक्के जागा रिकाम्या राहिल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्या वेळी कॉम्प्युटर, मेकॅनिकल आणि आयटीला प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा मोठय़ा प्रमाणात कल असल्याचे दिसून आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2016 3:44 am

Web Title: 50 thousand empty seats in engineering
Next Stories
1 सहा वर्षांतील बोगस प्रवेशांचाही छडा
2 कृषी विद्यापीठ अधिस्वीकृतीची स्थगिती उठवणार?
3 ‘त्या’ अभियांत्रिकी महाविद्यालयांविरोधात ‘एआयसीटीई’ सर्वोच्च न्यायालयात!
Just Now!
X