महाराष्ट्राची बिहारपेक्षाही घसरण
ख्यातनाम गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त २०१२ हे वर्ष राष्ट्रीय गणित वर्ष म्हणून घोषित करण्यात आले असले तरी या वर्षांत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या गणिताच्या आकलनाविषयीची स्थिती कधी नव्हे इतकी डबघाईला आल्याचे ‘असर’ या प्राथमिक शिक्षणाचा आढावा घेणाऱ्या देशस्तरावरील पाहणीत दिसून येते. महाराष्ट्राची स्थिती तर बिहारपेक्षाही वाईट आहे. गणितीय व्याख्यांमध्येच अडकून पडल्याने या विषयात महाराष्ट्रच नव्हे तर अवघा देश मागे पडत असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होते आहे.
केरळ सोडल्यास महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, छत्तीसगढ, गुजरात, मध्यप्रदेश आणि हिमाचल प्रदेश या सर्व राज्यांमध्ये गणिताचे साधेसोपे प्रश्न सोडविण्याची विद्यार्थ्यांची क्षमता कमालीची घसरल्याचे स्पष्ट होते. २०१० साली पाचवीच्या २९.१ टक्के मुलांना दोन अंकी हातच्याची वजाबाकीची गणिते सोडविता आली नाहीत. हे प्रमाण २०११ साली ३९ टक्के झाले. तर २०१२मध्ये त्यात आणखी वाढ होऊन ४६.५ टक्क्य़ांवर गेले. आंध्र, कर्नाटक, केरळ वगळता सर्व राज्यात गणिताच्या क्षमतेत मोठय़ा प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते.
पाचवीच्या मुलांपैकी भागाकार सोडविता न येणाऱ्या मुलांचे प्रमाण २०१० मध्ये ६३.८ टक्के वरून २०११ साली ७२.४ टक्के झाले. तर २०१२साली हे प्रमाण ७५ टक्क्य़ांवर गेले. महाराष्ट्रात तर हे ७७.४ टक्क्य़ांवर गेले आहे. पाठय़पुस्तकानुसार ही गणिते तिसरीत शिकविली जातात.
शिक्षक गणितीय व्याकरणात फार जास्त अडकून पडल्यानेच विद्यार्थ्यांना हा विषय समजणे कठीण होते, असे मत असरच्या उषा राणे यांनी व्यक्त केले. गणितातील संकल्पना वेगळ्या व सोप्या पद्धती आणि साधने वापरून शिकविणे शक्य आहे. पण, चौरस शिकवायचा तर तो व्याख्येच्याच माध्यमातून ही कल्पना कुठेतरी शिक्षकांच्या मनात खोलवर रूजली आहे. प्रत्यक्षात चौरस अनेक वेगळ्या आणि मुलांना समजेल अशा पद्धतीने शिकविता येणे शक्य आहे. एकदा का संकल्पना समजली की त्या विषयी अधिक जाणून घ्यायला विद्यार्थ्यांना आवडते. परिणामी त्या विषयातील गोडीही वाढते, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले.
विद्यार्थ्यांमध्ये गणिताबद्दल गोडी निर्माण करण्यासाठी या विषयाच्या शिक्षकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या गणित अध्यापक मंडळातर्फे विविध उपक्रम राबविले जातात. गणित सोप्या पद्धतीने शिकवावा कसा, याचे प्रशिक्षण मंडळातर्फे शिक्षकांना दिले जाते. तसेच, विद्यार्थ्यांची चाचणी घेऊन त्यांची गणितातील क्षमताही तपासली जाते. या चाचण्याचे निकाल आम्ही गणित शिक्षकांना अभ्यासासाठी पाठवित असतो. पण, फारच थोडे शिक्षक यात रस घेतात, अशी खंत मंडळाचे सदस्य आणि बालमोहन शाळेचे गणिताचे शिक्षक विलास परब यांनी व्यक्त केली.
इयत्ता तिसरीचा भागाकार करता आलेल्या पाचवीच्या मुलांची टक्केवारी
राज्य…..२०१०……२०१२
महाराष्ट्र…४१.४……२२.६
केरळ….४८.६……४५.९
हिमाचल..६३.३……४८.७
बिहार….५१.७……३१.४
भारत….३६.२……२४.८
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 22, 2013 12:09 pm