News Flash

‘त्या’महाविद्यालयांचे नेमके चुकले कुठे?

प्रवेशासाठी नेमून दिलेले वेळापत्रक न पाळणे, प्रवेश प्रक्रियेत अपारदर्शकता ठेवणे, रिक्त जागांची माहिती दडविणे, विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी समान संधी नाकारणे, गुणवत्ता व आरक्षणाचे नियम डावलून प्रवेश

| January 17, 2013 12:04 pm

प्रवेशासाठी नेमून दिलेले वेळापत्रक न पाळणे, प्रवेश प्रक्रियेत अपारदर्शकता ठेवणे, रिक्त जागांची माहिती दडविणे, विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी समान संधी नाकारणे, गुणवत्ता व आरक्षणाचे नियम डावलून प्रवेश करणे आदी कारणांमुळे राज्यातील १७ खासगी वैद्यकीय व दंत वैद्यकीय महाविद्यालयांवर प्रवेश रद्द होण्याची नामुष्की ओढवली आहे.
प्रवेश नियंत्रण समितीला पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या विभागीय चौकशी समित्यांनी सादर केलेल्या अहवालात प्रत्येक महाविद्यालयाने दुसऱ्या फेरीनंतर प्रवेश करताना केलेल्या गैरप्रकारांवर नेमके बोट ठेवण्यात आले आहे. यापैकी बहुतांश महाविद्यालयांनी नियमानुसार रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध केलेली नाही. तर अनेकांनी प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची माहिती व्यवस्थित जतन केली नव्हती. यापैकी पुण्याच्या एमआयएमईआर या महाविद्यालयाने तर रात्री १० वाजता प्रवेश केला आहे. अनेकांनी आरक्षणाचे नियम धाब्यावर बसवून प्रवेश केले आहेत. काही महाविद्यालये तर इतकी मुजोर आहेत की त्यांनी चौकशीसाठी आलेल्या समित्यांनी मागितलेली माहिती देण्यासही नकार दिला. यापैकी साताऱ्याच्या ‘इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स अ‍ॅण्ड रिसर्च’ या महाविद्यालयाने तर वर प्रवेश नियंत्रण समितीलाच नोटीशीला उत्तर देताना ‘अ‍ॅप्लिकेशन ऑफ माईंड’ वापरले नसल्याचा आरोप करून समितीची अक्कल काढली आहे. या महाविद्यालयाचे ३८ प्रवेश समितीने रद्द केले आहेत.

महाविद्यालय, रद्द केलेल्या जागा आणि नेमके चुकले कुठे?
*  काशीबाई नवले, पुणे (७) – आरक्षणविषयक नियम न पाळणे, खुल्या वर्गातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनीला ओबीसी कोटय़ातून प्रवेश देण्याच्या नावाखाली प्रवेश डावलणे
*  एमआयएमईआर, पुणे (६) – एका विद्यार्थिनीने वैयक्तिक कारणास्तव प्रवेश रद्द केल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर महाविद्यालयाने अनुसूचित जमातीतील एका विद्यार्थ्यांला प्रवेश दिला. जागा अचानक रिक्त झाल्यामुळे महाविद्यालयाच्या कॅम्पसवर जो विद्यार्थी उपस्थित होता त्याला प्रवेश देण्यात आला असे महाविद्यालयाचे म्हणणे आहे. पण, हा प्रवेश रात्री १०च्या सुमारास दिला गेला. कार्यालयाची वेळ टळून गेलेली असताना इतक्या रात्री प्रवेश देण्याची गरज काय?
*  इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स अ‍ॅण्ड रिसर्च, सातारा (३८) – बेटरमेंट मिळाल्याने प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थिनीला शुल्क परताव्याचा (रिफंड) पुढील तारखेचा (पोस्ट डेटेड) धनादेश दिला. पण, बँकेत वेळेत पैसे जमा न झाल्याने ही विद्यार्थिनी कुठेच प्रवेश घेऊ शकली नाही. या शिवाय दुसऱ्या फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागांची माहिती समितीला न कळविणे, प्रवेशासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या ८५ अर्जापैकी २९ विद्यार्थ्यांचे अर्ज शुल्लक कारणांवरून (वैद्यकीय प्रमाणपत्र नसणे वगैरे) नाकारणे,  गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना डावलणे आदी ठपका चौकशीत ठेवण्यात आला आहे.
*  अश्विनी रूरल मेडिकल कॉलेज, सोलापूर (७) – महाविद्यालयाने गुणवत्ता आणि आरक्षणाचे नियम डावलून प्रवेश केले आहेत. विद्यार्थ्यांनी स्पीड पोस्ट आणि ईमेलने पाठविलेले अर्ज न स्वीकारणे.
*  तेरणा मेडिकल कॉलेज, नवी मुंबई (१०) – रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध न करताच २९ सप्टेंबरला ज्या पाच विद्यार्थ्यांना प्रवेश केले गेले ते यमाला धरून नाहीत. या शिवाय गुणवत्ता आणि आरक्षणाचे नियम डावलून प्रवेश.
*  सिंहगड दंत महाविद्यालय (३५) – प्रवेश देताना केल्या जाणाऱ्या कौन्सिलिंगचा अहवाल नाही. नियम आणि गुणवत्ता डावलून प्रवेश
*  तेरणा दंत कॉलेज, नवी मुंबई – (१८) – रिक्त जागा भरताना नियम डावलले.
*  वायएमटी दंत महाविद्यालय, नवी मुंबई (१७) – कौन्सिलिंगच्या उपस्थितीचे रेकॉर्ड नसणे आणि गुणवत्ता डावलून प्रवेश करणे.
*  एमजीएम दंत महाविद्यालय, नवी मुंबई (१८) – कौन्सिलिंगच्या उपस्थितीचे रेकॉर्ड नसणे आणि अर्ज मिळाल्याची पावती विद्यार्थ्यांना न देणे
*  योगिता दंत महाविद्यालय, खेड (४१) – या महाविद्यालयाने रिक्त जागांवर असो-सीईटीऐवजी एमएचटी-सीईटीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले. प्रवेश प्रक्रियेच्या वेळेस असो-सीईटीचे विद्यार्थी उपस्थित न राहिल्याने एमएचटी-सीईटीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावे लागले हा महाविद्यालयाचा खुलासा समितीने अमान्य करून प्रवेश गुणवत्ता डावलून झाल्याचा ठपका ठेवला आहे.
*  उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, जळगाव (१९) – समितीने नेमून दिलेले प्रवेशाचे वेळापत्रक धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांना संधी नाकारणे व गुणवत्ता डावलून प्रवेश
*’  डॉ. वसंत पवार मेडिकल कॉलेज, नाशिक (९) – रिक्त जागांची प्रसिद्ध करणे, आरक्षणाचे नियम धुडकावणे.
*  एसीपीएम मेडिकल कॉलेज, धुळे (२) – प्रवेश गुणवत्तेनुसार नाही
*  डॉ. व्ही. व्ही. पाटील मेडिकल कॉलेज, अहमदनगर (९) – प्रवेशासाठी उशीरा आल्याचे कारण देत एका विद्यार्थ्यांला प्रवेश नाकारल्याबद्दल समितीने अपारदर्शीपणे प्रवेश केल्याचा ठपका ठेवला आहे.
*  केबीएच दंत महाविद्यालय, नाशिक (१६) – रिक्त जागांची माहिती नियमानुसार प्रसिद्ध केली नाही आणि समितीचे प्रवेशाचे वेळापत्रक पाळले नाही.
*’ एनकेपी साळवे मेडिकल कॉलेज, नागपूर (११) – रिक्त जागांची माहिती नियमानुसार प्रसिद्ध केली नाही.
* डॉ. पी. डी. मेमोरिअल मेडिकल कॉलेज, अमरावती (४) – जात पडताळणी पत्र सादर करण्याची संधी न देता एका विद्यार्थ्यांला प्रवेश नाकारणे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2013 12:04 pm

Web Title: what is exactly wrong of that collage
Next Stories
1 खासगी वैद्यकीयच्या रद्द प्रवेशांच्या जागा नव्याने भरणार?
2 आदित्य दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा
3 अध्यक्ष प्रभाकर देसाई यांना प्र-कुलगुरूंनी बोलविले
Just Now!
X