‘विश्वाच्या निर्मितीत ठराविक सुरुवात किंवा अंत नसतो. तर विश्व हे विकसनशील असते. यातूनच विश्वाच्या उत्पत्तीची उत्तरे मिळतात,’ असे विचार ज्येष्ठ शास्त्रज्ञ व गणितज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी येथे केले.
मुंबई विद्यापीठाच्या ‘आईज’ या व्याख्यानमालेल्या अकराव्या व्याख्यानाचा समारोप करताना ते बोलत होते. ‘केंब्रिज विवाद आणि त्याचा रेडिओ खगोलशास्त्रावरील परिणाम’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. ‘संशोधन क्षेत्रातील १९६० पूर्वी बिग बँग सिद्धांत अस्तित्वात होता. हा बिग बँग सिद्धांत म्हणजे एखाद्या स्फोटातून विश्व निर्माण झाले व त्यातूनच अनेक आकाशगंगा अस्तित्वात आल्या, असा होता. परंतु, स्थिर स्थिती सिद्धांतामध्ये विश्वाच्या उत्पत्तीसंदर्भात विश्व स्थिर असले तरी ते विकनशील असते. त्यातूनच विश्वाच्या उत्पत्तीची उत्तरे मिळतात,’ अशा शब्दांत नारळीकर यांनी विश्वाच्या निर्मितीचा पट उलगडला.
‘स्थिर स्थिती सिद्धांताचे अनेक श्रेणी घटकांनुसार खगोलीय आधारावर मापन केले गेले. यात बिग बँग सिद्धांतापेक्षाही स्थित स्थिती सिद्धांताची श्रेणी ही अचूक आली,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
‘पीएचडी करीत असताना केंब्रिजमध्ये एका परिषदेत राईल या शास्त्रज्ञाला बिग बँग सिद्धांताबद्दल त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी तब्बल ४० मिनिटे दिली गेली. मला मात्र फक्त १० मिनिटांत स्थिर स्थिती सिद्धांताविषयी बोलायला सांगितले. या वेळी माझे पीएचडीचे मार्गदर्शक प्रा. हाईल यांनी प्रतिवाद करण्यासाठी त्याला ८ मिनिटे पुरेशी आहेत असे स्पष्ट करून मला माझी बाजू मांडण्यास सांगितले. फारसा अनुभव नसताना देखील स्थिर स्थिती सिद्धांताविषयी मी यशस्वीपणे भाष्य केले आणि ती मांडणी या क्षेत्रात मैलाचा दगड ठरली. यातूनच पुढे रेडिओ खगोलशास्त्राचा जन्म झाला,’ अशा शब्दांत डॉ. नारळीकर यांनी आपल्या आठवणींचा गोफ विणला.
या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. गॉड पार्टिकल्स, ब्लॅक होल यांसारख्या प्रश्नांचा यात समावेश होता. जागतिक स्तरावर संशोधनाने नावलौकिक प्राप्त झालेल्या भारतातील ११ संशोधक शास्त्रज्ञांना या व्याख्यानमालेत आमंत्रित करण्यात आले होते. पण, येत्या शैक्षणिक वर्षांत ‘आईज’ या व्याख्यानमालेत मानव्य शाखेशी संबंधित विषय घेतले जातील,’ असे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. नरेश चंद्र यांनी जाहीर केले.