कर्णबधिरांच्या विशेष शाळेत किंवा स्पिच थेरपी केंद्रातून प्राथमिक वाचा व भाषा विकास बऱ्यापकी झाल्यानंतर कर्णबधिर मुले समाजाभिमुख व्हावी यासाठी सर्वसाधारण मुलांच्या शाळेत प्रवेश घेतात आणि त्यांच्या एकात्मिक शिक्षणाला सुरुवात होते.
सर्वसाधारण मुलांबरोबर शिक्षण घेत असल्यामुळे कर्णबधिर मुलांचे व्यक्तित्व खूप छान खुलतं, फुलतं हा आमचा अनुभव आहे. गेल्या २१ वर्षांपासून मी या कर्णबधिर विद्यार्थ्यांना केशवनगर उच्च प्राथमिक शाळेत मार्गदर्शक शिक्षिका म्हणून मार्गदर्शन करतेय. या योजनेमुळे सामान्य मुलांचेही सामाजिकीकरण सहजतेने होते. अपंगांना मदत करण्याची भावना त्यांच्यात शाळेमध्ये कळत-नकळत रुजवली जाते. शाळेत होणाऱ्या विविध स्पर्धामध्ये सर्वसाधारण मुलांबरोबर स्पर्धा असल्यामुळे कर्णबधिर मुलांमधील न्यूनंगडाची भावना नाहीशी होते व त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागतो, असा दुहेरी फायदा या योजनेमुळे साध्य होतो.
शाळेच्या कॉकलिअर इनप्लॅन्टेशन केलेली पलक बेरड हिची उत्तम प्रगती झाली आहे. शालेय परीक्षांमध्ये सर्वसामान्य मुलांमध्ये ती पहिली असते. शाळेत होणाऱ्या विविध स्पर्धा, स्नेहसंमेलन, शारीरिक शिक्षण दिन यामध्ये कर्णबधिर विद्यार्थी सहभागी होतात व आपले कौशल्य दाखवतात. आमच्या उच्च प्राथमिक शाळेत सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर संस्थेच्याच केशवनगर माध्यमिक विद्यालयात या योजनेअंतर्गत आठवीपासून दहावीपर्यंतचे शिक्षण व्यवस्थित पूर्ण करतात.
कान अधू असला तरी हस्तकला, चित्रकला, अभिनय यांसारख्या कला त्यांच्यात उपजतच असतात. म्हणून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आमचे बरेच विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करून स्वत:चा व्यवसाय किंवा नोकरी करीत आहे. सुनील नानोटकर हा आमचा १९९२सालचा दहावी उत्तीर्ण माजी कर्णबधिर विद्यार्थी फोटोग्राफर होऊन फोटोग्राफीचा उत्तम व्यवसाय करतो आहे.
सर्वसाधारणपणे अपंग मुलांना मुख्य विषयांना पर्याय निवडण्याची सुविधा असते. उदा. गणित विषयाला पर्याय सातवीचे गणित, इंग्रजी विषयाला पर्याय टायिपग किंवा संगणक. असा पर्याय न घेता आमच्या शाळेतून सुरूची टिपले, कीर्तिका व अस्मिता धमदे भगिनी, सज्ञेश मासुरकर, अनिरुद्ध खंते ही कर्णबधिर मुले प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहेत. अनिरुद्ध खंते उत्तम चित्रे काढतो व स्विमिंगमध्येही तो राष्ट्रीय पातळीवर जाऊन बक्षिसे घेऊन आलेला आहे. चित्रकलेच्या परीक्षांना बसणाऱ्या आमच्या कर्णबधिर मुलांना मार्गदर्शन करतो. असे बरेच विद्यार्थी दहावी उत्तीर्ण होऊन पुढे विविध प्रकारचे व्यावसायिक शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे आहेत. आणि उत्तम रीतीने जीवन जगत आहेत.छाया सुरेश घिरणीकर
मार्गदर्शक शिक्षिका.
केशवनगर उच्च प्राथमिक शाळा,
जगनाडे चौक, नंदनवन,
नागपूर- ४४०००९
संपर्क क्रमांक : ९९७५२१३९५५
कप्पेबंद, साचेबंद वाटांनी न जाता आमच्यातलेच काही शिक्षक वेगळ्या वाटा चोखळताना दिसतात. आपलं शिकणं हे जगण्याचा भाग बनविताना दिसतात. हसतखेळत, मुलांच्या कलानं जाणारं हे शिक्षण दीर्घकाळ टिकतं. मुलांना जगायला शिकवतं आणि जीवन संजीवनी पुरवतं, असा अनुभव आहे. तुमच्या शाळेतही ‘असे चिरंतन शिक्षण’ देणारे  उपक्रम सुरू असल्यास आम्हाला जरूर कळवा. उपक्रमांची माहिती पाठविताना छायाचित्रेही जरूर पाठवावी. संपर्कासाठी पत्ता- ‘चिरंतन शिक्षण’ लोकसत्ता, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट,            
मुंबई-४०००२१. दूरध्वनी- ६७४४००००. फॅक्स-२२८२२१८७  
reshma.murkar@expressindia.com,  reshma181@gmail.com