मुंबई विद्यापीठाची पाळत असलेल्या ‘ऑलयुझर’ या ई-मेल पत्त्याचा तब्बल दीड हजार प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी सामूहिकपणे वापर करत असल्याने आता या सर्वाना एकमेकांशी माहिती आणि विचारांची देवाणघेवाण मोकळेपणाने करणे अशक्य होणार आहे.
विद्यापीठात विभागप्रमुख आणि संचालक, शिक्षक आणि अधिकारी, सह कुलसचिव, उपकुलसचिव आणि ऑलयुझर असे पाच प्रकारचे ई-मेल समूह आहेत. त्यापैकी एक म्हणजे  kallusers@mu.ac.in बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास हा ई-मेल अचानक काम करेनासा झाला. या ई-मेलवरून पाठविलेले संदेश ‘फेल्युअर’ म्हणून परत येऊ लागल्याने काही प्राध्यापक गोंधळात पडले. काहींनी ‘विद्यापीठ संगणकीय केंद्रा’शी संपर्क साधून याविषयी चौकशी केली. त्यावर आता त्यांनी पाठविलेला कोणताही संदेश केंद्राच्या ‘हेल्प डेस्क’वर तपासल्याशिवाय पुढे जाणार नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे, यापुढे आपल्याला ‘ऑलयुझर’वरून मोकळेपणाने संवाद साधता येणार नाही, याची जाणीव प्राध्यापकांना झाली.
एखाद्या विभागात असलेला परिसंवाद किंवा चर्चासत्राची माहिती इतर विभागांना कळविण्यासाठी या ई-मेलचा वापर केला जात असे. गेल्या काही दिवसात तर विद्यापीठात होणाऱ्या विविध घडामोडींवर जाहीरपणे मत व्यक्त करण्याचे व्यासपीठ असे स्वरूप या समुहाला आले होते. नरेंद्र मोदी यांच्या मुंबई येथील सभेसाठी त्यांचे हेलिकॉप्टर उतरवू देण्यास विद्यापीठाने आयत्यावेळेस नाकारलेली परवानगी, ‘आप’चे यश, हातेकर निलंबन या विषयांवर या समूहावर जाहीर चर्चा होऊ लागली. या समूहाची ताकद त्यावेळेसच प्रशानसनाच्या लक्षात आली. त्यामुळे, या चर्चावर नजर ठेवण्याचा, त्याला कात्री लावण्याचा विचार पुढे आला.
विद्यापीठात मात्र यावरून कमालीची नाराजी आहे. ‘ऑल युझर’ हा माहिती व विचारांची देवाणघेवाण करण्याचा एक चांगला मार्ग होता. विद्यार्थीही या व्यासपीठाच्या माध्यमातून आपले मत व्यक्त करीत असत. त्याला यामुळे मर्यादा आल्या आहेत,’ अशी प्रतिक्रिया एका शिक्षकाने व्यक्त केली. तर ‘विद्यापीठाचे शिक्षक आणि कर्मचारी यांची मुस्कटदाबी करणारे असे केविलवाणे प्रयत्न करण्यापेक्षा विद्यापीठाने आपला कारभार सुधारावा,’ अशी तिखट प्रतिक्रिया एकाने व्यक्त केली.